Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
प. बंगालमध्ये एक दिवस आधीच प्रचारबंदी
ऐक्य समूह
Thursday, May 16, 2019 AT 10:59 AM (IST)
Tags: mn1
अखेरच्या टप्प्यात निवडणूक आयोगाचा दणका
5नवी दिल्ली, दि. 15 (वृत्तसंस्था) : भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्या कोलकातामधील रोड शोमध्ये मंगळवारी झालेल्या हिंसाचाराची गंभीर दखल घेत केंद्रीय निवडणूक आयोगाने पश्‍चिम बंगालमध्ये लोकसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यातील प्रचाराची मुदत एक दिवस आधीच समाप्त करण्याचा अभूतपूर्व निर्णय बुधवारी घेतला. पश्‍चिम बंगालमध्ये उद्या (गुरुवारी) रात्री 10 वाजताच प्रचार थांबवण्याचे आदेश आयोगाने जारी केले आहेत. निवडणूक आयोगाने बहुधा प्रथमच घटनेच्या अनुच्छेद 324 अंतर्गत असलेल्या आपल्या अधिकारात हा निर्णय घेतला आहे. राज्याच्या गृह विभागाचे मुख्य सचिव आणि राज्य गुन्हे अन्वेषण विभागाचे अप्पर पोलीस महासंचालक राजीव-कुमार या प्रमुख अधिकार्‍यांच्या बदल्यांचे आदेशही आयोगाने जारी केले आहेत.
दरम्यान, कालच्या हिंसाचारावरून भाजप आणि तृणमूल यांच्यात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी व अमित शहा यांनी या हिंसाचाराला तृणमूलच्या कार्यकर्त्यांना आणि ममता बॅनर्जी यांना जबाबदार धरत जोरदार टीकास्त्र सोडले तर हा हिंसाचार ‘भाजपच्या गुंडांनी’ घडवल्याचा आरोप तृणमूलने केला आहे. या संबंधी काही ‘पुरावे’ निवडणूक आयोगाला दिल्याचे तृणमूलच्या नेत्यांनी सांगितले तर या हिंसाचाराबद्दल भाजपच्या निषेधार्थ ममता बॅनर्जी यांनी पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांसह कोलकात्यात आज पदयात्रा काढली.
लोकसभा निवडणुकीच्या सातव्या व अखेरच्या टप्प्यासाठी रविवारी (19 मे) मतदान होणार आहे. त्याच्या 48 तास आधी म्हणजे शुक्रवारी (17 मे) सायंकाळी सहा वाजता प्रचाराच्या तोफा थंडावणार आहेत. मात्र, पश्‍चिम बंगालची राजधानी कोलकाता येथे मंगळवारी भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्या रोड शोदरम्यान हिंसाचार झाला. दगडफेक, जाळपोळ, 19 व्या शतकातील थोर बंगाली समाजसुधारक ईश्‍वरचंद्र विद्यासागर यांच्या अर्धपुतळ्याची तोडफोड, अशा घटना घडल्या. या घटनेनंतर भाजप आणि तृणमूलकडून आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. हिंसाचाराच्या घटना आणि तणावपूर्ण स्थिती लक्षात घेऊन निवडणूक आयोगाने प्रचाराचा कालावधी 20 तासांनी घटवण्याचा अभूतपूर्व निर्णय घेतला. त्यानुसार पश्‍चिम बंगालमध्ये नऊ जागांसाठी प्रचार उद्या (गुरुवार) रात्री दहा वाजता बंद होणार आहे. या आदेशानुसार कोणत्याही माध्यमांमधून रात्री दहानंतर प्रचार करता येणार नाही. हिंसाचारासंबंधी कोणताही व्हिडिओ सोशल मीडियावर टाकण्यासही निवडणूक आयोगाने बंदी घातली आहे.
गेल्या 24 तासांमधील घटना, पश्‍चिम बंगालच्या निवडणूक अधिकार्‍यांकडून मिळालेला अहवाल लक्षात घेऊन तेथील मतदान भयमुक्त वातावरणात व्हावे यासाठी प्रचाराची वेळ घटवण्याचा निर्णय घेतल्याचे निवडणूक आयोगाचे उपायुक्त चंद्रभूषण कुमार यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. पश्‍चिम बंगालमधील हिंसाचारानंतर निवडणूक आयोगाच्या अधिकार्‍यांची राज्यातील मुख्य निवडणूक अधिकार्‍यांबरोबर व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक झाली. या बैठकीनंतर निवडणूक प्रचाराचा कालावधी कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला. राज्यघटनेच्या अनुच्छेद 324 अंतर्गत निवडणूक आयोगाला असलेल्या अधिकारान्वये हा निर्णय घेण्यात आला आहे. आयोगाने बहुधा प्रथमच अनुच्छेद 324 अंतर्गत आपल्या अधिकारांचा वापर केला असावा, असेही चंद्रभूषण कुमार यांनी स्पष्ट केले. निवडणूक आयोगाने तृणमूलच्या नेत्या व मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या दोन अत्यंत विश्‍वासू प्रशासकीय व पोलीस अधिकार्‍यांच्याही बदल्या करून त्यांना जोरदार दणका दिला आहे. राज्याचे मुख्य गृह सचिव अत्री भट्टाचार्य आणि राज्य गुन्हे अन्वेषण विभागाचे अप्पर पोलीस महासंचालक राजीवकुमार यांची बदली निवडणूक आयोगाने केली आहे. भट्टाचार्य यांच्याकडील कार्यभार राज्याच्या मुख्य सचिवांकडे सोपवण्यात आला आहे तर राजीवकुमार यांना केंद्रीय गृह मंत्रालयात पाठवण्यात आले आहे. राजीवकुमार यांनी गुरुवारी दहा वाजेपर्यंत आपल्या नव्या नियुक्तीवर हजर होऊन केंद्रीय गृह मंत्रालयाला त्याबाबत कळवावे, असा आदेश निवडणूक आयोगाने दिला आहे. पश्‍चिम बंगालमध्ये सातव्या आणि शेवटच्या टप्प्यात दमदम, बरसात, बसीरहाट, जयनगर, मथुरापुर, जादवपुर, डायमंड हार्बर, दक्षिण आणि उत्तर कोलकाता या नऊ जागांसाठी मतदान होणार आहे.
काय आहे अनुच्छेद 324?
अनुच्छेद 324 हे निवडणूक आयोगाचे मोठे आयुध आहे. निवडणुका निष्पक्ष आणि भयमुक्त वातावरणात व्हाव्यात म्हणून आयोगाला निर्णय घेण्याचे अधिकार अनुच्छेद 324 अंतर्गत देण्यात आले आहे. या अंतर्गत प्रशासनातील तैनात अधिकारी, प्रचार कालावधी निश्‍चिती आणि प्रचाराचे नियम यावर निर्णय घेता येतो. प्रत्यक्ष निवडणुकीत हिंसक घटनांची पुनरावृत्ती झाल्यास आणखी कठोर पावले उचलण्याचे संकेतही निवडणूक आयोगाने दिले आहेत.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: