Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
दुष्काळी भागात विविध उपाययोजनांना गती
ऐक्य समूह
Saturday, May 18, 2019 AT 11:07 AM (IST)
Tags: mn2
रोहयोच्या प्रस्तावांना तीन दिवसात मान्यता मिळणार
5मुंबई, दि. 17 (प्रतिनिधी) : रोजगार हमी योजनेखाली कामांच्या मागणीचे प्रस्ताव आल्यास तीन दिवसात संबंधित प्रशासकीय यंत्रणेकडून अशा प्रस्तावांना मान्यता देण्यात येणार असून या संदर्भात कुचराई करणार्‍यांवर कारवाई करण्यात येणार आहे. दुष्काळी भागातील शिधापत्रिका उपलब्ध नसलेल्या शेतकरी व शेतमजुरांना शिधापत्रिकांचे तातडीने वितरित करण्यासह शेळ्या-मेंढ्यांसाठीही प्रायोगिक तत्त्वावर छावण्या सुरू करण्याचा निर्णय आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला.
राज्यातील दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी विविध उपाययोजना राबविण्यात येत असून त्यांचा व्यापक आढावा आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. दुष्काळाची स्थिती आणि त्यावरील उपाययोजनांबाबत या बैठकीत
विस्ताराने चर्चा झाली. रोजगार हमी योजनेंतर्गत राज्यात सध्या 36 हजार 660 कामे सुरू असून त्यावर तीन लाख 40 हजार 352 मजूर काम करीत आहेत. या शिवाय शेल्फवर पाच लाख 74 हजार 430 कामे आहेत. गेल्या आठवड्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ऑडिओ ब्रिजच्या माध्यमातून दुष्काळी जिल्ह्यांमधील सरपंचांशी संवाद साधला होता. त्यावेळी अनेकांनी रोजगार हमी योजनेच्या कामांचे प्रस्ताव मार्गी लागत नसल्याची तक्रार केली होती. हा संदर्भ घेऊन रोजगार हमी योजनेंतर्गत मागणी करण्यात येणार्‍या कामांचे प्रस्ताव तीन दिवसात मंजूर करण्यात यावेत अन्यथा संबंधितांवर कारवाई करण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले. शेळ्या-मेंढ्यांसाठी प्रायोगिक तत्त्वावर छावण्या सुरू करण्यात येणार असल्याने या लहान जनावरांनाही दुष्काळात मदत मिळणार आहे. राज्य शासनाने दुष्काळग्रस्त भागातील जनतेला दिलासा देण्यासाठी डिसेंबर 2018 मधील निर्णयानुसार दुष्काळ जाहीर झालेल्या भागातील साडेआठ लाख कुटुंबे आणि 35 लाख व्यक्तींना अन्नसुरक्षा योजनेत नव्याने समाविष्ट केले आहे. विदर्भ व मराठवाड्यातील शेतकरी आत्महत्याग्रस्त असलेल्या 14 जिल्ह्यांमधील 60 लाख शेतकर्‍यांना या अगोदरच अन्नसुरक्षा योजनेचा लाभ देण्यात येत आहे. दुष्काळग्रस्त गावातील शिधापत्रिका उपलब्ध नसणार्‍या नागरिकांना त्यांच्या वार्षिक उत्पन्नानुसार देय प्रवर्गातील शिधापत्रिका तत्काळ देण्याची कार्यवाही करण्याचे आदेशही आज देण्यात आले. दुष्काळामुळे स्थलांतरित झालेल्या नागरिकांना पोर्ट्याबिलिटी (झेीींरलळश्रळीूं) सुविधेचा वापर करून अन्नधान्य उपलब्ध करून देण्यात येत आहे. राज्यात सध्या 13 हजार 801 गावे व वाड्यांना 5493 टँकर्सने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. यावर्षी टँकर्सच्या संख्येत वाढ करण्याच्या मागणी संदर्भात वर्ष 2018 च्या अंदाजित लोकसंख्येचा विचार करून अद्ययावत नियोजन करण्यात आले आहे. राज्यात सर्वाधिक टँकर्स औरंगाबाद विभागात सुरू आहेत. या विभागात 2824 गावे व वाड्यांना 2917 टँकर्सने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. दुष्काळग्रस्त भागातील जनावरांना चारा व पाणी उपलब्ध होण्यासाठी 1429 ठिकाणी चारा छावण्या सुरू करण्यात आल्या आहेत. या छावण्यांमध्ये 8 लाख 42 हजार 150 मोठी आणि एक लाख दोन हजार 630 लहान जनावरे आहेत. राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाच्या निकषापेक्षा जास्त दराने मदत देण्यात येत असून या मदतीत 15 मेपासून पुन्हा वाढ करण्यात आली आहे.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: