Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
सत्ता समतोलासाठी पाच उपमुख्यमंत्री आंध्र प्रदेशात नवा ‘जगनमोहन पॅटर्न’
ऐक्य समूह
Saturday, June 08, 2019 AT 10:57 AM (IST)
Tags: mn3
5अमरावती, दि. 7 (वृत्तसंस्था) : आंध्र प्रदेश विधानसभा निवडणुकीत तेलुगू देसम पक्षाचा दणदणीत पराभव करून सत्तेवर आलेल्या वायएसआर काँगे्रेसने सत्ता स्थापनेचाही नवा पॅटर्न आणला आहे. आपल्या सरकारमध्ये पाच उपमुख्यमंत्रिपदे निर्माण करण्याचा निर्णय मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांनी घेतला आहे. स्वतंत्र भारताच्या इतिहासात एखाद्या राज्याच्या मंत्रिमंडळात पाच उपमुख्यमंत्री असण्याचा हा पहिलाच प्रयोग ठरणार आहे.
सत्ता समतोल राखण्यासाठी राज्य मंत्रिमंडळात दोन उपमुख्यमंत्र्यांचा प्रयोग आजवर अनेक राज्यांनी केला आहे. आंध्र प्रदेशात आधीच्या सरकारमध्ये चंद्राबाबू नायडू यांनी मागासवर्गीय व कप्पू समाजाला प्रतिनिधित्व द्यायचे म्हणून दोन उपमुख्यमंत्री नेमले होते. उत्तर प्रदेशातील योगी सरकारमध्येही काही काळ दोन उपमुख्यमंत्री होते. मात्र, जगनमोहन यांचा पाच उपमुख्यमंत्रिपदाचा प्रयोग हा देशातील पहिलाच ठरणार आहे.
वायएसआर काँग्रेसच्या आज झालेल्या   विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांनी ही घोषणा केली. त्यानुसार एएसी, एसटी, बीसी, अल्पसंख्याक आणि कप्पू समाजातील प्रत्येकी एका आमदाराला उपमुख्यमंत्रिपद दिलं जाणार आहे. जनतेच्या आशा-अपेक्षा लक्षात घेऊन हा निर्णय घेतल्याचे जगनमोहन यांनी सांगितले. जगनमोहन सरकारमध्ये 25 मंत्र्यांचा शपथविधी शनिवारी होणार आहे.  दरम्यान, मंत्र्यांचा कार्यकाळ अडीच वर्षांचा असणार आहे. जे मंत्री प्रभावी कामगिरी करणार नाहीत, त्यांना वगळून नव्या चेहर्‍यांना संधी दिली जाईल. जास्तीत जास्त युवा आमदारांना मंत्रिमंडळात स्थान देण्यात येईल. आपल्या सरकारमध्ये भ्रष्टाचाराला थारा नाही, असे जगनमोहन रेड्डी यांनी आज झालेल्या विधिमंडळ पक्ष बैठकीत सुनावले. या बैठकीस सर्व नवनिर्वाचित 151 आमदार उपस्थित होते.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: