Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
मुख्य पान  >>  खेळ वार्ता  >>  बातम्या

मुंबईचा चेन्नईवर रोमहर्षक विजय
ऐक्य समूह
Monday, May 13, 2019 AT 11:41 AM (IST)
Tags: sp1
5हैदराबाद, दि. 12 (वृत्तसंस्था) : येथील राजीव गांधी इंटरनॅशनल स्टेडियमवर रविवारी शेवटच्या चेंडूपर्यत रंगलेल्या अंतिम सामन्यात मुंबईने चेन्नईला 1 धावेने पराभूत करत आयपीएलच्या स्पर्धेत विजेतेपदाचा चौकार लगावला. मुंबईने प्रथम फलंदाजी करत चेन्नईला 150 धावांचे आव्हान दिले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना चेन्नईला शेवटच्या षटकात एका चेंडूवर 2 धावांची गरज होती. परंतु अनुभवी लसिथ मलिंगाने शेवटच्या चेंडूवर गडी बाद केला आणि मुंबईला विजेतेपद मिळवून दिले. अटीतटीच्या या लढतीत राहुल चहर आणि जसप्रीत बुमराह यांची गोलंदाजीही अत्यंत निर्णायक ठरली.
मुंबईचा कर्णधार रोहित शर्मा याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी घेतली. अत्यंत संयमी सुरुवात करणार्‍या रोहित शर्माने दुसर्‍या षटकात उत्तुंग असा पहिला षटकार लगावला. महत्त्वाचे म्हणजे हा षटकार लगावल्यानंतर चेंडू गायब झाला. त्यामुळे सामन्यात नवा चेंडू घेण्यात आला. रोहितने पहिला षटकार लगावल्यानंतर पुढच्याच षटकात क्विंटन डी कॉकने दीपक चहरचा समाचार घेतला. त्याने त्याच्या एकाच षटकात तब्बल 3 षटकार लगावले. 4 षटकार फटकावल्यानंतर एक आखूड टप्प्याचा चेंडू टोलवताना सलामीवीर डी कॉक झेलबाद झाला आणि मुंबईला पहिला धक्का बसला. त्याने 17 चेंडूत 29 धावा केल्या. डी कॉक पाठोपाठ कर्णधार रोहित शर्माही झेलबाद झाला आणि मुंबईला दुसरा धक्का बसला. रोहितने 1 चौकार आणि 1 षटकार खेचत चांगली सुरुवात केली होती. पण मोठा फटका खेळताना त्याचा अंदाज चुकला आणि तो बाद झाला. त्याने 15 धावा केल्या.
प्ले ऑफ्सच्या पहिल्या सामन्यात चेन्नईविरुद्ध मुंबईला विजय मिळवून देणारा सूर्यकुमार यादव या सामन्यात स्वस्तात त्रिफळाचीत झाला. त्याने 15 धावा केल्या. फलंदाजीच्या क्रमवारीत बढती मिळालेल्या कृणाल पांड्याला या सामन्यात आपला खेळ दाखविता आला नाही. त्याने केवळ 7 धावा केल्या. खेळपट्टीवर स्थिरावलेला ईशान किशन मोठा फटका खेळताना झेलबाद झाला. त्याने 26 चेंडूत 23 धावा केल्या. यात 3 चौकारांचा समावेश होता. मोठे फटके खेळणारा हार्दिक पांड्या पायचीत झाला.
 पांड्याने डीआरएसची मदत घेतली, पण तरीही तिसर्‍या पंचांनी त्याला बादच ठरवले. हार्दिकने 16 धावा केल्या. अखेर बर्थडे बॉय कायरन पोलार्डने शेवटच्या टप्प्यात फटकेबाजी करत मुंबईला 149 धावांपर्यंत मजल मारुन दिली. पोलार्डने 3 चौकार आणि 3 षटकारांच्या मदतीने 25 चेंडूत नाबाद 41 धावा केल्या.
150 धावांचे आव्हान स्वीकारत मैदानात उतरलेल्या धोनी ब्रिगेडने चांगली सुरूवात केली. फाफ डू प्लेसिस व शेन वॉट्सन यांनी फटकेबाजी करत आपला इरादा दाखवून दिला. 33 धावा असताना चेन्नईला डू प्लेसिच्या रूपाने पहिला धक्का बसला. त्यानंतर सुरेश रैना, अंबाती रायडू यांनी आपल्या विकेट गमावल्या. एकीकडे पडझड सुरू असतानाच शेन वॉटसन याने संयमी खेळी करत संघाचा धावफलक हलता ठेवला. तो जोपर्यंत मैदानात होता तो पर्यंत चेन्नईच्या विजयाच्या आशा कायम होत्या. परंतु तो विसाव्या षटकाच्या चौथ्या चेंडूवर बाद झाला आणि तेथेच चेन्नईने सामना गमावल्यात जमा झाला. एका चेंडूवर दोन धावा बाकी असतानाच मलिंगाने शार्दुल ठाकूरला बाद करत आयपीएलच्या या मोसमातील स्पर्धेवर चौथ्यांदा मुंबई इंडियन्सचे नाव कोरले. शेन
वॉटसनची 80 धावांची खेळी अखेर व्यर्थ ठरली व चेन्नईचा खेळ 20 षटकात 7 बाद 148 धावांवर आटोपला.
© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: