Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
भाजपने बारामती जिंकली तर लोकांचा निवडणुकीवरचा विश्‍वास उडेल
ऐक्य समूह
Friday, May 03, 2019 AT 11:27 AM (IST)
Tags: mn3
5मुंबई, दि. 2 (प्रतिनिधी) : ज्यांनी कधी निवडणूक लढवली नाही, तेही बारामतीची जागा जिंकण्याचा विश्‍वास व्यक्त करताहेत. त्यामुळे तंत्रज्ञानाच्या मदतीने काही नियोजन केलं आहे का, अशी शंका अनेकांच्या मनात येतेय. बारामतीची जागा भाजपने जिंकली तर लोकांचा निवडणूक प्रक्रियेवरचाच विश्‍वास उडेल, असे वक्तव्य राष्ट्रवादीचे काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी एका खाजगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत केल्याने ‘एव्हीएम’मधील घोळाचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
एबीपी माझा या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत शरद पवार यांनी ईव्हीएमबद्दल पुन्हा शंका व्यक्त केली आहे. महाराष्ट्रात मोठे यश मिळवूच, पण यावेळी बारामतीचीही जागा जिंकू, असा विश्‍वास भाजपच्या विविध नेत्यांनी व्यक्त केला आहे. अनेक धक्कादायक निकाल लागतील, असे दावे केले जात आहेत. याबाबत विचारले असता, बारामतीत भाजपचा विजय झाला तर लोकांचा निवडणुकीवरचा विश्‍वास उडेल आणि अनेक प्रश्‍न निर्माण होतील. काही जणांनी ईव्हीएममधील चिपमध्ये छेडछाड होऊ शकते, अशी माहिती आपल्याला दिली आहे. गुजरात, मध्य प्रदेशात अशा घटना घडल्याचं वाचनात आलं. मी काही तंत्रज्ञानातील तज्ज्ञ नाही. गुजरातमध्ये एका ठिकाणी निवडणूक अधिकार्‍याने जवळचा मोबाइल टॉवर बंद ठेवला आणि तेथील निकाल वेगळे लागले आहेत. दुर्दैवाने निवडणूक आयोगाबद्दल सध्या येणार्‍या बातम्या चांगल्या नाहीत. त्यामुळे असं काही घडलं तर लोकांचा   निवडणूक प्रक्रियेवरील विश्‍वास उडेल, अशी भीती व्यक्त करतानाच निवडणूक यंत्रणेवर लोकांचा विश्‍वास कायम राहायला हवा, असं मतही पवारांनी व्यक्त केलं.
महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी बारामतीबाबत केलेल्या दाव्याबाबत विचारले असता, ज्यांनी कधी निवडणूक लढवली नाही, तेही बारामतीची जागा जिंकण्याचे धाडसाने सांगतात. त्यामुळे तंत्रज्ञानाच्या मदतीने काही नियोजन केलं आहे का, अशी शंका अनेकांच्या मनात असल्याचं पवारांनी सांगितले. बारामतीमधून शरद पवार यांच्या कन्या आणि राष्ट्रवादीच्या विद्यमान खासदार सुप्रिया सुळे पुन्हा निवडणूक लढवत असून भाजपने रासपचे आमदार राहुल कुल यांच्या पत्नी कांचन कुल यांना तिकीट दिलं आहे. भाजपने या मतदारसंघात बरीच ताकद लावली आहे. या पार्श्‍वभूमीवर शरद पवारांनी व्यक्त केलेल्या शंकेमुळे त्यांना बारामतीबद्दल विश्‍वास वाटत नाहीये का, अशी चर्चा सुरू झाली आहे. भाजपला तर कुरघोड्या करण्याची आयतीच संधी मिळाली आहे. शरद पवार यांना राजकारणाची हवा आधी कळते, असं म्हणतात. त्यामुळे बारामतीचा अंदाज आला असावा, अशी प्रतिक्रिया जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी व्यक्त केली तर बारामतीचा कौल काय असणार, हे शरद पवारांच्या लक्षात आल्यानेच त्यांनी आतापासून कारण शोधून ठेवल्याचा टोला शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी लगावला.ं

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: