Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
किल्ले अजिंक्यतार्‍यावर शिवसृष्टी, छ. शाहू महाराजांचा पुतळा उभारणार
ऐक्य समूह
Friday, June 07, 2019 AT 11:17 AM (IST)
Tags: lo2
5सातारा, दि. 6 : सातारा नगरी ही मराठ्यांची राजधानी म्हणून ओळखली जाते. छ. शाहू महाराजांनी किल्ले अजिंक्यतार्‍यावर मराठ्यांच्या राजधानीची स्थापना केली आणि शाहूनगरी वसवली. याच किल्ले अजिंक्यतार्‍यावर महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांनीही वास्तव्य केले होते. त्यामुळे लवकरच किल्लेे अजिंक्यतार्‍यावर शिवाजी महाराज आणि मराठ्यांच्या शौर्याची गाथा सांगणारी भव्य शिवसृष्टी आणि छ. शाहू महाराजांचा पुतळा उभारणार असल्याचा संकल्प आ. श्रीमंत शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी शिवराज्याभिषेक दिनी पोवई नाका येथे सोडला.
6 जून अर्थात छत्रपती शिवाजी महाराज राज्याभिषेकदिन. यानिमित्त पोवई नाका येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास अभिषेक आणि अभिवादन केल्यानंतर आ. शिवेंद्रसिंहराजे बोलत होते.
यावेळी श्रीमंत शिवाजीराजे भोसले, श्रीमंत सौ. चंद्रलेखाराजे भोसले, छत्रपती संभाजी महाराज मालिकेतील राणू अक्का फेम अभिनेत्री अश्‍विनी महांगडे, माजी उपनगराध्यक्ष अविनाश कदम, नगरसेवक अमोल मोहिते, रवींद्र ढोणे, विक्रम पवार, संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष गणेश चोरगे, योगेश चोरगे, राम हादगे, विक्रम फडतरे, महेश कांबळे, सागर चोरगे, अविनाश पवार आदींसह संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
राज्याभिषेक दिनानिमित्त पोवई नाका येथील शिवरायांच्या पुतळ्याला दुग्धाभिषेक करुन अभिवादन करण्यात आले. यानंतर आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी ऐतिहासिक किल्ले अजिंक्यतार्‍यावर शिवसृष्टी आणि शाहूनगरीचे निर्माते छ. शाहू महाराज यांच्या पुतळ्याची उभारणी करणार असल्याचा संकल्प बोलून दाखवला.
सातार्‍याचा अभिमान आणि स्वाभिमान म्हणजेच अजिंक्यतारा किल्ला होय. याच अजिंक्यतार्‍यावर छ. शाहू महाराजांनी मराठ्यांची तिसरी राजधानी स्थापन केली. त्यांनतर त्यांनी शाहूनगरी अर्थात आजची सातारा नगरी वसवली. त्यामुळे छत्रपती शाहू महाराजांचा पुतळा किल्ले अजिंक्यतार्‍यावर नाही, हे मनाला न पटणारे आहे. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने अजिंक्यतारा किल्ला आणि ही भूमी पावन झाली आहे. शिवरायांनी अजिंक्यतारा किल्ल्यावर वास्तव्यही केले आहे. त्यामुळे अजिंक्यतार्‍यावर शिवसृष्टी उभारणे आवश्यक आहे.
छ. शिवराय, छ. संभाजी महाराज आणि छ. शाहू महाराजांच्या पराक्रमाची साक्ष देणार्‍या, मराठ्यांच्या जाज्वल्य इतिहासाचा साक्षीदार असलेल्या किल्ले अजिंक्यतार्‍यावर लवकरच आपण शिवसृष्टी आणि छ. शाहू महाराजांचा पुतळा उभारणार आहे. यामुळे पर्यटनालाही चालना मिळणार असून सातारा नगरी आणि किल्ले अजिंक्यताराच्या वैभवात निश्‍चित भर पडणार आहे. तातडीने याबाबत सर्व्हे करुन पुढील कार्यवाही सुरु केली जाईल, असेही आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी स्पष्ट केले असून त्यांच्या या निर्णयाचे तमाम सातारकरांनी स्वागत केले आहे.
© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: