Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
निकालापूर्वीच विरोधकांचे गुडघ्याला बाशिंग
ऐक्य समूह
Friday, May 17, 2019 AT 11:00 AM (IST)
Tags: na2
सोनियांनी 23 मेला बोलावली विरोधी नेत्यांची बैठक
5नवी दिल्ली, दि. 16 : लोकसभा निवडणुकीचे निकाल लागण्यापूर्वीच विरोधकांनी गुडघ्याला बाशिंग बांधले आहे. भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी काँग्रेसने कंबर कसली असून यूपीएच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी बिगररालोआ पक्षांच्या नेत्यांची बैठक 23 मे रोजी मतमोजणीच्या दिवशी बोलावली आहे. या निवडणुकीत भाजपला बहुमतापर्यंत पोहोचण्यासाठी बर्‍याच जागा कमी पडतील, असा काँगे्रसचा होरा आहे.
सोनिया गांधी यांनी रालोआमध्ये नसलेल्या धर्मनिरपेक्ष आणि समविचारी पक्षांच्या नेत्यांना 23 मे रोजीच्या बैठकीचे निमंत्रण दिले आहे. त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार, द्रमुकचे प्रमुख एम. के. स्टॅलिन, राष्ट्रीय जनता दल आणि तृणमूल काँग्रेसच्या नेत्यांचा समावेश आहे. विरोधकांशी समन्वय साधण्यासाठी काँग्रेसच्या चार वरिष्ठ नेत्यांची एक समिती बनवण्यात आली आहे. ही समिती सर्व प्रमुख नेत्यांशी समन्वय साधून त्यांचे मुद्दे जाणून घेईल, अशी माहिती सूत्रांनी दिली. या समितीत अहमद पटेल, पी. चिदम्बरम, गुलाम नबी आझाद आणि अशोक गेहलोत यांचा समावेश आहे. हे नेते समविचारी पक्षांच्या नेत्यांशी बोलणी करून निवडणुकीनंतर आघाडीसाठी प्रयत्न करतील, असे सूत्रांनी सांगितले.
सत्ता स्थापनेची कुठलीही संधी काँग्रेसला गमवायची नसल्याने
कुंपणावर असलेल्या पक्षांच्या नेत्यांनाही गळ घालण्याची तयारी काँग्रेसने सुरू केली आहे. त्यामध्ये तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांचा समावेश आहे. राव यांनी अलीकडेच केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन आणि द्रमुकचे प्रमुख एम. के. स्टॅलिन यांची भेट घेऊन तिसरी आघाडी स्थापन करण्याबाबत चर्चा केली होती. मात्र, स्टॅलिन यांनी तिसर्‍या आघाडीचा पर्याय शक्य नसल्याचे स्पष्ट केल्याने चंद्रशेखर राव यांची भूमिका बदलण्याची शक्यता आहे. त्यामुळे सोनियांनी चंद्रशेखर राव आणि वायएसआर काँग्रेसचे नेते जगनमोहन रेड्डी यांनाही निमंत्रित केल्याचे वृत्त आहे. मात्र, या वृत्ताला अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. जगनमोहन रेड्डी यांना समवेत घेण्याचा काँग्रेसचा प्रयत्न आंध्रचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांना अस्वस्थ करू शकतो. कारण आंध्र विधानसभेच्या निवडणुकीत त्यांचा मुकाबला थेट वायएसआर काँग्रेसबरोबर आहे. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ व अन्य एका ज्येष्ठ काँग्रेस नेत्यावर बिजू जनता दलाचे नेते नवीन पटनायक यांना राजी करण्याची जबाबदारी सोपवण्यात आल्याचे समजते. भाजपला लोकसभा निवडणुकीत बहुमत मिळणार नाही, असा काँग्रेसचा ठाम विश्‍वास आहे. त्यामुळे त्रिशंकू स्थिती निर्माण झाल्यास भापला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी काँग्रेसने प्रयत्न सुरू केले आहेत. यूपीएच्या अध्यक्षा असलेल्या सोनिया गांधी यंदाच्या निवडणुकीच्या प्रचारात फारशा कोठेच दिसल्या नाहीत. त्याऐवजी त्या शांतपणे विरोधकांची मोट बांधण्याच्या प्रयत्नात आहेत.
विरोधकांना लाडीगोडी लावण्याचा प्रयत्न
दरम्यान, विरोधकांना लाडीगोडी लावण्यासाठी काँग्रेसने प्रसंगी पंतप्रधानपदावर दावा न करण्याचेही ठरवले आहे. या मुद्द्यावर काँगे्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांनी आज महत्त्वाचे वक्तव्य केले. लोकसभा निकालानंतर त्रिशंकू अवस्था निर्माण झाल्यास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी आम्ही पंतप्रधानपदही सोडायला तयार आहोत. आघाडी सरकारमध्ये आम्हाला पंतप्रधानपद नाही मिळाले तरी अडचण नाही. रालोआ सरकारला सत्तेपासून दूर ठेवणे, हेच उद्दिष्ट आहे, असे आझाद म्हणाले. काँग्रेसच्या बाजूने सर्व मित्र पक्ष उभे राहणार असतील तर आम्ही देशाचे नेतृत्व करायला तयार आहोत. मात्र, ते आमचे उद्दिष्ट नाही. रालोआ सरकारला सत्तेपासून दूर ठेवणे हेच आमचे लक्ष्य आहे. आम्हाला बहुमताचा निर्णय मान्य असेल, असेही त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, केंद्रात चांगले यश मिळेल, याची खात्री काँग्रेसला नसल्यानेच आझाद यांना पुढे करून आम्ही पंतप्रधानपद सोडायला तयार असल्याचे विरोधकांवर बिंबवण्याचे काँग्रेसचे प्रयत्न आहेत, असे सूत्रांनी सांगितले.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: