Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
नथुराम गोडसेबद्दलच्या वक्तव्याबद्दल माफीनामा
ऐक्य समूह
Friday, May 17, 2019 AT 10:59 AM (IST)
Tags: mn2
5भोपाळ, दि. 16 (वृत्तसंस्था) : महात्मा गांधींची हत्या करणार्‍या नथुराम गोडसेला देशभक्त म्हणणार्‍या साध्वी प्रज्ञासिंह ठाकूरच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर विरोधकांनी केलेला हल्लाबोल आणि पक्षाकडून कानउघाडणी झाल्यावर साध्वीने माघार घेतली आहे. या वक्तव्याबद्दल जाहीर माफी मागताना, पक्षाची भूमिका तीच माझी भूमिका आहे, असा सूर साध्वी प्रज्ञासिंहने आळवला.
तमिळनाडूतील ‘मक्कल निधी मय्यम’ पक्षाचे प्रमुख आणि अभिनेता कमल हसन यांनी ‘नथुराम गोडसे हा स्वातंत्र्योत्तर भारतातील पहिला दहशतवादी होता’, असे विधान केले होते. या वक्तव्यावरून प्रचंड गदारोळ झाला होता. त्याबाबत प्रतिक्रिया देताना साध्वी प्रज्ञाने हसन यांच्यावर निशाणा साधत ‘नथुराम गोडसे देशभक्त होते आणि राहतील’, असे म्हटले होते. त्यांना दहशतवादी म्हणणार्‍यांनी आधी स्वत:च्या आत डोकावून पहावे. अशा लोकांना या निवडणुकीतच योग्य उत्तर मिळेल, असे वक्तव्य साध्वीने केले होते.
त्यावरून मोठे वादळ उठले. काँग्रेससह विरोधी पक्ष साध्वी आणि भाजपवर तुटून पडले. भाजपने देशाच्या आत्म्यावरच आघात केला असून साध्वीने सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत. तिने माफ न करता येण्यासारखा गुन्हा केला आहे, अशी जळजळीत प्रतिक्रिया काँग्रेस प्रवक्ते रणदीप सूरजेवाला यांनी व्यक्त केली. अन्य विरोधी पक्षही साध्वी आणि भाजपवर तुटून पडले. हा वाद चिघळत असल्याचे पाहून भाजपने साध्वीची स्पष्ट  शब्दांत कानउघाडणी केली होती. साध्वींच्या या मताशी पक्ष सहमत नाही. त्यांनी याबाबत स्पष्टीकरण द्यावे आणि जाहीर माफी मागावी, असे भाजपचे प्रवक्ते जी. व्ही. एल. नरसिंह राव यांनी सुनावले. त्यानंतर साध्वीने आपले विधान मागे घेतले. माझी माझ्या पक्षावर निष्ठा आहे. मी पक्षाची कार्यकर्ती असून पक्षाची जी भूमिका आहे, तीच माझीही भूमिका आहे, असे स्पष्टीकरण साध्वी प्रज्ञाने दिले.
आयोगाने मागितला अहवाल
दरम्यान, साध्वी प्रज्ञासिंहने नथुराम गोडसेचे गोडवे गाणारे वक्तव्य केल्याबद्दल केंद्रीय निवडणूक आयोगाने मध्य प्रदेशच्या मुख्य निवडणूक अधिकार्‍यांकडून वस्तुस्थितीदर्शक अहवाल मागितला आहे. हा अहवाल उद्यापर्यंत सादर करण्याचे निर्देशही आयोगाने दिले आहेत.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: