Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
सर्वांनी एकत्र येऊन सरकारचा बंदोबस्त करू : खा. पवार
vasudeo kulkarni
Monday, May 13, 2019 AT 11:43 AM (IST)
Tags: lo1
5सातारा, दि. 12 : महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकीची धामधूम संपूर्ण प्रचाराचा धुराळा खाली बसत नाही तोच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दुष्काळी भागाचा दौरा सुरु केला आहे. सरकारने दुष्काळग्रस्तांकडे दुर्लक्ष केल्यास सर्वांनी एकत्र येऊन त्यांचा बंदोबस्त करू, असा इशारा शरद पवार यांनी दिला.
सातारा जिल्ह्यातील ग्रामीण भागातील दुष्काळ पाहणी दौर्‍यावर असताना त्यांनी दुष्काळग्रस्त शेतकर्‍यांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते.
महाराष्ट्रात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. जनावरांचा चारा-पाण्याचा प्रश्‍न गंभीर झाला आहे. सर्वसामान्य नागरिकांनाही पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. गत वर्षी पाऊस कमी पडल्यामुळे या वर्षी दुष्काळाची दाहकता जाणवू लागली आहे. आमच्या काळात दुष्काळग्रस्त दौर्‍याच्या वेळी आम्ही गोळी पेंड चारा छावण्यांमध्ये पुरवत होतो. चारा छावण्यांमधील जनावरांच्या दुधामध्ये चांगली वाढ झाली होती. मात्र, आताचे सरकार याकडे गांभीर्याने लक्ष देताना कुठेही दिसून येत नसल्याचा आरोप खा. पवार यांनी केला.
शेतकर्‍यांचे गार्‍हाणे सरकारपर्यंत पोहोचवण्याचे काम करू. त्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांची भेट घेईन. शेतकर्‍यांचे दुःख सरकार समोर मांडू, मात्र त्यानंतरही सरकारला जाग आली नाही तर सर्वांनी एकत्र येऊन सरकारला जाग आणू, असा इशाराही त्यांनी दिला.
राज्यातील दुष्काळी परिस्थितीबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे
प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील शिष्टमंडळासह मुख्यमंत्र्यांची भेट घेणार असल्याचे शरद पवार यांनी यापूर्वीच सांगितले होते. राज्यातील लोकसभा निवडणुकीचे मतदान संपल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसने विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू केल्याचे दिसत आहे. मागच्याच आठवड्यात शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रवादी काँग्रेसची महत्त्वाची बैठक मुंबईत पार पडली. या बैठकीत दुष्काळाबाबतच्या परिस्थितीचा आढावा घेण्यात आला.
मी छोट्या लोकांच्या आव्हानांकडे लक्ष देत नाही
दुष्काळाच्या उपाययोजनांबाबत ‘जाणता राजा’ किंवा
त्यांच्या पंटरने चर्चेला यावे, असे खुले आव्हान चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांना दिले होते. पाटलांच्या या विधानाचा शरद पवारांनी रविवारी सातारा दौर्‍यावर असताना समाचार घेतला. ते म्हणाले, मी छोट्या लोकांच्या आव्हानांकडे लक्ष देत नाही. मुंबईत बसून व्याख्यान देण्यापेक्षा त्या लोकांनी इथे येऊन दुष्काळाची पाहणी करावी.
ते म्हणाले, तिथे मुंबईत बसून व्याख्याने आणि आव्हाने देत बसण्यापेक्षा राज्यभरातील दुष्काळाची पाहणी करावी, तेव्हाच तुम्हाला दुष्काळाची परिस्थिती समजेल. मी दुष्काळाची परिस्थिती पाहण्यासाठी जिथे-जिथे फिरलो आहे. तिथले लोक मला सांगत आहेत, की गावांमध्ये पिण्यासाठीदेखील पाणी नाही. पाणी खूप दिवसांनी येते. चारा छावण्यांमध्येदेखील खूप कडक नियम आहेत. रोजगार हमी योजनेत लोकांना कामे मिळत नाहीत.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: