Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
यंदा मान्सूनचे चार दिवस उशिरा आगमन
ऐक्य समूह
Wednesday, May 15, 2019 AT 11:04 AM (IST)
Tags: mn1
5नवी दिल्ली, दि. 14 (वृत्तसंस्था) : तीव्र उन्हाळ्यामुळे बेजार झालेल्या देशवासीयांना यंदा उन्हाच्या झळा अधिक दिवस सोसाव्या लागणार आहेत. नैऋत्य मोसमी पाऊस म्हणजे मान्सून यंदा 4 जूनला केरळमध्ये दाखल होणार असल्याचा अंदाज ‘स्कायमेट’ या खाजगी हवामान संस्थेने दिला आहे. दरवर्षी मान्सून केरळमध्ये साधारणत: मेच्या अखेरीस किंवा 1 जूनला दाखल होतो. यंदा तो चार दिवस उशिरा येण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर यंदा पाऊस दीर्घकालीन सरासरीच्या (एलपीए) 93 टक्के म्हणजे सामान्य पाऊसमानापेक्षाही कमी पडण्याची शक्यता असल्याचे स्कायमेटने म्हटले आहे.
केरळमध्ये मान्सून उशिरा दाखल झाल्यास मान्सूनचे महाराष्ट्रातील आगमनही पाच दिवस लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. दरवर्षी 7 जूनदरम्यान मान्सून महाराष्ट्रात वर्दी देतो; परंतु यंदा मान्सूनचे भारतातील प्रवेशद्वार असलेल्या केरळमध्ये त्याचे 4 जूनला आगमन होत असून 12 जूनला मान्सून महाराष्ट्रात पोहोचेल, असा अंदाज स्कायमेटने व्यक्त केला आहे. त्यामुळे सामान्य जनता आणि बळीराजाला पावसाची आणखी प्रतीक्षा करावी लागणार आहे.
या संस्थेने वर्तवलेल्या अंदाजानुसार, यंदा मान्सून 22 मे रोजी अंदमान आणि निकोबार द्वीपसमूहापर्यंत पोहोचू शकतो. त्यात दोन दिवस इकडेतिकडे होऊ शकतात. यावर्षी देशातील मान्सून ‘अल-निनो’च्या प्रभावाखाली राहणार असल्याचे मतही स्कायमेटचे सीईओ जतीन सिंग यांनी व्यक्त केले. जुलै महिन्यातही सरासरीपेक्षा कमी पाऊस होण्याची शक्यता आहे. जुलैनंतर पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. कर्नाटक, महाराष्ट्रातील मराठवाडा, विदर्भ, मध्य प्रदेश आणि गुजरातमधील काही भागांमध्ये सामान्य पाऊसमानापेक्षाही कमी पावसाची शक्यता स्कायमेटने वर्तवली आहे. बिहार, झारखंड आणि पश्‍चिम बंगालमध्येही यंदा कमी पावसाची शक्यता आहे. यंदा पावसाची परिस्थिती महाराष्ट्रात फार बरी नसेल, असाही स्कायमेटचा अंदाज आहे. गेल्या वर्षीही मान्सून समाधानकारक झाला नव्हता.
त्यामुळे देशातील 12 क्षेत्रांमध्ये दुष्काळी परिस्थिती उद्भवली होती.
स्कायमेटचे सीईओ जतीन सिंह म्हणाले, ’यावर्षी देशाच्या सर्व चार विभागांमध्ये सामान्यपेक्षा कमी पाऊस पडेल. पूर्व, ईशान्य
आणि मध्य भारतात वायव्य भारत आणि दक्षिण द्वीपकल्पापेक्षा कमी पाऊस पडेल. पंजाब, हरियाणा, राजस्थान, दिल्ली राष्ट्रीय राजधानी परिसर या सखल भागांपेक्षा जम्मू-काश्मीर, हिमाचल
प्रदेश आणि उत्तराखंड या पर्वतीय राज्यांमध्ये अधिक पाऊस पडण्याचा स्कायमेटचा अंदाज आहे. मध्य भारतात तर पावसाची सरासरी
91 टक्के इतकीच राहील. कर्नाटकचा उत्तरेकडील अंतर्गत भाग, आंध्रच्या रायलसीमा भागातही पाऊसमान कमीच राहील. त्याउलट
केरळ आणि कर्नाटकच्या किनारपट्टीवर मान्सूनची कामगिरी अधिक दमदार असेल. महाराष्ट्रातील मराठवाडा आणि गुजरातच्या विविध भागात यावर्षी मोठा दुष्काळ पडला आहे. कमी पावसाच्या शक्यतेमुळे तेथील समस्या अधिक गंभीर होतील, असे स्कायमेटने आपल्या अंदाजात
म्हटले आहे. दरम्यान, भारतातील मान्सूनवर ‘अल-निनो’चा प्रभाव कमी असेल आणि देशात यंदा चांगला मान्सून होणार असल्याचा प्राथमिक अंदाज भारतीय हवामान विभागाने काही दिवसांपूर्वी वर्तविला होता. ‘अल-निनो’चा प्रभाव कमी असल्याने यंदा मान्सून सरासरीच्या 95 ते 104 टक्के असेल, असे हवामान विभागाने प्राथमिक अंदाजात म्हटले आहे. त्यामुळे स्कायमेट आणि भारतीय हवामान विभागाचे अंदाज वेगवेगळे असून उन्हाळ्याची तीव्रता सोसणारा शेतकरी आणि सामान्य जनता मान्सूनची आतुरतेने वाट पाहत आहे.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: