Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
दहिवडी-सातारा एस. टी. बसला कोरेगावात अपघात; 35 प्रवासी जखमी
ऐक्य समूह
Tuesday, May 07, 2019 AT 11:08 AM (IST)
Tags: re2
5कोरेगाव, दि. 6 : प्रस्तावित सातारा-म्हसवड-लातूर राष्ट्रीय महामार्गावर कोरेगाव शहरापासून अवघ्या दोन कि.मी. अंतरावर वसना नदीच्या पुलाजवळ सोमवारी सकाळी दहिवडी-सातारा एस. टी. बस  बाभळीच्या झाडावर आदळून झालेल्या अपघातात 35 प्रवासी जखमी झाले. जखमींना उपचारासाठी सातारा आणि कोरेगाव येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
पोलिसांनी सांगितले, की दहिवडी-सातारा बस (क्र. एम. एच. 11-बी. एल.-9429) ही 9.40 च्या दरम्यान कोरेगावहून सातार्‍याकडे निघाली होती. चालक रतन सोनबा नामदे, रा. म्हसवड, ता. माण हा वेगाने व बेदरकारपणे बस चालवत होता. कोरेगाव रेल्वे स्टेशनच्या पुढे आल्यानंतर तीव्र उतारावर चालकाचा स्टेअरिंगवरील ताबा सुटला. प्रवाशांचे नशीब बलवत्तर म्हणून चालकाने ही बस रस्त्याच्या डाव्या बाजूस असलेल्या बाभळीच्या झाडावर धडकवली. या अपघातात 35 पेक्षा जास्त प्रवासी जखमी झाले. अनेकांच्या डोक्याला आणि तोंडाला इजा झाली आहे.
अपघाताची माहिती समजताच सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष साळुंखे, उपनिरीक्षक संतोष मिसळे, अविनाश राठोड, वाहतूक शाखेचे हवालदार महादेव खुडे, रियाज शेख, किशोर भोसले, राहुल पवार यांनी अपघातस्थळी धाव घेतली. त्या पाठोपाठ एस. टी. चे सातारा व कोरेगाव येथील अधिकारी, कर्मचारी देखील दाखल झाले. त्यांनी जखमींना तातडीने अन्य बसेसमधून सातारा आणि कोरेगाव येथील रुग्णालयात हलविले. कोरेगावचे आगार व्यवस्थापक पृथ्वीराज भुताळे व सहकार्‍यांनी जखमींना तातडीची आर्थिक मदत देऊ केली. या अपघातात जखमी झालेले गोंदवले खुर्द, ता. माण येथील प्रवासी अमीरखान मुलाणी यांनी फिर्याद दिली आहे. बस चालक रतन सोनबा नामदे, रा. म्हसवड याच्या विरोधात कोरेगाव पोलीस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक संतोष मिसळे तपास करत आहेत.
© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: