Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
पूर्ण बहुमताने पुन्हा सत्तेत येणार : मोदी
ऐक्य समूह
Saturday, May 18, 2019 AT 11:09 AM (IST)
Tags: na1
पाच वर्षांनी पहिलीच पत्रकार परिषद; प्रश्‍न टाळले
5नवी दिल्ली, दि. 17 (वृत्तसंस्था) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी अचानक भाजप अध्यक्ष अमित शहा घेत असलेल्या पत्रकार परिषदेला हजेरी लावत पत्रकारांना आश्‍चर्याचा धक्का दिला. मात्र, पक्षशिस्त महत्त्वाची आहे, असे सांगत पत्रकारांच्या प्रश्‍नांना उत्तरे देणे टाळले. त्यांच्याऐवजी अमित शहा यांनीच सर्व प्रश्‍नांना उत्तरे देत मोदी सरकारच्या गेल्या पाच वर्षांमधील कामाचे प्रगतीपुस्तक मांडले. दरम्यान, पूर्ण बहुमतासह रालोआ पुन्हा सत्तेत येईल. देशाच्या इतिहासात प्रदीर्घ कालावधीनंतर असे घडेल, असा विश्‍वास पंतप्रधानांनी या मॅरेथॉन पत्रकार परिषदेत व्यक्त केला. अमित शहा यांनीही यंदा भाजप तीनशेहून अधिक जागा जिंकेल, असा आत्मविश्‍वास व्यक्त केला.
मोदींनी पत्रकार परिषदेला सामोरे जावे, असे आव्हान काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्याकडून वारंवार दिले जात असताना मोदी हे आपल्या पंतप्रधानपदाच्या कार्यकाळातील पहिल्याच पत्रकार परिषदेला भाजपच्या मुख्यालयात उपस्थित राहिले. त्यांनी गेल्या पाच वर्षांतील कामगिरीचा धावता आलेख मांडत निवडणुकीच्या प्रचारात आलेले अनुभव सांगितले. मात्र, पत्रकारांच्या प्रश्‍नांवर पक्षाध्यक्ष अमित शहा यांच्याकडे बोट दाखवले. एका प्रश्‍नाला मोदींनी उत्तर द्यावे, असा आग्रह पत्रकारांनी धरला असता, भाजप हा शिस्तीचा पक्ष असून आम्ही पक्षाचे शिस्तबद्ध सैनिक असल्याचे मोदी म्हणाले. ही पत्रकार परिषद पक्षाध्यक्षांनी घेतली असून भाजपच्या पद्धतीनुसार शिस्त पाळणे महत्त्वाचे आहे, असे सांगत मोदींनी उत्तर देणे टाळले.
मी थेट मध्य प्रदेशातून तुम्हाला भेटायला येथे आलो आहे, असे सांगत पंतप्रधानांनी पत्रकारांशी संवाद साधला. ही निवडणूक उत्साहपूर्ण वातावरणात झाली. यावेळीही सकारात्मकता पाहायला मिळाली. त्यामुळेच पूर्ण बहुमत असलेले आपले सरकार पुन्हा एकदा बहुमताने जिंकणार, हे निश्‍चित आहे. देशात बर्‍याच कालावधीनंतर असे घडताना दिसत आहे, असे ते म्हणाले. आम्ही शेवटच्या माणसापर्यंत प्रत्येक योजनेचा लाभ पोहोचण्याचा प्रयत्न केला. भारताच्या लोकशाहीत जगाला प्रभावित  करण्याची ताकद असल्याचे ते म्हणाले.
2009 आणि 2014 मध्ये सार्वत्रिक निवडणुका झाल्या तेव्हा आयपीएल स्पर्धा देशाबाहेर न्यावी लागली होती. यंदा मात्र तसे झाले नाही. निवडणुकीसोबतच आयपीएल स्पर्धा, रमझान, हनुमान जयंती अशा सगळ्याच गोष्टी सुरळीतपणे पार पडत आहेत. मजबूत सरकार असेल तर असेच होणार, असे मोदी म्हणाले. गेल्या वेळी जनतेने दिलेल्या आशीर्वादाबद्दल त्यांचे आभार मानण्यासाठीच यंदाच्या निवडणुकीत प्रचार करायचा, असे मी ठरवले होते. माझ्यासाठी निवडणूक प्रचार हा जनतेला धन्यवाद देण्यासाठी होता. जनतेचाही मोठा प्रतिसाद लाभला. पाच वर्षांत देशाने अनेक चढउतार पाहिले; पण देश माझ्यासोबत राहिला. ही पत्रकार परिषद आभार मानण्यासाठीच आहे, असेही ते म्हणाले.
गेल्या वेळी 16 मे रोजी निकाल येऊन 17 मे रोजी प्रामाणिक सरकार सत्तेवर आले. त्यावेळी आलेल्या निकालांमुळे सगळे सट्टेबाज बुडले होते. इमानदारीची खरी सुरुवात 17 मे रोजीच झाली होती. आजही 17 मे हीच तारीख असून प्रचाराची रणधुमाळी आज संपली आहे, असेही ते म्हणाले.
साध्वी प्रज्ञाला माफ करणार नाही
दरम्यान, भोपाळमधील पक्षाच्या उमेदवार साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांनी महात्मा गांधींचा मारेकरी नथुराम गोडसे याच्याबाबत केलेल्या वक्तव्यावर मोदींनी तीव्र नाराजी व्यक्त केली. साध्वी प्रज्ञा यांनी भलेही माफी मागितली असेल, पण मी मनापासून त्यांना कधीही माफ करू शकणार नाही, असे एका खासगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत मोदी म्हणाले. बापूजींबाबत जी विधाने केली जात आहेत, ती वाईट, घृणास्पद आहेत. त्या लोकांना आम्ही अशी शिक्षा देऊ की, पुन्हा असे बोलतानाा 100 वेळा विचार करावा लागेल, असे त्यांनी नमूद केले.
जनतेनेे मोदींना स्वीकारले आहे : शहा
या पत्रकार परिषदेत अमित शहा यांनी पक्षाची प्रचार मोहीम आणि रालोआ सरकारच्या गेल्या पाच वर्षांमधील कामाचे प्रगतीपुस्तक मांडले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील रालोआ सरकारने पाच वर्षांत 133 योजना आणून त्या तळागाळापर्यंत पोहचवल्या. समाजातील प्रत्येक घटकाला न्याय देत सरकारने वाटचाल केली. भाजपचा हा ‘नरेंद्र मोदी एक्स्पिरिमेंट’ जनतेने स्वीकारला आहे. यापुढेही हा प्रयोग जनता स्वीकारणार आहे. गेल्या वेळेपेक्षा मोठ्या बहुमताने केंद्रात पुन्हा रालोआ सरकार येणार आहे, असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला. भ्रष्टाचार आणि महागाई हे मुद्दे प्रचारात नाहीत, अशी ही पहिलीच निवडणूक आहे. भाजपच्या दृष्टीने सर्वाधिक आव्हानात्मक अशी ही निवडणूक होती. मात्र, प्रचाराची एकंदर व्याप्ती व त्याला जनतेचा मिळालेला प्रतिसाद पाहता मोदी सरकार पुन्हा सत्तेत येणार ही आमची खात्री आहे. प्रचारात भाजप कार्यकर्त्यांपेक्षा जनताच आघाडीवर होती, असे शहा म्हणाले.
पश्‍चिम बंगालमधील हिंसाचाराला ममता बॅनर्जीच जबाबदार आहेत, असा आरोप शहा यांनी केला. तिथे दीड वर्षांत भाजपचे 80 कार्यकर्ते मारले गेले आहेत. त्यावर ममतांकडे काय उत्तर आहे, असा सवाल शहा यांनी केला. दरम्यान, दिल्लीत एसी केबिनमध्ये दोन नेते भेटले आणि त्यांनी एकजूट दाखवली म्हणून जनता त्यांच्यामागे जाईल, हे आता विसरा. जनता सुज्ञ आहे, असा टोला शहा यांनी विरोधकांना लगावला. राफेल कराराबाबत राहुल गांधींनी केलेल्या प्रश्‍नाबद्दल बोलताना, राहुल गांधी यांनी सर्वोच्च न्यायालयात त्यांच्याकडे असलेली सर्व कागदपत्रे सादर करवीत, असे शहा म्हणाले. राफेल करारात कोणतीही तडजोड करण्यात आलेली नाही. या करारात एका पैशाचाही भ्रष्टाचार झालेला नाही, असा दावा शहा यांनी केला. साध्वी प्रज्ञासिंहवर मोठ्या कारवाईचे संकेतही त्यांनी दिले. त्यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्य
प्रकरणी कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. पक्षाच्या शिस्तपालन समितीकडे प्रकरण सोपवण्यात आले आहे. साध्वींना उत्तर देण्यासाठी 10 दिवसांचा अवधी देण्यात आला आहे. दहा दिवसांनी पक्षाकडून करण्यात आलेली कारवाई सर्वांसमोर असेल, असे ते म्हणाले. भगव्या दहशतवादासंदर्भात पसरवली जाणारी खोटी माहिती आणि खोट्या प्रचाराविरोधात आम्ही सत्याग्रह करत आहोत. त्याचाच भाग म्हणून साध्वी प्रज्ञासिंह यांना पक्षाकडून उमेदवारी देण्यात आली, असे शहा यांनी स्पष्ट केले.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: