Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
कोरेगावातील खाजगी सावकारी प्रकरणी
ऐक्य समूह
Tuesday, May 07, 2019 AT 11:07 AM (IST)
Tags: re1
दीपक फाळके याच्या विरोधात गुन्हा
5कोरेगाव, दि. 6 : दोन वर्षांपूर्वी दरमहा दहा टक्के व्याजदराने दिलेल्या दोन लाख रुपयांवर सुमारे 21 लाख 68 हजार रुपये उकळणार्‍या खाजगी सावकार दीपक भालचंद्र फाळके, रा. संभाजीनगर-कोरेगाव याच्या विरोधात रविवारी रात्री कोरेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. या प्रकरणी मेडिकल स्टोअर्सचा मालक असलेल्या विशाल गोरखनाथ ढोक यांनी तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी फाळके याचा शोध सुरू केला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, की विशाल गोरखनाथ ढोक हे सामान्य कुटुंबातील असून त्यांचे वडील महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या कोरेगाव आगारात काम करत आहेत. विशाल यांचे मेनरोडवरील साखळी पुलाशेजारील कल्पराज कॉम्प्लेक्समध्ये धन्वंतरी मेडिकल स्टोअर्स नावाचे औषध विक्रीचे दुकान आहे. मेडिकल स्टोअर्सच्या  व्यवसायाला जोड धंदा म्हणून कोरेगाव एम. आय. डी. सी. मध्ये मेडिकल बँडेजचा कारखाना सुरू करण्याचा निर्धार विशाल याने केला होता. त्यासाठी त्याने पैशांची जुळवाजुळव केली होती.  मात्र भांडवलाला ते पुरेसे होत नव्हते. त्यातून तोंडओळख असलेल्या दीपक भालचंद्र फाळके, रा. संभाजीनगर-कोरेगाव याच्याकडे विशाल याने पैशाचा विषय काढला. त्यावेळेस फाळके याने मी स्वत: महिना दहा टक्के व्याजदराने  पैसे देतो, असे सांगितले. विशाल याने मला दोन लाख रुपयांची गरज असल्याचे सांगितल्यावर आठ दिवसात पैसे देतो, असे फाळके याने सांगितले.
दि. 11 सप्टेंबर 2017 रोजी दुपारी 3 च्या सुमारास  मेडिकल दुकानात दीपक फाळके हा आला आणि त्याने दोन लाख रुपये रोख दिले. या पैशांचा लेखी स्वरूपाचा व्यवहार करण्यात आलेला नव्हता.
सदरील रक्कम देताना दीपक फाळके याने सांगितले, की मला मुद्दल व व्याजाची रक्कम रोख द्यायची. त्यावेळेस त्याला एच. डी. एफ. सी. बँकेच्या खात्यावरील दोन कोरे धनादेश सही करून विशालने दिले. दीपक याने रक्कम देतेवेळी सांगितले, की ही रक्कम तुला वापरायची तितक्या दिवस वापर, परंतु तुला महिन्याचे व्याज द्यावे लागेल. पैशांची गरज असल्याने विशाल याने सदरचा व्यवहार मान्य केला होता.  रक्कम घेऊन एक महिना भरल्यानंतर दीपक फाळके याच्या संभाजीनगर येथील राहत्या घरी जाऊन दि. 11 ऑक्टोबर 2017 रोजी 20 हजार रुपये विशाल याने दिले होते. त्यानंतर 11 नोव्हेंबर 2017 रोजी फाळके याच्या घरी जाऊन दोन लाख रुपये मुद्दल व व्याजाचे 20 हजार रुपये असे एकूण 2 लाख 20 हजार रुपये रोख स्वरूपात देऊन विशाल याने आपला व्यवहार संपला, असे सांगितले. यावेळेस सह्या करून दिलेले कोरे धनादेश परत मागितल्यावर उद्या दुकानावर आणून देतो, असे फाळके याने सांगितले. दि. 12 नोव्हेंबर 2017 रोजी सकाळी 11 च्या सुमारास मेडिकल स्टोअर्समध्ये दीपक फाळके हा गेला आणि त्याने तुझे कोरे धनादेश परत देणार नाही व दिलेले 2  लाख 20 हजार रुपये ही रक्कम आठवडा 20 टक्के व्याजदाराने गेल्या महिन्याचे व्याज व दंड असे झाले आहे. यापुढे आठवड्याला 20 टक्के व्याज द्यावे लागेल व मी आठवड्याला दर बुधवारी व शनिवारी रक्कम घ्यायला येणार आहे. त्यावेळी 20 हजार रुपये दिले पाहिजेत, अशी दमदाटी करून फाळके हा निघून गेला. घडल्या प्रकाराची माहिती विशाल याने घरी दिली.
दीपक फाळके याला आजवर रोखीने व मोबाईल ट्रान्स्फरद्वारे  21 लाख 68 हजार रुपये दिले आहेत. त्यामध्ये दि. 9 जानेवारी 2018 रोजी शिवकृपा सहकारी पतपेढी, कोरेगाव शाखेतून एक लाख रुपये कर्ज काढून रोखीने तर दि. 31 जानेवारी 2018 रोजी 48 हजार रुपये मोबाईलद्वारे ट्रान्स्फर केले. दि. 1 ते 14 फेब्रुवारीपर्यंत वडील गोरखनाथ ढोक यांच्या बँक खात्यातून ए. टी. एम. द्वारे 1 लाख 80 हजार रुपये रोखीने दिले. दि. 8 मे 2018 रोजी ज्ञानदीप को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या कोरेगाव शाखेत सोने तारण कर्ज काढून 84 हजार रुपये दीपक फाळके याच्या घरी जाऊन रोखीने दिले. दि. 11 मे 2019 रोजी भारतीय स्टेट बँकेच्या नरवणे-दहिवडी शाखेतून 30 हजार रुपये रोखीने काढून दिले. तसेच 90 हजार रुपये मोबाईलद्वारे ट्रान्सफर केले. दि. 14 मे 2018 रोजी 10 हजार रुपये मोबाईलद्वारे ट्रान्स्फर केले. दि. 23 मे 2018 रोजी मित्र ऋषीकेश अनिल पिसाळ, रा. ओझर्डे, ता. वाई याच्याकडून 55 हजार रुपये घेऊन फाळके याला दिले. दि. 3 जून 2018 रोजी 40 हजार रुपये पतसंस्थेतून काढून आणि 2 लाख 35 हजार रुपये ट्रान्स्फर केले. दि. 11 जून 2018 रोजी बचत गटातून कर्ज काढून 1 लाख रुपये रोख स्वरूपात तर 1 लाख रुपये मोबाईलद्वारे ट्रान्स्फर केले. दि. 9 जुलै 2018 रोजी 19 हजार रुपये मोबाईलद्वारे ट्रान्स्फर केले. दि. 25 रोजी 30 हजार रुपये, दि. 26 रोजी चाळीस हजार रुपये तर दि. 28 रोजी 25 हजार रुपये रोखीने दिले.
दि. 3 ऑगस्ट रोजी भारतीय स्टेट बँकेच्या सदरबझार, सातारा शाखेतून 3 लाख रुपये धनादेशाद्वारे आणि दि. 11 व 14 ऑगस्ट रोजी बहिणीच्या लग्नासाठी घरात ठेवलेले 2 लाख 50 हजार रुपये रोखीने दीपक फाळके याला विशाल याने दिले. बहीण स्वाती ढोक हिच्या बँक खात्यातून 65 हजार रुपये आणि भारतीय स्टेट बँकेच्या नरवणे-दहिवडी शाखेतून 2 लाख रुपये धनादेशाद्वारे फाळके याला दिले. वडील गोरखनाथ ढोक यांच्या पगारातून आणि शिलकीतून 1 लाख 67 हजार रुपये असे एकूण 21 लाख 68 हजार रुपये वेळोवेळी दीपक फाळके याला दिले असल्याचे विशाल याने फिर्यादीत नमूद केले आहे. विशेष म्हणजे अनेक रकमा या धनादेश व मोबाईल ट्रान्स्फरद्वारे दिलेल्या असताना दीपक फाळके याने परत विशाल याच्या खात्यावर वर्ग केल्या आणि पुन्हा रोखीने त्या नेल्या आहेत. या व्यवहाराला विरोध केला असता, शिवीगाळ दमदाटी करून जीवे मारण्याची धमकी दिली. एवढी रक्कम देऊन देखील फाळके याने औषध विक्री दुकान आणि घरी येऊन कुटुंबीयांना जीवे मारण्याची धमकी दिली.
या प्रकरणी विशाल ढोक याने फिर्याद दिली आहे. खाजगी सावकार दीपक भालचंद्र फाळके याच्या विरोधात कोरेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अविनाश राठोड तपास करत आहेत.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: