Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
पुलवामात चार दहशतवाद्यांचा खात्मा
ऐक्य समूह
Saturday, June 08, 2019 AT 11:00 AM (IST)
Tags: na1
प्रादेशिक सेनेच्या जवानाची हत्या
5श्रीनगर, दि. 7 (वृत्तसंस्था) : जम्मू-काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यातील लस्सीपोरा येथे शुक्रवारी झालेल्या चकमकीत चार दहशवाद्यांना कंठस्नान घालण्यात सुरक्षा दलाच्या जवानांना यश आले आहे. या दहशतवाद्यांकडून चार ‘एके-47’ रायफली जप्त करण्यात आल्या आहेत. परिसरात सुरक्षा दलाने शोधमोहीम हाती घेतली आहे. दरम्यान, अनंतनाग जिल्ह्यात ईद साजरी करण्यासाठी घरी आलेल्या प्रादेशिक सेनेच्या जवानाची दहशतवाद्यांनी गोळी मारून हत्या केली.
गुप्तचर यंत्रणांनी दिलेल्या माहितीच्या आधारे 44 राष्ट्रीय रायफल्स, जम्मू-काश्मीर पोलिसांचा विशेष गट आणि केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या जवानांनी शुक्रवारी पुलवामामधील लस्सीपोरा भागात संयुक्त शोधमोहीम हाती घेतली. ही मोहीम सुरू असताना परिसरात लपलेल्या दहशतवाद्यांनी जवानांवर गोळीबार सुरू केला. जवानांनी परिसराला वेढा घालत गोळीबाराला जोरदार प्रत्युत्तर दिले. या चकमकीत चार दहशतवाद्यांना ठार करण्यात यश आले. परिसरात आणखी काही दहशतवादी लपल्याच्या संशयावरून सुरक्षा दलांनी शोधमोहीम पुढे सुरूच ठेवली आहे. दरम्यान, प्रादेशिक सेनेच्या तळावरील जवान मंजूर अहमद बेग यांची गुरुवारी दहशतवाद्यांनी हत्या केली. बेग हे ईद साजरी करण्यासाठी अनंतनाग जिल्ह्यातील सादुरा येथे घरी आले असता, दहशतवाद्यांनी घरात घुसून त्यांची गोळ्या झाडून हत्या केली. बेग काही दिवसांपासून लष्कराच्या राष्ट्रीय रायफल्समध्ये कार्यरत होते.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: