Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
शाखाधिकार्‍याच्या त्रासाला कंटाळून बँक अधिकारी युवकाची आत्महत्या
ऐक्य समूह
Monday, May 06, 2019 AT 11:06 AM (IST)
Tags: re2
*आयसीआयसीआय बँकेच्या कोरेगाव शाखेतील प्रकार.
*संबंधित शाखाधिकार्‍यावर कारवाईची मुलाच्या वडिलांची मागणी
5पुसेगाव, दि. 5 : आयसीआयसीआय बँकेच्या कोरेगाव येथील शाखेचे अधिकारी महेश पाटील यांच्या शारीरिक व मानसिक त्रासाला तसेच सातत्याने देत असलेल्या अपमानास्पद वागणुकीला कंटाळून त्याच बँकेत बँक रिलेशनशिप ऑफिसर  पदावर कार्य करणार्‍या शिंदेवाडी, ता. खटाव येथील 27 वर्षीय युवकाने राहत्या घरातील पंंख्याला गळफास घेत आत्महत्या करून आपले जीवन संपविले. याबाबत पुसेगाव पोलीस ठाण्यात संबंधित शाखाधिकारी महेश पाटील यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. पंकज शिवाजी गायकवाड असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे. माझ्या मुलाच्या मृत्यूस कारणीभूत असलेल्या संबंधित शाखाधिकार्‍यावर तत्काळ कारवाई करून आम्हाला न्याय  द्यावा, अशी मागणी मयत युवकाचे वडील शिवाजी गायकवाड यांनी केली आहे. पुसेगाव पोलीस ठाण्याचे सपोनि. विश्‍वजित घोडके तपास करत आहेत.  
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार व मयत युवकाचे वडील शिवाजी श्रीरंग गायकवाड यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, मयत पंकज हा आयसीआयसीआय बँकेच्या वडूज येथील शाखेत दोन वर्षे कॉन्ट्रॅक्ट बेसवर काम करत होता. त्यानंतर त्याने या बँकेची परीक्षा देऊन बँक रिलेशनशिप ऑफिसर हे पद मिळवले. त्यानंतर पुणे येथील बँकेच्या शाखेत एक वर्ष पूर्ण करून गत दोन वर्षांपासून तो कोरेगाव येथील शाखेत काम करत होता. आपल्या शिंदेवाडी गावापासून तो नेहमीच कामावर ये-जा करत होता. कामात तत्पर असणार्‍या पंकजला कोणतीही चूक नसताना शाखाधिकारी महेश पाटील गेल्या एक वर्षभरापासून मोबाईलवर सातत्याने विनाकारण कामावरून काढून टाकेन, अशी धमकी देत शिवीगाळ व दमदाटी करत होते. तुझे काम बरोबर नाही, तुला कामावरून काढून टाकणार आहे, तू त्याच लायकीचा आहे, तुझा प्रवास भत्ता बिल पासच करणार नाही, काय करायचे ते कर, अशी वारंवार धमकी देत होते. याबाबत मयत पंकज याच्या मोबाईल फोनवर या दोघातील संभाषण रेकॉर्डिंग झाले आहे. त्याने दिवसभर इतरत्र फिरून आणलेली कामे संबंधित शाखाधिकारी दुसर्‍या व्यक्तीच्या नावे सातत्याने टाकत होते. तसेच तुझ्यामुळे बँकेचा परफार्मन्स खाली आला आहे. कामावरून तरी काढून टाकतो नाही तर तुझी बदलीच करतो, अशी धमकी त्याच्या वॉटसअ‍ॅपवर साहेबाकडून करण्यात येत  होती. घरची जबाबदारी अंगावर असल्याने जर कामावरून काढून टाकले तर काय होईल, या विचाराने तो प्रचंड दबावाखाली व मानसिक धडपणाखाली चार पाच दिवस होता. संबंधित शाखाधिकार्‍याने दिलेल्या अपमानास्पद वागणूक, शिवीगाळ, दमदाटी, मानसिक व शारीरिक त्रासाला कंटाळून त्याने आत्महत्या केली असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: