Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
काळंगवाडी येथे जन्मदात्रीवर बलात्कार
ऐक्य समूह
Saturday, May 18, 2019 AT 11:27 AM (IST)
Tags: re2
आई व मुलाच्या पवित्र नात्याला कलंक लावणारी घटना
5भुईंज, दि. 17 : काळंगवाडी, ता. वाई येथे गुरूवारी रात्री मुलानेच आईवर बलात्कार केल्याची घटना घडली. यामध्ये वडिलांनी हस्तक्षेप केल्यानंतर त्यांनाच दगडाने मारहाण करून जखमी केले. या घटनेमुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली असून भुईंज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, या घटनेने आई आणि मुलाच्या पवित्र नात्याला काळीमा फासला गेल्याने संतापाची लाट उसळली आहे.
याबाबत भुईंज पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, की पीडित महिला पतीसमवेत एका लग्न समारंभास गेली होती. लग्न समारंभ झाल्यानंतर पीडिता एकट्याच घरी आल्या. यावेळी त्यांचा 28 वर्षांचा मुलगा घराच्या ओठ्यावर बसला होता. आई घरात गेल्यावर मुलगा घरात गेला व त्याने आतून कडी लावली. यावेळी त्याने जबरदस्तीने आईवर बलात्कार केला. आईने आरडाओरडा सुरू केल्याने परिसरातील शेजारी तेथे जमा झाले. त्यांनी संशयित मुलाच्या वडिलांना याची माहिती दिली. त्याच्या वडिलाने यामध्ये हस्तक्षेप केला असता त्याने वडिलांनाही दगड मारून जखमी केले. घटनेनंतर पीडित महिलेने भुईंज पोलीस ठाण्यात धाव घेतली. घटनेची माहिती ऐकून पोलीसही हादरून गेले. संशयितास भुईंज पोलिसांनी ताब्यात घेतले असून शुक्रवारी दुपारी न्यायालयात हजर केले असता त्याला न्यायालयाने तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. पीडिता व तिच्या पतीला क्रांतिसिंह नाना पाटील जिल्हा सर्व साधारण रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनेची नोंद भुईंज पोलिसात झाली असून सपोनि. श्याम बुवा यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलीस उपनिरीक्षक अमृता राजपूत तपास करत आहेत.
तालुक्याच्या पूर्व भागात संतापाची लाट
संशयितास दारूचे व्यसन होते. त्याच्या या कृत्याने वाई तालुक्याच्या पूर्व भागातील जनता संतप्त झाली असून शुक्रवारी दिवसभर या घटनेची चर्चा पाचवड व भुईंजसह परिसरात होती.
© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: