Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
मनमोहन सिंग काँग्रेसचे ‘वॉचमन’
ऐक्य समूह
Monday, May 06, 2019 AT 11:11 AM (IST)
Tags: na2
5सागर, दि. 5 (वृत्तसंस्था) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्यावर जोरदार हल्ला चढवला आहे. मनमोहन सिंग काँग्रेसचे प्रामाणिक वॉचमन होते. त्यांना देशाची नव्हे तर खुर्चीची अधिक चिंता होती. त्यामुळेच देश बरबाद होत गेला, अशी टीका नरेंद्र मोदी यांनी केली आहे.
मध्यप्रदेशातील सागर येथे निवडणूक प्रचारसभेला संबोधित करताना नरेंद्र मोदी यांनी मनमोहन सिंग यांच्यावर निशाणा साधला. क्रिकेटमध्ये दिवसभराच्या खेळानंतर शेवटची एक-दोन षटकं बाकी असताना एखादा खेळाडू बाद झाला तर शेवटच्या खेळाडूला मैदानात पाठवलं जातं. हा खेळाडू नाईट वॉचमनचं काम करतो. त्यामुळे चांगल्या खेळाडूंना मैदानात पाठवले जात नाही. 
त्याचप्रमाणे 2004 मध्ये काँग्रेसला सत्तेची संधी मिळाली. सत्ता स्थापन करण्याची संधी मिळेल, असे काँग्रेसला वाटलेही नव्हते. कारण सत्ता सांभाळण्याएवढी राजकुमाराची तयारी झाली नव्हती. काँग्रेसलाही त्यांच्या क्षमतेवर विश्‍वास नव्हता. त्यामुळे गांधी कुटुंबाने त्यांच्याशी प्रामाणिक असलेल्या वॉचमनला  सत्तेवर बसविण्याचा निर्णय घेतला. त्यांना वाटले राजकुमार आज शिकेल, उद्या शिकेल... सर्वच वाट पाहत होते. राजकुमारला भरपूर प्रशिक्षणही देण्यात आले, पण सर्व पाण्यात गेले, अशी बोचरी टीकाही मोदी यांनी केली.
राजकुमार आज ना उद्या तयार होईल, या आशेवर देशाची 10 वर्षे वाया घालवण्यात आली. त्यावेळच्या पंतप्रधानांचा रिमोट त्यांच्या हातात नव्हता. तो दुसर्‍यांच्या हातात होता. त्यावेळचे पंतप्रधानही देशाची चिंता करण्याऐवजी त्यांची खुर्ची टिकवण्यासाठीच जास्त धडपड करत होते. त्यामुळेच 2014 मध्ये देशातील जनतेने त्यांना सत्तेतून बाहेर हाकलले. काँग्रेसने 21 व्या शतकातील एक दशक वाया घालवले, अशा शब्दांत मोदींनी काँग्रेसचा समाचार घेतला.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: