Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
मोदींनी माझ्या प्रश्‍नांची उत्तरे द्यावीत ः राहुल गांधी
ऐक्य समूह
Saturday, May 18, 2019 AT 11:29 AM (IST)
Tags: na2
5नवी दिल्ली, दि. 17 (वृत्तसंस्था) ः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाच वर्षांमध्ये प्रथमच पत्रकार परिषद घेतली, ही अभूतपूर्व घटना आहे. त्यांनी आधी मी उपस्थित केलेल्या प्रश्‍नांची उत्तरे द्यावीत, असा टोला काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी लगावला. लोकसभा निवडणूक निकालांच्या चार-पाच दिवस आधी पंतप्रधान नरेंद्र मोदी पत्रकार परिषद घेत असल्याबद्दल राहुल गांधी यांनी आश्‍चर्य व्यक्त केले. काँग्रेस मुख्यालयात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत राहुल गांधी बोलत होते.
नोटाबंदी, राफेल घोटाळा, जीएसटी, बेरोजगारी, अनिल अंबानी या प्रकरणी मी उपस्थित केलेल्या प्रश्‍नांची पंतप्रधान मोदी यांनी उत्तरे द्यावीत. पंतप्रधान मोदी यांची विचारसरणी महात्मा गांधींनी दाखवलेल्या अहिंसेच्या मार्गाची नसून, हिंसेची आहे, अशी बोचरी टीका राहुल गांधी यांनी केली. पंतप्रधानांच्या निर्देशाप्रमाणे निवडणूक आयोगाने काम केले. निवडणूक आयोगाने पक्षपात केल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केला. पंतप्रधान मोदी यांनी माझ्यावर कितीही टीका केली, नकारात्मक गोष्टी पसरवल्या तरी मी त्यांना प्रेम देत राहीन. पंतप्रधानांच्या कुटुंबीयांपैकी कुणीही राजकारणात नाही. मी त्यांच्याबाबत काहीही बोलणार नाही. मात्र, त्यांना माझ्या कुटुंबीयांबद्दल बोलायचे असेल तर तो त्यांचा प्रश्‍न आहे, असे राहुल गांधी म्हणाले.  
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पक्षाकडे पैशाची कमतरता नाही. त्यांच्याकडे पैसा असला तरी आमच्याकडे सत्य आहे आणि सत्याचा विजय निश्‍चित आहे, असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला. या निवडणुकीत काँग्रेसने आणि पक्षाच्या नेत्यांनी चांगले काम केले. भाजपचा भ्रष्टाचार आम्ही जनतेसमोर आणला. अनेक मुद्द्यांवरून पंतप्रधान मोदी आणि भाजपला कोंडीत पकडले. 23 मे रोजी जाहीर होणार्‍या निकालानंतर कोणाची सत्ता स्थापन होईल, याचे चित्र स्पष्ट होईल. जनतेने कौल दिला आहे. मात्र, त्याचा अंदाज आम्ही आताच बांधणार नाही. लोकांनी काय ठरवले आहे, ते 23 मेला स्पष्ट झाल्यानंतर आम्ही त्यानुसार निर्णय घेऊ, असेही राहुल गांधी यांनी सांगितले. भाजपच्या पत्रकार परिषदेत नरेंद्र मोदींनी पत्रकारांचे आभार मानले. मात्र, त्यांनी एकाही प्रश्‍नाला उत्तर दिले नाही. एक प्रश्‍न विचारण्यात आला, तेव्हा ते म्हटले, की अमित शहा हेच उत्तर देतील. हाच मुद्दा पुढे आणत राहुल गांधी यांनी शहा आणि मोदी यांच्यावर निशाणा साधला. निदान पुढच्या पत्रकार परिषदेत ती अमित शहा हे मोदींना किमान दोन प्रश्‍नांची उत्तरे देऊ देतील, असे खोचक ट्विट राहुल गांधी यांनी केले.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: