Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
ग्रेड सेपरेटच्या कामामुळे सातार्‍यात धुळीचे लोट
ऐक्य समूह
Friday, May 17, 2019 AT 11:21 AM (IST)
Tags: lo1
- शशिकांत कणसे
5सातारा, दि. 16 : येथील पोवई नाक्यावर सुरू असणार्‍या ग्रेड सेपरेटरच्या कामामुळे सातार्‍यात धुळीचे लोट येऊ लागले आहेत. पोवई नाक्यावर वाहतूक नियंत्रण कक्षाजवळ खोदकाम करताना सापडलेल्या मातीचे कित्येक डंपर लावून ढिगावर ढीग लावून ठेवल्याने वार्‍यामुळे धूळ परिसरातील दुकानांमध्ये जात आहे. गेल्या दीड वर्षामध्ये सातार्‍यातील 30 टक्के नागरिकांना श्‍वसनाचा त्रास होऊ लागला असल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली.
डिसेंबर 2028 मध्ये ग्रेड सेपरेटरच्या कामास प्रत्यक्ष सुरुवात झाली. जेसीबीच्या साह्याने भुयारी मार्ग तयार करत असताना खोदकाम करताना जमिनीमधून मोठ्या प्रमाणावर माती निघाली. ही माती डंपरच्या साह्याने पोवई नाका येथील वाहतूक नियंत्रण कक्षाजवळ टाकण्यात आली. जस जशी माती निघेल तसतसे मातीच्या ढिगाची संख्या वाढत गेली. आज त्या ठिकाणी जवळपास 25 ते 30 डंपर मातीचा ढीग लावण्यात आला आहे. सिव्हिल हॉस्पिटलकडून येणार्‍या वाहनांसाठी राजवाड्याकडे जाण्यासाठी रस्ता खुला केला आहे. हा रस्ता करताना हेम एजन्सी ते पोवई नाक्यापर्यंत रस्त्याचे डांबरीकरण करण्यात न आल्याने कच्च्या रस्त्यावर वार्‍याने ढिगारे लावलेली माती येत असल्याने वाहन चालवताना वाहन चालकांना धुळीच्या समस्येला सामोरे जावे लागत आहे. या मातीच्या ढिगार्‍यांमुळे परिसरात असणार्‍या दुकानांमध्ये मोठ्या प्रमाणावर धुळीचे साम्राज्य होऊ लागले आहे. या परिसरामधून वाहन चालवताना महिलावर्ग डोळ्याला गॉगल आणि नाकाला रुमाल बांधूनच जात असतात. मात्र पुरुषांकडून ही काळजी घेतली जात नसल्याने त्यांना श्‍वसनाचा त्रास होऊ लागला.
अशीच परिस्थिती पोवई नाका येथील आयडीबीआय  बँकेच्या समोर असणार्‍या रस्त्याची झाली आहे. या रस्त्यावर धुळीचे साम्राज्य निर्माण झाले असून ही धूळ बेकरी, हॉटेल, फूल विक्रेते, दूध विक्रेते यांच्या दुकानांमध्ये जाऊन बसत असल्याने दुकान स्वच्छतेसाठी स्वतंत्र माणूस ठेवण्याची नामुष्कीजनक त्यांच्यावर येऊन ठेपली आहे. अशीच परिस्थिती कराडकडे, कोरेगावकडे जाणार्‍या रस्त्याची आहे. अन्य पर्यायी मार्ग नसल्याने वाहनचालकांना या धुळीने माखलेल्या आणि कच्चा रस्त्यावरूनच प्रवास करावा लागत आहे. याबाबत पोवई नाक्यावर असणार्‍या काही वैद्यकीय सूत्रांकडून चौकशी केली असता गेल्या दीड वर्षांमध्ये या परिसरात लोकांना श्‍वसनाचा त्रास होत असल्याच्या तक्रारी वाढू लागल्या आहेत. ग्रेड सेपरेटरच्या कामामुळे सातार्‍यातील साधारण 30 टक्के नागरिकांमध्ये श्‍वसनाचा त्रास होत असल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली.
यावर्षी मान्सून वेळेवर येणार असल्याचे संकेत प्राप्त होत आहेत. पाऊस सुरू होण्यापूर्वी ग्रेड सेपरेटरच्या जवळील कच्च्या रस्त्यांचे डांबरीकरण न केल्यास पावसाळ्यात सातारकरांसह या रस्त्यांवरून प्रवास करणार्‍या वाहनचालकांची मोठी परवड होणार आहे. पोवई नाक्यावर लावण्यात आलेले मातीचे ढीग पावसाळ्यापूर्वी न नेल्यास तेथील परिसरात असणार्‍या रस्त्यांवर पावसाने ही माती वाहून जाऊन रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच चिखलामुळे अपघाताच्या घटना घडण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढण्यास मदत होण्याची भीती व्यक्त होत आहे. संबंधित ठेकेदार कंपनीने पावसाळा सुरू होण्यापूर्वी पोवई नाक्यावरील मातीचे ढिगारे हलवून त्या परिसरातील कच्च्या रस्त्यांचे डांबरीकरण करावे, अशी मागणी वाहन चालकांमधून होऊ लागली आहे.
नागरिकांनी याची काळजी घ्यावी...
3पोवई नाका परिसरात वास्तव्य करीत असलेल्या नागरिकांनी आपल्या घराच्या अथवा फ्लॅटच्या खिडक्या शक्यतो उघडू नये त्यामुळे धूळ घरामध्ये येण्यास मज्जाव होण्यास मदत होईल.
3घरातील छोट्या बालकांना धुळीचा प्रादुर्भाव होणार नाही, त्यादृष्टीने उपाययोजना केल्यास बाळाला श्‍वसनाचा त्रास होणार नाही.
3ज्या ठिकाणी धुळीचा प्रादुर्भाव अधिक आहे, तेथे साधारण दिवसातून तीन वेळा स्वच्छता करणे आवश्यक आहे.
3घरामध्ये अथवा फ्लॅटमध्ये उघड्यावर भाजीपाला,
फळे ठेवू नयेत. लहान मुलांना खेळण्यासाठी गॅलरी अथवा
पार्किंगमध्ये पाठवू नये. त्यामुळे त्यांचे धुळीपासून संरक्षण होण्यास मदत होईल.
© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: