Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
लोकसभेच्या प्रचाराची रणधुमाळी संपली
ऐक्य समूह
Saturday, May 18, 2019 AT 11:06 AM (IST)
Tags: mn1
अखेरच्या टप्प्यात उद्या मतदान; ‘एक्झिट पोल’कडे लक्ष
5नवी दिल्ली, दि. 17 (वृत्तसंस्था) : सात टप्प्यांमध्ये होत असलेल्या  लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी शुक्रवारी संपुष्टात आली असून आता सातव्या व शेवटच्या टप्प्यासाठी रविवारी (दि. 19) आठ राज्यांमधील 59 जागांवर मतदान होणार आहे. अखेरच्या टप्प्यातील 50 जागांसाठी निवडणूक प्रचार शुक्रवारी सायंकाळी संपला तर निवडणूक आयोगाने घटनेच्या अनुच्छेद 324 मधील तरतुदींचा वापर करून पश्‍चिम बंगालमधील 9 जागांसाठी प्रचाराची मुदत वीस तासांनी कमी केली होती. त्यामुळे तेथील प्रचार काल रात्री दहा वाजताच संपुष्टात आला होता. दरम्यान, रविवारी मतदान प्रक्रिया संपल्यानंतर सायंकाळपासून विविध वाहिन्या व संस्थांचे ‘एक्झिट पोल’ यायला सुरुवात होणार असल्याने संपूर्ण देशाचे लक्ष त्याकडे लागले असेल. सर्व सात टप्प्यांची एकत्रित मतमोजणी 23 मे रोजी होणार आहे.
शेवटच्या टप्प्यात उत्तर प्रदेश आणि पंजाब (प्रत्येकी 13), पश्‍चिम बंगाल (9), बिहार आणि मध्य प्रदेश (प्रत्येकी 8), झारखंड (3), हिमाचल प्रदेश (4) ही राज्ये आणि चंदीगड (1) या केंद्रशासित प्रदेशात रविवारी मतदान होणार आहे. पंजाबमध्ये लोकसभेच्या एकूण 13 जागा असून तेथे सातव्या व एकाच टप्प्यात मतदान होत आहे तर उत्तर प्रदेशात निवडणुकीचे सर्व सात टप्पे होते.
सात राज्ये व चंदीगड येथील निवडणूक प्रचार आज सायंकाळी 5 वाजता संपला असला तरी कोलकाता येथे मंगळवारी झालेल्या हिंसाचाराची दखल घेऊन निवडणूक आयोगाने पश्‍चिम बंगालमध्ये 9 जागांसाठी प्रचाराच्या वेळेत कपात केली होती. त्यामुळे तेथील प्रचार गुरुवारी रात्री संपला. आता शेवटच्या टप्प्यात रविवारी होणार्‍या मतदानानंतर 918 उमेदवारांचे भवितव्य मतदान यंत्रांमध्ये बंद होईल.
सातव्या टप्प्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाराणसी लोकसभा मतदारसंघाचाही समावेश आहे. तेथे काँग्रेसकडून अजय राय आणि सप-बसप आघाडीच्या शालिनी यादव निवडणूक रिंगणात आहेत. या मतदारसंघातून बीएसएफचे माजी जवान तेजबहादूर यादव यांनीही उमेदवारी अर्ज दाखल केला होता. 
मात्र, त्यांचा उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकार्‍यांनी फेटाळला होता. शेवटच्या टप्प्यात अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. त्यामध्ये पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीरसिंग बादल, त्यांची पत्नी व केंद्रीय मंत्री हरसिमरत कौर, केंद्रीय मंत्री हरदीप पुरी, पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंग बादल यांची पत्नी प्रणीत कौर, हिमाचल प्रदेशमधून भाजपचे खासदार अनुराग ठाकूर, झारखंडमध्ये माजी मुख्यमंत्री शिबू सोरेन, चंदीगडमध्ये माजी केंद्रीय मंत्री पी. के. बंसल, भाजपच्या खासदार किरण खेर, पंजाबमध्ये अभिनेता सनी देओल (भाजप), सोम प्रकाश, गोरखपूर येथून अभिनेता रवि किशन (भाजप, पाटणा साहिबमधून केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद (भाजप) व अभिनेता शत्रुघ्न सिन्हा (काँग्रेस), मंदसौरमधून राहुल गांधींच्या विश्‍वासू मीनाक्षी नटराजन यांचा समावेश आहे. शेवटच्या टप्प्यातील प्रचारात पश्‍चिम बंगालमध्ये हिंसाचार झाला. त्यामुळे 9 लोकसभा मतदारसंघ सर्वाधिक चर्चेत राहिले. तेथे भाजप आणि तृणमूल यांच्यात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी आणि धुमश्‍चक्री पाहायला मिळाली. राज्यात शिरकाव करण्यासाठी भाजपने जोरदार प्रयत्न केले असून भाजपा रोखतानाच तृणमूलचा गड शाबूत ठेवण्यासाठी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनीही पूर्ण ताकद पणाला लावली आहे. उत्तर प्रदेशात पंतप्रधानांचा मतदारसंघ असलेल्या वाराणसीचा अपवाद वगळता इतरत्र भाजप आणि सप-बसप आघाडीत चुरशीची लढत अपेक्षित आहे. या टप्प्यात मतदान प्रक्रियेसाठी निवडणूक आयोगाने एक लाख 12 हजार मतदान केंद्रे स्थापन केली असून पुरेशा प्रमाणात ईव्हीएम, व्हीव्हीपॅट मशीन उपलब्ध करून दिली आहेत. शेवटच्या टप्प्याचे मतदान संपल्यानंतर सगळ्यांचे डोळे सायंकाळी विविध वृत्तवाहिन्या आणि संस्थांकडून जाहीर होणार्‍या ‘एक्झिट पोल’कडे लागले असतील. या मतदानोत्तर चाचण्या उमेदवारांची आणि विविध पक्षांच्या नेत्यांची धाकधूक वाढवणार्‍या असतील. प्रत्यक्ष 23 तारखेला मतमोजणी सुरू होईपर्यंत सर्वच नेत्यांचे जीव टांगणीला लागलेले असतील.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: