Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
निवडणुकीचा निकाल एक दिवस उशिरा?
ऐक्य समूह
Thursday, May 09, 2019 AT 11:18 AM (IST)
Tags: mn1
पडताळणीसाठी ‘व्हीव्हीपॅट’ची संख्या वाढवल्याने विलंब शक्य
5नवी दिल्ली, दि. 8 (वृत्तसंस्था) : लोकसभा मतदारसंघांतर्गत येणार्‍या प्रत्येक विधानसभा मतदारसंघातील प्रत्येकी पाच व्हीव्हीपॅट यंत्रांमधील मतपावत्यांची पडताळणी करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला दिल्याने लोकसभा निवडणुकीचा निकाल एक दिवस विलंबाने लागण्याची शक्यता आहे, असे निवडणूक आयोगातील सूत्रांनी सांगितले.
निवडणूक आयोगाच्या प्रचलित पद्धतीनुसार लोकसभा मतदारसंघाच्या अंतर्गत येणार्‍या कोणत्याही एका विधानसभा मतदारसंघातील एका व्हीव्हीपॅट मशीनमधील मतपावत्यांची ईव्हीएममधील मतदानाशी पडताळणी करण्यात येते. त्यात सर्वोच्च न्यायालयाच्या निकालामुळे बदल झाला आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने निश्‍चित केलेल्या निवडणूक कार्यक्रमानुसार 23 मे रोजी मतमोजणी होऊन निकाल जाहीर केले जाणार होते. मात्र, मतपावत्यांच्या फेरजुळणीसाठी सर्वोच्च न्यायालयाने व्हीव्हीपॅटची संख्या वाढवल्याने आता अंतिम निकाल जाहीर होण्यासाठी 23 मे ऐवजी 24 मेचा दिवस उजाडण्याची शक्यता आहे, अशी माहिती निवडणूक आयोगातील एका जबाबदार अधिकार्‍याने नाव प्रसिद्ध न करण्याच्या अटीवर दिली.
या विलंबाचे कारणही या अधिकार्‍याने स्पष्ट केले आहे. मतदानात ‘व्हीव्हीपॅट’ यंत्रांचा समावेश झाल्यापासून मतमोजणी करताना कोणत्याही एका मतदान केंद्रातील व्हीव्हीपॅटमधील मतपावत्यांची पडताळणी करण्यात येत होती. मात्र, आता सर्वोच्च न्यायालयाने ही संख्या वाढवली आहे. लोकसभा मतदारसंघांतर्गत प्रत्येक विधानसभा मतदारसंघातील पाच मतदान केंद्रातील व्हीव्हीपॅट मशीनमधील मतपावत्यांची पडताळणी करण्याचे निर्देश न्यायालयाने 8 एप्रिल रोजी दिले आहेत. त्यामुळे मतमोजणीला पाच ते सहा तासांचा विलंब होण्याची शक्यता आहे. परिणामी निवडणुकीचा अंतिम निकाल 23 मेऐवजी 24 मे रोजी जाहीर होतील, असे या अधिकार्‍याने सांगितले.
दरम्यान, लोकसभा निवडणुकीची मतमोजणी करताना इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांमधील मतदानाबरोबर किमान 50 टक्के व्हीव्हीपॅट यंत्रांमधील मतपावत्यांची पडताळणी करण्याचे आदेश केंद्रीय निवडणूक आयोगाला द्यावेत, अशी मागणी करणारी विरोधकांची याचिका सर्वोच्च न्यायालयाने काल (मंगळवार) फेटाळली होती. तब्बल 21 विरोधी पक्षांनी याबाबत दाखल केलेल्या पुनर्विचार याचिकेवर न्यायालयाने अवघ्या एका मिनिटात निर्णय दिला होता. हा विरोधकांना जबर धक्का मानला जात आहे.
© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: