Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
लोकसभेसाठी पाचव्या टप्प्यात 63 टक्के मतदान
ऐक्य समूह
Tuesday, May 07, 2019 AT 11:03 AM (IST)
Tags: mn1
दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला, प. बंगालमध्ये हिंसक घटना
5नवी दिल्ली, दि. 6 (वृत्तसंस्था) : लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात सात राज्यांमधील 51 मतदारसंघात सोमवारी एकूण सरासरी 63.26 टक्के मतदान झाले. जम्मू-काश्मीर व पश्‍चिम बंगालमध्ये हिंसाचाराच्या काही किरकोळ घटनांचा अपवाद वगळता मतदान शांततेत झाले. पश्‍चिम बंगालमध्ये सर्वाधिक 74.6 टक्के तर जम्मू-काश्मीरमध्ये सर्वांत कमी 19.55 टक्के मतदान झाले. केंद्रीय मंत्री राजनाथसिंग, स्मृती इराणी, यूपीएच्या अध्यक्ष सोनिया गांधी, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, झारखंडचे माजी मुख्यमंत्री बाबुलाल मरांडी आणि अर्जुन मुंडा यांच्यासह 674 उमेदवारांचे भवितव्य इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांमध्ये बंद झाले.
केंद्रात सत्ता स्थापनेसाठी अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या उत्तर प्रदेशात 14 जागांसाठी 57.93 टक्के, बिहारमध्ये पाच जागांसाठी 57.76 टक्के, मध्यप्रदेशात सात जागांसाठी 68.11 टक्के, राजस्थानमध्ये 12  जागांसाठी 63.72 टक्के, झारखंडमध्ये चार जागांसाठी 65.12 टक्के मतदान झाल्याची माहिती केंद्रीय निवडणूक आयोगाने दिली. पश्‍चिम बंगालमध्ये 12 जागांसाठी मतदान झाले. पाचव्या टप्प्यात महिला मतदारांनी सर्वाधिक मतदान केले. पाच टप्प्यांमध्ये मिळून 424 जागांसाठी मतदान झाल्याचे निवडणूक उपायुक्त डॉ. सक्सेना यांनी सांगितले. जम्मू-काश्मीरमध्ये आज मतदानाचा शेवटचा टप्पा होता.  अनंतनाग मतदारसंघात मतदान झाले. एका मतदान केंद्रावर हातबॉम्ब फेकण्यात आला. मतदान संपल्यानंतर अनेक ठिकाणी सुरक्षा दलांचे जवान आणि स्थानिकांमध्ये धुमश्‍चक्री झाली. अनंतनागमध्ये सर्वात कमी म्हणजे तीन टक्के मतदान झालं. लडाखमध्येही हिंसाचाराच्या काही घटना घडल्या. मात्र या ठिकाणी 52 टक्के मतदान झाले. पश्‍चिम बंगालमध्ये भाजपच्या उमेदवारावर हल्ला करण्यात आला.
 एका पत्रकारालाही तृणमूलच्या कार्यकर्त्यांनी चोप दिला. आणखी काही ठिकाणी तृणमूलच्या कार्यकत्यार्र्ंनी दगडफेक केली. बिहारमध्ये मात्र शांततापूर्वक मतदान झाल्याचं निवडणूक आयोगानं स्पष्ट केलं.
लोकसभेच्या पाचव्या टप्प्यातील 51 जागांवर एकूण 674 उमदेवार निवडणूक रिंगणात आहेत. उत्तर प्रदेश, पश्‍चिम बंगाल, बिहार, मध्य प्रदेश, राजस्थान, झारखंड आणि जम्मू-काश्मीरमध्ये सकाळपासूनच मतदारांनी रांगा लावल्या होत्या. तीव्र  उन्हाळा असूनही जम्मू-काश्मीरचा अपवाद वगळता मतदानाचा जोर कायम होता. मध्य प्रदेशातील बैतूलमध्ये सर्वात कमी 37.37 टक्के तर होशंगाबादमध्ये
सर्वाधिक 68.38 टक्के मतदान झाले. मध्यप्रदेशातील सातही मतदारसंघांमधील मतदान केंद्रांवर सायंकाळी 6 नंतरही मतदारांच्या लांब रांगा लागलेल्या होत्या. त्यामुळे तेथील मतदानाची अंतिम टक्केवारी वाढण्याची शक्यता आहे.
या टप्प्यात रायबरेलीत यूपीएच्या अध्यक्ष सोनिया गांधी मैदानात असून त्यांचे पुत्र व काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांचा अमेठीत भाजपच्या उमेदवार व केंद्रीय मंत्री स्मृती इराणींशी मुकाबला होत आहे. लखनौमध्ये राजनाथसिंग यांना भाजपचे बंडखोर खासदार यांच्या पत्नी व समाजवादी पक्षाच्या उमेदवार पूनम सिन्हा यांनी आव्हान दिले आहे. हजारीबागमधून केंद्रीय मंत्री जयंत सिन्हा तर जयपूरमधून केंद्रीय मंत्री राज्यवर्धनसिंह राठोड हे निवडणूक आखाड्यात आहेत. या जागांकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे. पाचव्या टप्प्यात निवडणूक आयोगाने 96 हजार 88 मतदान केंद्रे उभारली होती. या टप्प्यात मतदारांची संख्या एकूण 8 कोटी 75 लाख 88 हजार होती. या टप्प्यातील 51 जागांपैकी तब्बल 40 जागा गेल्या निवडणुकीत भाजपने जिंकल्या होत्या. आता उर्वरित 118 जागांवर 12 आणि 19 मे रोजी मतदान होणार असून 23 मे रोजी मतमोजणी होणार आहे.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: