Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
चारा छावण्यांमधील जनावरांसाठी अनुदानात दहा रुपयांची वाढ
ऐक्य समूह
Thursday, May 16, 2019 AT 11:19 AM (IST)
Tags: mn3
5मुंबई, दि. 15 (प्रतिनिधी) : चारा छावण्यांमधील जनावरांच्या अनुदानात दहा रुपयांची वाढ करण्यात आली आहे. यापुढे प्रत्येक जनावरामागे 90 रुपयांऐवजी 100 रुपये अनुदान दिले जाईल, अशी माहिती महसूल मंत्री व मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आज दिली.
चारा छावण्यांमधील जनावरांसाठी लागणार्‍या वैरणीची खरेदी, त्यावरील वाहतुकीचा खर्च, मोठ्या जनावरांसाठी प्रतिदिन 18 किलो हिरवा चारा, आठवड्यातून तीन दिवस एक किलो पशुखाद्य आणि लहान जनावरांसाठी नऊ किलो हिरवा चारा व एक किलो पशुखाद्य देण्यात येत असल्याने चारा छावण्यांना देण्यात येणार्‍या अनुदानामध्ये प्रत्येक जनावरामागे दहा रुपयांची वाढ करून आता मोठ्या जनावरांसाठी 100 रुपये तर लहान जनावरांसाठी 50 रुपये दर देण्यात येणार आहे, अशी माहिती पाटील यांनी दिली.
चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालयात दुष्काळासाठी नेमलेल्या उपसमितीची बैठक झाली. राज्यातील दुष्काळी परिस्थिती, चारा छावणी, पाणी पुरवठा, रोहयो आदींचा या बैठकीत आढावा घेण्यात आला. वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन, महिला व बालविकास मंत्री पंकजा मुंडे, मृद् व जलसंधारण मंत्री प्रा. राम शिंदे, पर्यटन व रोहयो मंत्री जयकुमार रावल, पदुम मंत्री महादेव जानकर हे  उपसमितीचे सदस्य उपस्थित होते. राज्यात सध्या 1417 चारा छावण्या सुरू असून त्यामध्ये सुमारे 9 लाख 40 हजार जनावरे आहेत. केंद्र शासनाच्या निकषाप्रमाणे मोठ्या जनावरांना 70 रुपये तर लहान जनावरांना 30 रुपये अनुदान आहे. मात्र, राज्यातील परिस्थिती पाहून वाढीव अनुदान देण्यात येत आहे. आतापर्यंत चारा छावण्यांसाठी औरंगाबाद विभागासाठी 111 कोटी, पुणे विभागासाठी चार कोटी आणि नाशिक विभागासाठी 47 कोटी निधी वितरित करण्यात आला आहे.
साडेपाच हजार टँकर सुरू
राज्यातील 4 हजार 331 गावे व 9 हजार 470 वाड्यांना 5 हजार 493 टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्यात येत आहे. मागणीनुसार टँकर मंजूर करण्याचे अधिकार तहसीलदारांना देण्यात आले आहेत. पिकांच्या नुकसानीपोटी राज्यातील 67 लाख शेतकर्‍यांना आतापर्यंत 4 हजार 412 कोटी रुपयांचे वाटप करण्यात आले आहेत. पालकमंत्र्यांना त्यांच्या जिल्ह्यांमध्ये दौरे करण्याच्या सूचना करण्यात आल्या होत्या. त्यांच्या दौर्‍यानंतर आलेल्या सूचनांचा विचार करून निर्णय घेण्यात येत आहेत, असे पाटील यांनी सांगितले.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: