Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
एससीओ परिषद : मोदी-इम्रान भेट नाही
ऐक्य समूह
Friday, June 07, 2019 AT 11:07 AM (IST)
Tags: na1
परराष्ट्र मंत्रालयाचे स्पष्टीकरण
5नवी दिल्ली, दि. 6 (वृत्तसंस्था) : शांघाय सहकार्य संघटनेच्या (एससीओ) शिखर परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्यात द्विपक्षीय चर्चा होणार असल्याच्या वृत्ताचा परराष्ट्र मंत्रालयाने इन्कार केला आहे. या परिषदेत या दोन नेत्यांची भेट होणार नाही. तसे नियोजनही नाही, असे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रवीशकुमार यांनी गुरुवारी स्पष्ट केले.
पाकिस्तानचे परराष्ट्र सचिव सोहेल महमूद यांच्या भारत दौर्‍यानंतर या भेटीच्या शक्यता वर्तवण्यात येत होत्या. या महिन्याच्या 13-14 तारखेला किर्गिझस्तानची राजधानी बिश्केक येथे शांघाय सहकार्य संघटनेची शिखर परिषद होत आहे. या परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी सहभागी होणार आहेत. त्यापूर्वी ते आपल्या पंतप्रधानपदाच्या दुसर्‍या कार्यकाळात मालदीवचा पहिला दौरा करणार आहेत. हा दौरा 8 आणि 9 जूनला होणार आहे. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रवीश कुमार यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत सांगितले, की बिश्केकमध्ये शांघाय सहकार्य संघटनेच्या परिषदेच्या दरम्यान पंतप्रधान मोदी आणि पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्या भेटीचा कोणताही कार्यक्रम नाही. पाकिस्तानच्या परराष्ट्र सचिवांचा भारत दौरा त्यांचा वैयक्तिक दौरा होता.


© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: