Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
तेच कॉलेज, तोच अभ्यासक्रम हवा
ऐक्य समूह
Wednesday, May 15, 2019 AT 11:34 AM (IST)
Tags: mn2
प्रवेशाच्या स्थगितीनंतरही आंदोलन सुरूच: वैद्यकीय पदव्युत्तर प्रवेश : नोटिशीमुळे संभ्रम
5मुंबई, दि. 14 (प्रतिनिधी) : पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमातील मराठा विद्यार्थ्यांना मिळालेल्या आरक्षणाचा घोळ अद्याप सुरूच आहे. ‘राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षा’ने (सीईटी)े प्रवेश प्रक्रियेला स्थगिती देण्याच्या काढलेल्या नोटिशीनंतरही विद्यार्थ्यांनी आपले आंदोलन सुरूच ठेवले आहे. प्रवेश प्रक्रिया पुढे ढकलली असली तरी न्यायालयाच्या हवाल्याने काढलेल्या नोटिशीमुळे विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम कायम आहे. एसईबीसी आरक्षणानुसार मिळालेल कॉलेज आणि तोच अभ्यासक्रम मिळत नाही, तोपर्यंत आझाद मैदानात ठिय्या देऊन लढा सुरूच ठेवण्याचा पवित्रा विद्यार्थ्यांनी घेतला आहे.
पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमात आरक्षणानुसार मिळालेले प्रवेश कायम ठेवण्यासाठी विद्यार्थ्यांनी सलग नवव्या दिवशी आंदोलन सुरूच ठेवले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांच्याकडून प्रवेश प्रक्रिया पुढे ढकलण्याचे आश्‍वासन विद्यार्थ्यांना सोमवारी मिळाले.
 त्यानंतर ‘सीईटी’ सेलवरही प्रवेश प्रक्रिया सात दिवसांसाठी स्थगित करत असल्याची नोटीस झळकली. मात्र, न्यायालयाच्या आदेशाच्या अधीन राहून ही नोटीस काढत असल्याचे सरकारने त्यामध्ये म्हटले आहे. त्यामुळे ही प्रवेश प्रक्रिया नक्की स्थगित झाली आहे का, याबाबत विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता. ही नोटीस काढण्यात आली असली तरी राज्य सरकारने पुन्हा प्रवेश प्रक्रिया न करता आमचे आधीचेच प्रवेश कायम करावेत. तेच कॉलेज आणि तोच अभ्यासक्रम मिळायला हवा, यावर विद्यार्थी आजही ठाम आहेत.
काय म्हटले आहे नोटिशीमध्ये?
आरोग्य विज्ञान अभ्यासक्रमाच्या प्रवेशांमध्ये आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना लागू करण्यात आलेला आरक्षणाचा निर्णय न्यायप्रविष्ट आहे. वैद्यकीय व दंत पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रकियेस मुदतवाढ मिळावी यासाठी सर्वोच्च न्यायालयाला विनंती करण्याचा सरकारचा विचार आहे. सरकारच्या पत्राच्या अनुषंगाने 13 मे पासून सात दिवसांसाठी प्रवेश प्रक्रिया स्थगित करण्यात येत असल्याचे या नोटीसमध्ये म्हटले आहे.
निवडणूक आयोगाला अद्याप पत्र नाही
राज्य सरकारकडून अध्यादेश काढण्यात यावा, अशी विद्यार्थ्यांची मागणी आहे. मात्र, प्रवेश प्रक्रिया पुढे ढकलल्यानंतर नव्याने पुन्हा सोमवारी 20 मे रोजी प्रवेश प्रक्रिया सुरू होणार आहे. या काळात सरकारला अध्यादेश काढावा लागणार आहे. आचारसंहिता 23 मे रोजी संपत आहे. त्या आधी अध्यादेश काढण्यासाठी निवडणूक आयोगाची परवानगी लागणार आहे. मात्र, सरकारकडून तसे कोणतेही पत्र अद्याप निवडणूक आयोगाला देण्यात आलेले नाही.
अर्ज करण्याचे फॉर्मच गायब
प्रवेशासाठी अर्ज करण्याची आज शेवटची तारीख होती. मराठा विद्यार्थी आपल्या मागणीवर ठाम असले तरी काही विद्यार्थ्यांनी वर्ष वाया जाऊ नये म्हणून अर्ज भरून कॉलेज निवडण्याचाही प्रयत्न केला होता. मात्र, आज सीईटीचे परिपत्रक निघाल्यानंतर हे ऑनलाइन अर्ज वेबसाइटवरून काढून टाकण्यात आले. त्यामुळे विद्यार्थी अधिकच बुचकळ्यात पडले आहेत.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: