Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
शिकार व खैराच्या तस्करी प्रकरणी आठ जणांवर वनविभागाची कारवाई
ऐक्य समूह
Monday, May 06, 2019 AT 11:15 AM (IST)
Tags: re4
5वाई, दि. 5 : वेळे, ता. वाई परिक्षेत्रात दि. 4 रोजी खैर तोडून  विनापरवाना वाहतूक करून साठा केल्या प्रकरणी व शिकार करण्याच्या उद्देशाने  वाघर (जाळी), काठ्या व हत्यारे बाळगल्या प्रकरणी वन विभागाने धडक कारवाई करून आठ संशयितांना रंगेहाथ पकडून त्यांच्याकडील हत्यारे व माल हस्तगत केला. सर्व संशयित  सरोलीपाडा जव्हार, ता. जि. पालघर येथील आहेत. त्यांच्यावर जैवविविधता कायदा 2002 चे कलम 3, 7 अन्वये गुन्हे दाखल  करून अटक करण्यात आली. तसेच संशयितांना वाई येथील न्यायालयात हजर केले असता त्यांना तीन दिवसांची वनकोठडी ठोठावण्यात आली  आहे.
 रवींद्र रामजी जाधव (वय- 24),  योगेश सीताराम जाधव (वय- 23), इंद्रेश काषू जाधव (वय- 27), सीताराम महादू जाधव (वय- 50), काषू चैतू जाधव (वय- 55), लक्ष्मन देवाजी जाधव (वय- 28), अनिल रमेश जाधव (वय- 23), सुनील काषू जाधव (वय- 24) सर्व रा. सरोलीपाडा जव्हार (ता. जि. पालघर) अशी ताब्यात घेण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. ही कारवाई उपवनसंरक्षक- डॉ. भारतसिंह हाडा, सहाय्यक वनसंरक्षक (वनीकरण) बढाले यांच्या मार्गदर्शनाखाली वाई वनक्षेत्रपाल महेश  झाजुर्णे, वनपाल  रत्नकांत  शिंदे, सुरेश सूर्यवंशी, वनरक्षक लक्ष्मण देशमुख, अजित पाटील, वैभव शिंदे, प्रदीप जोशी  यांनी  केली. खैर हा परवानगी शिवाय  तोडू  शकत  नाही. संशयित  कोणाच्या  सांगण्यावरून  खैर  तोडत होते, तोडून ते कोणाला  विकणार होते, कोणत्या वन्य प्राण्याची शिकार केली आहे का? यादृष्टीने गुन्ह्याचा अधिक  तपास करून खैर विनापरवाना तोडून विकणार्‍या टोळीचा छडा  लावणाच्या दृष्टीने व  मुळापर्यंत जाण्याच्या दृष्टीने वाईचे वनक्षेत्रपाल महेश  झांजुर्णे तपास करत आहेत. लाकूड तोडणार्‍या टोळीच्या म्होरक्यांचा तपास लवकरात लवकर लावण्याची मागणी जोर धरत आहे. वनक्षेत्रपाल- महेश झांजुर्णे यांच्या मार्गदर्शनाखाली वाई वनविभागाने गेल्या काही महिन्यात अनेक धडक कारवाया केल्या आहेत.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: