Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
बांधकाम व्यावसायिकास चौघांचा पाच लाखांचा गंडा
ऐक्य समूह
Monday, May 06, 2019 AT 11:17 AM (IST)
Tags: re5
5कराड, दि. 5 : घराचे खोदकाम करताना सापडलेले अर्धा किलो सोने 5 लाख रूपयास देतो, असे सांगून चौघांनी पितळेचे दागिने देऊन एका बांधकाम व्यावसायिकाची फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी संजय विजय सणस (रा. मरळी, ता. पाटण) यांनी कराड शहर पोलिसात फिर्याद दिली आहे. या प्रकरणी प्रवीण बह्मनंद वेणेकर (वय 28, रा. गणेशनगर, ता. मुडगोड, जि. कारवार) याला पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याला न्यायालयात हजर केले असता चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. अन्य तीन जण फरार आहेत.
मंजुनाथ बंजत्री (रा. गणेशनगर, मुडगोड, जि. कारवार) व अन्य दोघे जण (नावे समजू शकली नाहीत) अशी गुन्हा नोंद झालेल्यांची नावे आहेत. पोलिसांनी दिलेली माहिती अशी, संजय सणस यांच्याकडे मंजुनाथ बंजत्री हा गवंडी काम करण्यासाठी होता. त्यामुळे बांधकाम व्यावसायिक आणि गवंडी यांची पूर्वीची ओळख होती. गवंडी बंजत्री याने संजय सणस याला फोन करून घराचे खोदकाम करताना अर्धा किलो सोने सापडले असून ते मला विकायचे आहे, असे सांगितले. त्यावेळी व्यावसायिकाने मला काही नको, असे सांगितले. त्यावर गवंड्याने वारंवार फोन करून 5 लाख रूपयांची गरज असल्याचे सांगितले. तेव्हा सणस याने बंजत्री याला कराड येथे येण्यासाठी सांगितले. बुधवारी (दि. 1 मे) दुपारी 12 वाजता फोनवर पैसे तयार असल्याचे सांगितल्यानंतर नांदलापूर गावच्या हद्दीत पाचवडा फाटा येथे येण्यास सांगितले. तेव्हा मरळी येथून संजय सणस 5 लाख रूपये घेवून पाचवड फाटा येथे 1.30 वाजता आले. यावेळी गवंडी मंजुनाथ बंजत्री व अन्य तिघेजण ओमनी गाडी (क्र. केए 31 एम 8470) घेवून उभे होते. मंजुनाथ याला सोन्याबाबत विचारले असता त्याने रूमालामध्ये असलेले बारीक पिवळ्या धातुचे मणी दाखविले. त्यानंतर मोटारसायकलच्या हँडलला अडकवलेली 5 लाख रूपये असलेली पैशाची बँग काढून मंजुनाथला दिली. रूमालामध्ये बांधून आणलेले सोने पाहिले असता ते पितळेचे असल्याचे संजय सणस यांना जाणवले. तेव्हा लगेच मजुनाथ बंजत्री आणि अन्य तिघे जण ओमनी गाडीतून कोल्हापूर बाजूकडे पळून गेले. त्यावेळी व्यावसायिक संजय सणस आणि तेथील लोकांनी पळून जाणार्‍यांपैकी प्रवीण वेणेकर यास पाठलाग करून काही अंतरावर पकडले. मंजुनाथ बंजत्री व अन्य दोघे जण पळून जाण्यात यशस्वी झाले. सुनील पन्हाळे तपास करत आहेत.
© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: