Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमात मराठा आरक्षण
ऐक्य समूह
Saturday, May 11, 2019 AT 11:18 AM (IST)
Tags: mn3
विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ देणार नाही : मुख्यमंत्री
5मुंबई, दि. 10 (प्रतिनिधी) : पदुव्यत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमातील मराठा आरक्षण रद्द करण्याबाबतचा उच्च न्यायालयाचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने कायम केल्याने मराठा मोर्चाचे नेते आक्रमक झाले असून पुन्हा उग्र आंदोलन छेडण्याच्या तयारीत आहेत. मराठा मोर्चाचे नेते वीरेंद्र पवार, आबासाहेब पाटील यांच्या नेतृत्वाखालील विद्यार्थ्यांच्या शिष्टमंडळाने आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन याबाबत तत्काळ तोडगा काढण्याची मागणी केली. राज्य सरकार यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न करत असून कोणत्याही परिस्थितीत विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ देणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
दरम्यान, मराठा आरक्षणांतर्गत येणार्‍या विद्यार्थ्यांची फी राज्य सरकार भरणार आहे. अण्णासाहेब पाटील महामंडाळामार्फत विद्यार्थ्यांची फी देण्यात येणार आहे. या निर्णयामुळे राज्य सरकारच्या तिजोरीवर 28 कोटी रुपयांचा भार पडणार आहे. मराठा विद्यार्थ्यांना मेडिकल कॉलेजचे पर्याय नव्याने देण्याची सूचना देण्यात आली आहे, असे वृत्त इलेक्ट्रॉनिक माध्यमांनी दिले आहे. मात्र, त्याला अधिकृत दुजोरा मिळू शकला नाही.
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर वैद्यकीय अभ्यासक्रमाला प्रवेश घेतलेल्या मराठा विद्यार्थ्यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. आबासाहेब पाटील व वीरेंद्र पवार यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने डॉ. तात्याराव लहाने यांची भेट घेतली. डॉ. लहाने यांनी विद्यार्थ्यांना परिस्थिती समजावून सांगितली आणि त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याशीही विद्यार्थ्यांनी दूरध्वनीद्वारे चर्चा केली. नंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची शिष्टमंडळाने भेट घेतली.
आत्महत्येचा इशारा
राज्य सरकारने या प्रकरणी तत्काळ हस्तक्षेप करून आम्हाला दिलासा द्यावा आणि प्रवेश कायम ठेवावा अन्यथा आम्हाला आत्महत्या करण्याशिवाय पर्याय राहणार नाही, असा इशारा एका विद्यार्थ्याने चंद्रकांत पाटील यांच्याशी दूरध्वनीद्वारे बोलताना दिला.
...तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार
या निर्णयामुळे शेकडो विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात आले आहे. या विद्यार्थ्यांनी सरकारच्या कायद्यानुसारच प्रवेश घेतला आहे.
त्या कायद्याचे रक्षण करणे राज्य सरकारची जबाबदारी आहे. सरकार अंतिम तोडगा काढत नाही, तोपर्यंत आम्ही डॉ. तात्याराव लहाने यांच्या केबिनमधून निघणार नाही. आमचे आंदोलन सुरूच राहील, असा इशारा वीरेंद्र पवार यांनी दिला. सरकार या प्रकरणी तोडगा काढण्याचा प्रयत्न करत आहे. मी या विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ देणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्याचेही वीरेंद्र पवार म्हणाले. विद्यार्थ्यांनी निराशेच्या भरात टोकाचे पाऊल उचलू नये यासाठीही आमचा प्रयत्न सुरू असल्याचेही पवार यांनी सांगितले.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: