Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
वैद्यकीय प्रवेश तोडग्यासाठी ‘तारीख पे तारीख’
ऐक्य समूह
Thursday, May 16, 2019 AT 11:21 AM (IST)
Tags: mn4
अध्यादेश, जागा वाढवण्यासाठी सरकारचे प्रयत्न सुरूच
5मुंबई, दि. 15 (प्रतिनिधी) : न्यायालयाच्या आदेशामुळे प्रवेश रद्द झालेल्या मराठा समाजातील वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांचा प्रश्‍न आजही मार्गी लागू शकला नाही. मराठा आरक्षणातून प्रवेश घेतलेल्या एकाही विद्यार्थ्याचे नुकसान होणार नाही, याची दक्षता घेत आहोत. या विषयावर कायदेशीर प्रक्रिया सुरू केली असून अध्यादेश काढण्यासाठी मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाकडे परवानगी मागण्यात आली आहे. त्यावर लवकरच तोडगा निघेल, असा दावा महसूल मंत्री व मराठा आरक्षणाबाबतच्या मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आज केला.
वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी मराठा आरक्षणातून प्रवेश घेतलेल्या; परंतु सर्वोच्च न्यायालयाच्या निकालामुळे प्रवेश रद्द झालेल्या विद्यार्थी, पालक व मराठा समाजातील नेत्यांची बैठक आज महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे झाली. त्यावेळी मराठा समाजातील एकाही विद्यार्थ्यांचे नुकसान होणार नसून या विषयावर लवकरच तोडगा काढू, अशी ग्वाही त्यांनी पुन्हा एकदा दिली.
वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या प्रवेशासंबंधी निर्माण झालेली तांत्रिक अडचण दूर करण्यासाठी धोरणात्मक निर्णय घ्यावा लागणार आहे. त्यासाठी निवडणूक आयोगाकडे परवानगी मागितली आहे. नव्याने प्रवेश प्रक्रिया राबविण्यासाठी 25 मे अंतिम तारीख असून ही तारीख 31 मेपर्यंत वाढवून देण्याची विनंती करणारा अर्ज सर्वोच्च न्यायालयाकडे करण्यात आला आहे. वैद्यकीय पदव्युत्तरच्या जागा वाढवून मिळण्यासंबंधीही केंद्र शासनाकडे पत्र पाठविण्यात आल्याची माहिती पाटील यांनी दिली. एकाही विद्यार्थ्याचे नुकसान होणार नाही. त्याची काळजी घेण्यात येत असल्याने विद्यार्थ्यांनी अस्वस्थ होऊ नये, असे आवाहन पाटील यांनी केले आहे.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: