Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
शरद पवारांची आमदारांसमवेत कमराबंद चर्चा
ऐक्य समूह
Thursday, May 09, 2019 AT 11:24 AM (IST)
Tags: lo1
5सातारा, दि. 8 : लोकसभा निवडणुकीची धामधूम संपल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा खा. शरद पवार आणि माजी उपमुख्यमंत्री आ. अजित पवार हे बुधवारी सातारा मुक्कामी आले. शरद पवार यांनी रात्री उशिरा पक्षाच्या आमदारांसोबत कमराबंद बैठक घेतली. लोकसभा निवडणुकीत सातारा व माढा मतदारसंघात झालेल्या मतदानाचा आढावा आणि जिल्ह्यातील दुष्काळावर या बैठकीत चर्चा झाल्याचे समजते. दरम्यान, माढा मतदार संघात राष्ट्रवादीचे उमेदवार संजय शिंदे यांचा विजय निश्‍चित आहे, असा दावा विधानपरिषदेचे सभापती श्रीमंत रामराजे नाईक-निंबाळकर यांनी पत्रकारांशी बोलताना केला. खा. शरद पवारांचे आगमन झाले, त्यावेळी स्वागतासाठी खा. श्री. छ. उदयनराजे भोसले यांची अनुपस्थिती जाणवली.
कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या पुण्यतिथीनिमित्त रयत शिक्षण संस्थेत होणार्‍या कार्यक्रमासाठी खा. शरद पवार, आ. अजित पवार हे बुधवारी सायंकाळी 6 वाजता सातार्‍यातील हॉटेल प्रीती एक्झिक्युटिव्हमध्ये दाखल झाले. श्रीमंत रामराजे नाईक- निंबाळकर, माजी आमदार प्रभाकर घार्गे, रयत शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष डॉ. अनिल पाटील व राष्ट्रवादीच्या पदाधिकार्‍यांनी त्यांचे स्वागत केले. सातारा लोकसभा आणि माढा मतदारसंघातील मतदानांनतर या दोन्ही ठिकाणच्या निकालाबाबत उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे. खा. उदयनराजेंचे मताधिक्य घटणार आणि माढा मतदारसंघात भाजपच्या रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांच्या विजयाचा दावा केला जात आहे. या दोन्ही मतदारसंघात निकाल काहीही लागू शकतो, अशा वावड्यांना उत आला आहे. कर्मवीर भाऊराव पाटील यांची उद्या, दि. 9 रोजी असलेल्या पुण्यतिथीच्या कार्यक्रमासाठी खा. शरद पवार, आ. अजित पवार हे प्रथमच सातार्‍यात मुक्कामी आले. त्यांनी आ. शशिकांत शिंदे, आ. मकरंद पाटील, आ. बाळासाहेब पाटील, माजी आमदार प्रभाकर घार्गे यांच्याशी सुमारे एक तासभर कमराबंद चर्चा केली. या बैठकीत सातारा आणि माढा या मतदारसंघात झालेल्या मतदानाचा आढावा घेण्यात आला. जिल्ह्यातील माण, खटाव या दोन तालुक्यांमधील भीषण दुष्काळी परिस्थितीचाही आढावा पवार यांनी घेतला. या बैठकीपूर्वी पत्रकारांशी बोलताना श्रीमंत रामराजे नाईक- निंबाळकर म्हणाले, माढ्यात विरोधी उमेदवार आतापासूनच खासदार झाल्यासारखे वावरत आहेत. मात्र, 23 तारखेच्या निकालानंतर चित्र स्पष्ट होईल. फलटण मतदारसंघातून राष्ट्रवादीचे उमेदवार संयज शिंदे यांना मताधिक्य देण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांचा विजय निश्‍चित आहे.
आ. शशिकांत शिंदे म्हणाले, गत निवडणुकीपेक्षा यावेळी राज्यात राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसची स्थिती चांगली आहे. आघाडीला राज्यात घवघवीत यश मिळेल. मात्र, ईव्हीएम मशीनमध्ये सत्ताधारी काहीही गडबड करू शकतात.

(
© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: