Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
मान्सून केरळमध्ये 6 जूनला धडकणार
ऐक्य समूह
Thursday, May 16, 2019 AT 11:01 AM (IST)
Tags: mn2
हवामान विभागाचा अंदाज; महाराष्ट्रात लांबणार
5पुणे, दि. 15 (प्रतिनिधी) : यंदा मान्सून केरळमध्ये चार दिवस उशिरा धडकणार, असा अंदाज स्कायमेट या खाजगी हवामान संस्थेने मंगळवारी वर्तवल्यानंतर भारतीय हवामान विभागानेही मान्सूनबाबत आपला अंदाज आज जाहीर केला. हवामान विभागाच्या अंदाजानुसार यंदा केरळमध्ये मान्सूनचे आगमन चार नव्हे तर सहा दिवस विलंबाने म्हणजे 6 जूनला होणार आहे. महाराष्ट्रातही मान्सूनचे आगमन लांबण्याची शक्यता आहे.
गेल्या वर्षी दुष्काळाने होरपळत असलेली भारतीय जनता व शेतकरी यंदा मान्सूनची चातकासारखी प्रतीक्षा करत असताना त्यांना उन्हाळ्यापासून लवकर दिलासा मिळणार नाही, हे सरकारी आणि खाजगी हवामान संस्थांच्या अंदाजातून स्पष्ट झाले आहे. यावर्षी मान्सून 6 जून रोजी केरळमध्ये दाखल होईल, असा अंदाज भारतीय हवामान विभागानं वर्तवला आहे.  
साधारणपणे केरळच्या किनारपट्टीवर मान्सूनचे आगमन मेअखेरीस किंवा 1 जूनला होते. मात्र, यंदा केरळमध्ये मान्सून 4 जून रोजी दाखल होण्याची चिन्हे आहेत, असा अंदाज ‘स्कायमेट’ या खाजगी हवामान संस्थेने काल (मंगळवार) व्यक्त केला होता. देशातील चारही प्रदेशांमध्ये तो सामान्य पाऊसमानापेक्षा कमी म्हणजे 93 टक्के असेल, असेही या संस्थेने सांगितले होते. त्यामध्ये पाच टक्के कमी-अधिक होऊ शकते, असेही स्कायमेटने म्हटले होते. त्यानंतर आज भारतीय हवामान विभागानेही मान्सूनचे केरळमधील आगमन उशिराने होणार असल्याचा अंदाज व्यक्त केला. केरळच्या किनारपट्टीवर मान्सून 6 जून रोजी धडकेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. केरळमध्ये मान्सूनचे आगमन झाल्यानंतर सहा ते सात दिवसांनी महाराष्ट्रातही दाखल होतो. यंदा केरळमध्येच मान्सून उशिराने दाखल होणार असल्याने त्याचे महाराष्ट्रातील आगमनही लांबणीवर पडण्याची चिन्हे आहेत.
मात्र, यंदा मान्सून सरासरीपेक्षा थोडा कमी म्हणजे 96 टक्के पडेल, असे भाकीत हवामान विभागाने वर्तवले आहे. मान्सूनसाठी पोषक वातावरण तयार होत असून अंदमान- निकोबार बेटांवर 18 ते 19 मेपर्यंत मान्सून पोहोचेल. तेथून केरळमध्ये मान्सून 10 दिवसांमध्ये पोहोचतो. मात्र, यंदा ‘अल-निनो’च्या प्रभावामुळे मान्सूनचा वेग मंदावून तो 6 जून रोजी केरळमध्ये  प्रवेश करेल. त्यात चार दिवसांची त्रुटी राहू शकते, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. गेल्या मोसमात महाराष्ट्रातील विदर्भ व मराठवाड्याला मोठा फटका बसला. यंदा मान्सूनकडे डोळे लावून बसलेल्या या भागातील शेतकर्‍यांना मान्सून प्रतीक्षा करायला लावणार, अशी शक्यता आहे. मध्य भारतात समावेश होणार्‍या विदर्भ, मराठवाडा, मध्य प्रदेशचा पश्‍चिम भाग आणि गुजरातमध्ये यंदा सरासरीच्या 91 टक्के पाऊस पडण्याची चिन्हे आहेत.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: