Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
सहाव्या टप्प्यातील प्रचार तोफा थंडावल्या
ऐक्य समूह
Saturday, May 11, 2019 AT 11:13 AM (IST)
Tags: mn1
दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला; रविवारी मतदान
5नवी दिल्ली, दि. 10 (वृत्तसंस्था) : लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यातील प्रचाराची रणधुमाळी आज सायंकाळी संपुष्टात आली असून या टप्प्यात येत्या रविवारी (दि. 12) मतदान होत आहे. या टप्प्यात सात राज्यांमधील 59 जागांसाठी मतदान होत आहे. दरम्यान, सहाव्या टप्प्याचे मतदान झाल्यानंतर या निवडणुकीत आता सातव्या व अंतिम टप्प्याचे मतदान 19 मे रोजी होणार आहे. त्यामुळे सर्वच पक्षांच्या नेत्यांची धाकधूक वाढली आहे.
सहाव्या टप्प्यात केंद्रीय मंत्री मनेका गांधी, त्यांचे पुत्र खा. वरुण गांधी, भाजपच्या उमेदवार साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर, काँग्रेस नेते दिग्विजयसिंग, समाजवादी पक्षाचे अध्यक्ष व उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव आदी दिग्गजांची प्र्रतिष्ठा पणाला लागणार आहे. गेल्या निवडणुकीत या 59 जागांपैकी 44 जागा भाजपने जिंकल्या होत्या. यावेळी विरोधकांनी कडवे आव्हान उभे केल्याने त्या जागा कायम राखण्याचे आव्हान भाजपपुढे राहणार आहे.
सहाव्या टप्प्यात बिहार (8), हरयाणा (10), झारखंड (4), मध्य प्रदेश (8), उत्तर प्रदेश (14), पश्‍चिम बंगाल (8) आणि दिल्लीतील सात अशा एकूण 59 मतदारसंघांमध्ये रविवारी मतदान होत आहे. पाचव्याप्रमाणेच सहावा टप्पाही भाजपसाठी महत्त्वाचा आहे. या 59 मतदारसंघांपैकी 44 ठिकाणी भाजपचे खासदार असून भाजपचे मित्रपक्ष लोकजनशक्ती आणि अपना दलाचा प्रत्येकी एक खासदार आहे. त्यामुळे या टप्प्यातही मोदी-शहा दुकलीची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.
उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये विरोधकांच्या महाआघाडीने भाजपपुढे आव्हान उभे केले आहे तर पश्‍चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख आणि मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या एकाधिकारशाहीला भाजपने आव्हान दिले आहे. त्यामुळे मततांची तेथे कसोटी आहे.
उत्तर प्रदेशातील सहारणपूर व पिलिभीत येथून अनुक्रमे केंद्रीय मंत्री मनेका गांधी आणि त्यांचे पुत्र वरुण गांधी निवडणूक लढवत आहेत. त्यांनी यावेळी आपले मतदारसंघ एकमेकांमध्ये बदलले आहेत. सहारनपूरमध्ये मनेका गांधींचा मुकाबला बसपचे चंद्रभद्रसिंग व काँग्रेसचे डॉ. संजयसिंह यांच्याशी आहे. आझमगडमध्ये सपचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी यंदा आपले वडील मुलायमसिंग यांच्याऐवजी स्वत: निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. तेथे त्यांना भाजपचे उमेदवार व भोजपुरी अभिनेते निराहुआ यांनी कडवे आव्हान दिले आहे. येथे काँग्रेसने आपला उमेदवार दिलेला नाही.
मध्य प्रदेशची राजधानी भोपाळ मतदारसंघातील लढत अटीतटीची आहे. तेथे काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री दिग्विजयसिंग यांची लढत भाजपच्या उमेदवार आणि मालेगाव बॉम्बस्फोटातील आरोपी साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्याशी होणार आहे. गुणा मतदारसंघात काँग्रेसचे नेते ज्योतिरादित्य शिंदे यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. तेथे मोठ्या मताधिक्याने विजय मिळविण्याचे आव्हान त्यांच्यासमोर आहे. या मतदारसंघातून ज्योतिरादित्य हे 2002 पासून विजयी होत आले आहेत. उत्तर प्रदेशात मतदान होत असलेल्या 14 पैकी 12 मतदारसंघांमध्ये गेल्या वेळी भाजपचे खासदार निवडून आले होते.
बिहारमधील वाल्मीकीनगर, पश्‍चिम चंपारण, पूर्वी चंपारण, शेवहर, वैशाली, गोपालगंज, सिवन व महाराजगंज या जागांसाठी रविवारी मतदान होत आहे. हरयाणातील दहा जागांसाठी रविवारी मतदान होत असून त्यापैकी सात जागा गेल्या निवडणुकीत भाजपने जिंकल्या होत्या. पश्‍चिम बंगालमध्ये रविवारी मतदान होत असलेल्या सर्व आठही जागा तृणमूल काँग्रेसने गेल्या वेळी जिंकल्या होत्या. मात्र, या जागांवर भाजपने ममता बॅनर्जी यांच्यासमोर मोठे आव्हान उभे केले आहे.
दिल्लीतील सातही जागा या निवडणुकीतही जिंकण्याचे भाजपचे उद्दिष्ट आहे. गेल्या वेळी भाजपने या सर्व जागांवर विजय मिळवला होता. या जागांसाठी भाजप, आम आदमी पक्ष आणि काँग्रेस अशी तिरंगी लढत होत असून त्याचा फायदा भाजपलाच होऊ शकतो. भाजपचे विद्यमान खासदार मनोज तिवारी यांना उत्तर-पूर्व दिल्लीतून माजी मुख्यमंत्री श्रीमती शीला दीक्षित यांनी आव्हान दिले आहे तर पूर्व दिल्लीत माजी क्रिकेटपटू व भाजप उमेदवार गौतम गंभीरचा मुकाबला काँग्रेसचे अरविंदरसिंग लव्हली व ‘आप‘च्या आतिशी मार्लोन यांच्याशी आहे. दक्षिण दिल्लीत काँग्रेसने मुष्टियोद्धा विजेंदरसिंगला उमेदवारी दिली असून त्याची लढत भाजपचे विद्यमान खासदार रमेश बिढुरी व ‘आप’चे नेते राघव चढ्ढा यांच्याशी होणार आहे. यंदाच्या निवडणुकीत आतापर्यंत 11, 18, 23 व 29 एप्रिल आणि 6 मे अशा पाच टप्प्यांमध्ये मतदान झाले आहे.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: