Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
वाई येथे विजेच्या खांबावरून पडून वरिष्ठ तंत्रज्ञ जखमी
ऐक्य समूह
Thursday, June 06, 2019 AT 11:10 AM (IST)
Tags: re3
5वाई, दि. 5 : महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीचे वाई शहर शाखा कार्यालय क्र. 2 मधील वरिष्ठ तंत्रज्ञ महेश दत्तात्रय कर्णे (वय 35), हा बुधवार, दि. 5 रोजी सकाळी 8.30 च्या सुमारास विजेच्या खांबावर काम करत असताना विजेचा धक्का बसून तो गंभीर जखमी झाला. त्याच्यावर गीतांजली हॉस्पिटलमध्ये प्राथमिक उपचार करून सकाळी सह्याद्री हॉस्पिटल, पुणे येथे हलविण्यात आले.
याबाबत सविस्तर माहिती अशी, की यशवंतनगर येथील गणेश लो इन्कम हौसिंग सोसायटीच्या खालील नदीच्या बाजूस असलेल्या हायटेन्शन लाइनची तार रात्री 2.30 च्या सुमारास अचानकपणे तुटल्याने संपूर्ण शहर अंधारमय झाले. घटनेचे गांभीर्य लक्षात घेवून शाखा अभियंता अमोल डेरे यांच्यासह सर्व कर्मचारी या ठिकाणी जमा झाले. रात्री 2.30 ते पहाटे 4.30 पर्यंत त्यांनी वाई फिडर, कॉलेज फिडर व वॉटर सप्लाय फिडर असे महत्त्वाचे तीन फीडर सुरू केले. तर इतर दोन ट्रान्स्फॉर्मर (रोहित्र) तात्पुरते बंद ठेवण्यात आले. पुन्हा सकाळी 6 वाजता महेश कर्णे, दिलीप मोरे, नितीन बनसोडे, सूरज इनवटे, डॅनियल नायर हे वीज वितरणचे व गणेश अभाडे, अभिजित कायंगुडे व निखिल कदम हे ठेकेदाराचे कर्मचारी कामासाठी जमा झाले. काम करण्याबाबतचे परमीट पूर्ण घेतले होते. आर्थिंग पूर्ण सोडविली होती. त्यातील वरिष्ठ तंत्रज्ञ रुघुनाथ केंद्रे 132 केव्ही सबस्टेशन येथे विद्युत प्रवाह बंद करण्यासाठी गेले होते. महेश कर्णे यांनी फोन केला असता त्यांच्यात व्यवस्थित संवाद न झाल्याने त्यांनी खांबावर चढून कामास सुरुवात केली. त्यावेळी विजेचा जोरदार धक्का बसल्याने तो खाली कोसळला.  दिलीप मोरे यांनी त्याचे कपडे काढून कर्णे याला सीपीआर देवून श्‍वासोश्‍वास सुरू केला. दरम्यान सूरज इनवटे यांनी रुग्णवाहिकेला फोन केला. 
परंतु फोन न लागल्याने अखेर दुचाकीवरून कर्णे यांना गीतांजली हॉस्पिटलमध्ये दाखल केले. कर्णे 30 ते 32 टक्के भाजला होता. प्राथमिक उपचारानंतर त्याला पुणे येथे हलविण्यात आले. कार्यकारी अभियंता रामकृष्ण शिंदे, उपकार्यकारी अभियंता अविनाश खुस्पे, लाइन इन्स्पेक्टर वाघ, शाखा अभियंता अमोल डेरे यांनी दवाखान्यात व घटनास्थळी भेट देवून पुढील कार्यवाही सुरू केली.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: