Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
वाईतील कासारमाडी इमारत जळून खाक
ऐक्य समूह
Thursday, May 16, 2019 AT 11:23 AM (IST)
Tags: re1
गीत तीन दुकानांचे 7 लाखांचे नुकसान
5वाई, दि. 15 ः वाई शहरातील किसन वीर चौकात अतिशय जुन्या मोडकळीस आलेल्या कासारमाडी या इमारतीला बुधवारी पहाटे अडीच वाजता भीषण आग लागून संपूर्ण इमारत जाळून खाक झाली. या आगीत तीन दुकानांचे सुमारे 7 लाख 25 हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. ही आग शॉर्टसर्किटने लागल्याचे सांगण्यात येत असले तरी आगीचे नेमके कारण समजू शकले नाही. या इमारतीमधील वीजपुरवठा  पूर्णपणे बंद असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे ही भीषण आग शॉटसर्किटने लागू शकतेच कशी, असा प्रश्‍न नागरिक उपस्थित करत आहेत. यामुळे गेल्या काही महिन्यांमध्ये भाडेकरू व घरमालक यांच्यात वाद असलेल्या इमारतींनाच शॉर्टसर्किटने आगी कशा लागतात याबाबत शहरात उलटसुलट चर्चा सुरू आहे.
इमारतीत कोणीही वास्तव्यास नसल्याने जीवितहानी टळली. परंतु दत्तात्रय नरहरी जठार यांच्या मालकीची इमारत व त्यांचे खाऊच्या पानाच्या दुकानाचे मिळून 4 लाख 33 हजार रुपयांचे नुकसान झाले. जठार यांच्यापूर्वी या जागेचे मालक जाधव होते. जाधव यांच्याकडून भाडेकरू खोतलांडे यांनी 1970 मध्ये तर गायकवाड यांनी 1960 मध्ये जागा भाड्याने घेतली असल्याचे समजते. 
या जागेत पहिल्या मजल्यावर कुमार खोतलांडे यांचा संजय फोटो स्टुडिओ तर त्यांच्या शेजारीच अभिजित रमेश गायकवाड यांचे रमेश टेलर्स नावाचे दुकान होते. जागा मालक जठार व दोन्ही भाडेकरूंंचा न्यायालयात वाद सुरू होता. मागील वर्षी न्यायालयाने भाडेकरूंना डागडुजी करून घेण्यास परवानगी दिल्याने भाडेकरूंनी डागडुजी करून ते व्यवसाय करीत होते. हे चार लाख वगळता दोन्ही भाडेकरूंचे  2 लाख 92 हजार रुपये, असे एकूण सुमारे 7 लाख 25 हजार रुपयांचे या आगीत नुकसान झाले.
वाई शहरात लागलेल्या सर्वच आगी या रात्रीच्या वेळेसच कशा लागतात हाही प्रश्‍न या आगीच्या निमित्ताने उपस्थित करण्यात येत आहे. संपूर्ण लाकडी बांधकाम असलेल्या या इमारतीला पहाटे तीनच्या सुमारास भीषण आग लागली. ही इमारत शहराच्या मध्यवर्ती भागात असल्याने तसेच चारही बाजूंनी नव्या इमारती असल्याने आग विझविताना अग्निशमन दलाला कसरत करावी लागली असली तरी नजीकच्या पश्‍चिमेकडील खामकर स्विट होमच्या टेरेसमुळे अग्निशामक बंबाच्या कर्मचार्‍यांना आग विझविण्यास मदत झाली. पूर्वेकडे असलेल्या खामकर प्राईड या इमारतीच्या टेरेसवर प्रकाश गावडे यांच्या कन्येच्या विवाहानिमित्ताने मंडप उभारण्यात आला होता. सदर मंडपाने पेट घेतला होता. परंतु प्रसंगावधान राखत तरुणांनी अर्धा मंडप मोडून काढल्याने पुढील अनर्थ टळला.  शेजारी असलेल्या सिद्धीविनायक वडापाव सेंटरमध्ये भरलेले चार सिलेंडर होते. या दुकानापर्यंत आगीच्या झळा पोहोचत होत्या. दुकानाचे मालक उपलब्ध नसल्याने तरुणांनी दुकानाचे टाळे तोडून आतील सिलेंडर बाहेर काढले. अन्यथा या सिलेंडरच्या स्फोटामुळे प्रचंड हानी झाली असती. नगरसेवक चरण गायकवाड, भारत खामकर, कारखान्याचे संचालक रतन शिंदे, माजी नगराध्यक्ष भूषण गायकवाड, माजी नगरसेवक सचिन फरांदे, नंदकुमार खामकर, धनंजय हगीर, बाळासाहेब बागुल, गुणवंत खोपडे व पालिकेचे कर्मचारी, धर्मपुरी येथील सराफ असोसिएशन, बाळ गोपाळ गणेशोत्सव मंडळाचे कार्यकर्ते व स्थानिक नागरिकांनी पुढाकार घेतल्याने आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले. आग विझविण्यासाठी वाई नगरपालिका, किसनवीर सहकारी साखर कारखाना, पाचगणी नगरपालिकेच्या बंबानी तीन तास अथक प्रयत्न केल्यानंतर आग आटोक्यात आली. बंबामध्ये पाणी भरण्यासाठी पालिकेच्या टँकरचाही उपयोग करण्यात आला. पाचगणीच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक तृप्ती सोनावणे, वाईचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अमरसिंह निंबाळकर व त्यांचे सर्व सहकारी यांनीही आग विझविण्याकामी मोलाचे सहकार्य केले.
कासारमाडी ही इमारत अतिशय जुनी असल्याने पाणी मारताना साईडच्या भिंती कोसळण्यास सुरुवात झाली. त्यामुळे आग विझविण्याचा प्रयत्न करणार्‍यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागले. बघ्यांची गर्दी मोठी झाल्याने पोलिसांना त्यांना हटविताना कसरत करावी लागली. दरम्यान, तहसीलदार रणजित भोसले यांनी घटनास्थळी भेट देवून पाहणी केली. मंडलाधिकारी संतोष जाधव, तलाठी आर. जी. वंजारी, पी. जे. भिसे, कमलाकर काळोखे, संतोष भिलारे आदींनी आगीतील नुकसानीचे पंचनामे केले.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: