Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
पाच वर्षे स्थिर सरकार देणे हेच उद्दिष्ट : खा. पवार
ऐक्य समूह
Friday, May 10, 2019 AT 11:19 AM (IST)
Tags: lo2
5सातारा, दि. 9 : पंतप्रधानपदाची संधी कोणाला मिळणार ही गोष्ट आमच्यासाठी गौण आहे. स्वत:चा विचार न करता एकवाक्यता करण्याला आमचे प्राधान्य असून बहुमत करायचे व पाच वर्षे स्थिर सरकार द्यायचे हेच उद्दिष्ट असल्याचे खा. शरद पवार म्हणाले. राज्य सरकारने दुष्काळाकडे गांभीर्याने पहावे. आचारसंहिता आहे म्हणून निर्णय घ्यायला विलंब लावणे योग्य नाही. निर्णय तातडीने घेणे गरजेचे आहे, पण ते घेतलेले नाहीत, अशा शब्दात त्यांनी राज्य सरकारला फटकारले.
रयत शिक्षण संस्थेच्या कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. संपूर्ण देशात परिवर्तनाला अनुकूल स्थिती दिसत असून परिवर्तनाला समर्थन देणार्‍या घटकांना एकत्र आणले पाहिजे. या अनुषंगाने चंद्राबाबू नायडू आपल्याशी बोलले असून इतर सर्वांशी ते बोलणार आहेत, असे पवार यांनी सांगितले.
मागच्या निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादीला महाराष्ट्रात सहा जागा मिळाल्या होत्या. आपण काही ज्योतिषी नाही. पण यावेळी फार सुधारणा होईल असे वाटते. सातारची जागा येईल याबद्दल शंका नाही, पण किती मतांनी येईल सांगता येत नाही, असे ते म्हणाले.
माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या-विषयी नरेंद्र मोदी यांनी काढलेल्या वक्तव्याबद्दल पवार यांनी त्यांची निर्भत्सना केली जी व्यक्ती हयात नाही, ज्यांचा मृत्यू क्लेशदायक झाला, ज्या कुटुंबातील दोन व्यक्तींची देशासाठी हत्या झाली त्यांच्याबद्दल अशी भाषा करणे शोभादायक नाही. रोज आपण अशी भाषा ऐकत आहोत. हे चांगले लक्षण नाही. महाराष्ट्रात निवडणूक प्रचारादरम्यान मोदी यांनी लक्ष्य केल्याविषयी विचारले असता, मोदींनी लक्ष्य केले याचा अर्थ माझे ठीक चालले आहे, अशी मिश्किल टिप्पणी त्यांनी केली.
इव्हीएम मशिनमधील 50 टक्के मतांची मोजणी करण्याविषयीची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्याविषयी विचारले असता पवार म्हणाले, गुजरातमध्ये घड्याळाचे बटण दाबल्यावर कमळाला मत जात असल्याचे आपण स्वत: पाहिले आहे. त्यामुळे मला इव्हीएम मशिनविषयी चिंता वाटते. वास्तविक आम्ही 50 टक्के मतचिठ्ठ्यांची मोजणी करण्याची मागणी केली होती. खरे तर सगळ्याच चिठ्ठ्या मोजल्या पाहिजेत. पूर्वी सर्व मोजत होते की नाही? त्यावेळी जर ते शक्य होत होते तर आता का शक्य नाही?   माण-खटावच्या पिण्याच्या पाण्यासाठी 50 टँकर देणार
राज्य सरकारने दुष्काळाकडे गांभीर्याने पहावे. आचारसंहिता आहे म्हणून निर्णय घ्यायला विलंब लावणे योग्य नाही. निर्णय तातडीने घेणे गरजेचे आहे. दुष्काळावर ज्या उपाययोजना केल्या त्या पुरेशा नाहीत असे लोक सांगत आहेत. पाणी, चारा, रोजगार, विद्यार्थ्यांच्या शिक्षणात खंड न पडेल यासाठी फीची व्यवस्था, तालुक्याच्या ठिकाणी त्यांच्यासाठी राहण्याची व्यवस्था आदी गोष्टी तातडीने केल्या पाहिजेत, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. नजीकच्या काळात दुष्काळी माण - खटावच्या जनतेच्या पिण्याच्या पाण्यासाठी 50 टँकर देणार आहोत असे त्यांनी सांगितले.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: