Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
मोदींची पाच वर्षे विनाशकारी
ऐक्य समूह
Monday, May 06, 2019 AT 11:09 AM (IST)
Tags: na1
5नवी दिल्ली, दि. 5 (वृत्तसंस्था) : पंतप्रधान नरेंद्र मोदींची सत्तेतून हकालपट्टी करण्याची वेळ आली आहे. मोदींचा पाच वर्षांचा कार्यकाळ हा देशातील शेतकरी, तरुण, व्यापारी आणि प्रत्येक स्वायत्त संस्थेसाठी त्रासदायक आणि विनाशकारी होता, अशी जहरी टीका माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी केली आहे. केंद्रातील एनडीए सरकारच्या धोरणांवर आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कारभारावर मनमोहन सिंग यांनी पीटीआय या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत भाष्य केले.
देशात मोदी लाट ओसरली आहे. या सरकाराला बाहेरचा रस्ता दाखवण्यासाठी नागरिकांनी तयारी केली आहे. या सरकारचा विकासावर विश्‍वास नाही. सत्तेतून बाहेर जाण्याची वेळ आल्याने  ते असहाय्य झाले आहेत. नोटाबंदी हा स्वातंत्र्यानंतरचा देशातील सर्वांत मोठा घोटाळा आहे. गेल्या पाच वर्षांमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला आहे. कल्पना करू शकत नाही इतक्या मोठ्या प्रमाणात उलथापालथ झाली असल्याचा गंभीर आरोप मनमोहन सिंग यांनी केला.
पाकिस्तानसंदर्भात मोदींचे परराष्ट्र धोरण अतिशय निष्काळजीपणाचे होते. या सरकारने पाकच्या धोरणांवर अनेक कोलांटउड्या खाल्ल्या. पाकिस्तानला अचानक दिलेली भेट. त्यानंतर पठाणकोट विमानतळावर झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या तपासासाठी आयएसआयला दिलेले निमंत्रण हा सर्व प्रकार संतापजनक आहे, असे ते म्हणाले.
मोदींच्या चुकीच्या धोरणांमुळे देशाची अर्थव्यवस्था पुन्हा एकदा संकटात सापडली आहे. सततच्या बदलत्या आर्थिक धोरणांना जनता कंटाळली आहे. जनतेत प्रचंड नाराजी आहे. पण याला तोंड देण्यासाठी भाजपने निवडणुकीत दहशतवाद आणि राष्ट्रवादाचा मुद्दा मोठा केला आहे. मात्र, पुलवामातील दहशतवादी हल्ला हा गुप्तचर यंत्रणेचे सर्वांत मोठे अपयश आहे. दहशतवादाविरोधात सरकारची तयारी अपूर्ण आहे  हे यावरून स्पष्ट होते. या सरकारच्या काळात राष्ट्रीय सुरक्षा धोक्यात आली आहे. दहशतवादी कारवाया वाढल्या आहेत, असा आरोप त्यांनी केला.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: