Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
जिल्हा बँकेच्या जुन्या इमारतीजवळील मार्ग एकेरी ठेवण्याची मागणी
ऐक्य समूह
Wednesday, May 15, 2019 AT 11:37 AM (IST)
Tags: lo2
शशिकांत कणसे
5सातारा, दि. 14 : पोवईनाका ते बसस्थानक मार्गावर असणार्‍या जिल्हा बँकेच्या जुन्या इमारतीजवळील मार्ग दुहेरी असल्याने या ठिकाणी दिवसभरात वाहतूक कोंडीच्या अनेक घटना घडत आहेत. सोमवार, दि. 13 रोजी सायंकाळी बसस्थानकाकडून सायरन लावून वेगाने आलेल्या रुग्णवाहिकेला अन्य वाहनचालकांनी रस्ता मोकळा करून देण्याचे सौजन्य न दाखवल्यामुळे या मार्गावर  दुर्घटना घडण्याची वेळ आली होती. त्यामुळे  या ठिकाणचा मार्ग वाहतूक शाखेने एकेरी ठेवण्याची मागणी सातारकर नागरिकांमधून होऊ लागली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, पोवईनाक्यावरील जिल्हा बँकेच्या जुन्या इमारतीजवळ जिल्हापरिषद  सभापती यांची निवासस्थाने, तहसीलदार व प्रांत कार्यालय, श्री. छ. प्रतापसिंह भोसले मंडई, सातारा मार्केट कमिटी, जिल्हा काँग्रेस कमिटी, सेव्हन स्टार मल्टिप्लेक्स थिएटर आदी महत्त्वाच्या वास्तू आहेत. दिवसभरात या ठिकाणी नागरिकांची मोठ्या प्रमाणावर वर्दळ असते. धनंजयराव गाडगीळ वाणिज्य महाविद्यालय, यशवंतराव चव्हाण शास्त्र महाविद्यालय, छ. शिवाजी महाविद्यालयात शिक्षण घेण्यासाठी येणारे विद्यार्थी - विद्यार्थिनी बसस्थानकावर बसमधून उतरल्यानंतर याच मार्गाने पायी चालत येत-जात असतात. त्यामुळे या मार्गावर क्षमतेपेक्षा अधिक भार असल्याचा निष्कर्ष यापूर्वी शहर सुधार समितीने काढला होता. सातार्‍यातील वाहतूक कोंडीचा प्रश्‍न सुटण्यासाठी पोवईनाक्यावर तहसीलदार कार्यालय ते  इस्माईलसाहेब मुल्ला  लॉ कॉलेज, तहसीलदार कार्यालय ते सातारा पंचायत समिती आणि तहसीलदार कार्यालय येथे हॉटेल गुलबहार चौक या तीन ठिकाणी ग्रेड सेपरेटरची (भुयारी मार्ग) कामे सार्वजनिक बांधकाम विभागाने युद्धपातळीवर हाती घेतली आहेत.
सद्य परिस्थितीत पोवईनाका येथील जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या समोरील ग्रेड सेपरेटरचे काम सुरू असल्याने पोवईनाका येथून बसस्थानकाकडे जाण्यासाठी उजव्या बाजूला साधारण 10 फुटी रस्ता ठेवण्यात आला आहे. भुयारी मार्गाच्या कामाभोवती उभारण्यात आलेल्या सिमेंटच्या भिंतीला लागून रस्त्याच्या कडेला साधारण 3 बाय 3 चे सिमेंटचे खड्डे पाण्याचा निचरा करण्यासाठी काढण्यात आले आहेत. या 10 फुटी रस्त्यावर एकाच वेळी दोन वाहने जाणे अशक्य असले तरी काही वाहन चालक दंडेलशाही करीत आपली वाहने वेगाने नेत असल्याने या रस्त्यावर दिवसभरातून 8 ते 10 वेळा वाहतूक कोंडी ही नित्याची बाब झाली आहे.  इतक्या कमी रुंदीच्या रस्त्यावर एकेरी वाहतूक ठेवण्याची गरज असतानाही इथूनच दुहेरी वाहनांची ये-जा होत असल्याने वाहने एकमेकांना घासणे, दुचाकी सिमेंटच्या भिंतीवर जाऊन आदळणे अशा घटना वारंवार घडत आहेत. पाण्याचा निचरा होण्यासाठी घेण्यात आलेल्या सिमेंट काँक्रिटच्या खड्ड्यावर ग्रील न टाकल्याने रात्रीच्या वेळी दुचाकी वाहनाचे चाक थेट खड्ड्यामध्ये जाऊन कपाळमोक्ष होण्याची भीती आहे.
पोवईनाक्यावरून बसस्थानकाकडे जाणारी वाहने या मार्गाने वळवून बसस्थानकाकडून पोवईनाक्याकडे येणारी वाहने जिल्हा रुग्णालयामार्गे वळवल्यास या ठिकाणी होणारे संभाव्य अपघातांचे धोके टाळण्यासाठी एकप्रकारे मदतच होणार आहे. सोमवारी सायंकाळी 5 वाजण्याच्या दरम्यान बसस्थानकाकडून गंभीर जखमी रुग्णाला घेऊन जाणार्‍या रुग्णवाहिकेला जिल्हा बँकेच्या जुन्या इमारतीसमोरील मार्गावर अन्य वाहनचालकांनी वेळीच रस्ता मोकळा करून न दिल्यामुळे थोडा वेळ या ठिकाणी गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. सायरनचा आवाज मोठा केल्याने काही वेळाने वाहनचालकांनी मार्ग मोकळा करून दिल्यामुळे रुग्णांच्या कुटुंबीयांना दिलासा मिळाला. भविष्यात अशा घटना घडू नयेत यासाठी हा मार्ग एकेरी ठेवणे गरजेचे आहे.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: