Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
काँग्रेसच्या बैठकीत राष्ट्रवादीबद्दल संशयकल्लोळ
ऐक्य समूह
Saturday, June 08, 2019 AT 11:03 AM (IST)
Tags: mn5
मुख्यमंत्र्यांवर फोडाफोडीच्या राजकारणाचा आरोप
5मुंबई, दि. 7 (प्रतिनिधी) लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसकडून भाजपला मदत केली गेल्याचा आरोप करताना, असल्या आघाडीपेक्षा विधानसभा निवडणूक स्वबळावर लढवावी, अशी जोरदार मागणी आज काँग्रेसच्या बैठकीत करण्यात आली. याबाबत दिल्लीत योग्य वेळी योग्य निर्णय होतील, असे सांगून प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी स्वबळाच्या मागणीला आवर घातला. दरम्यान, अशोक चव्हाण यांनी पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस फोडाफोडीचे राजकारण करत असून काँग्रेसच्या अनेक नेत्यांना फोन करून प्रलोभने दाखवली जात असल्याचा आरोप केला.
लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले असून राज्यात त्यांचा केवळ एक खासदार निवडून आला आहे. पराभवाचे चिंतन आणि विधानसभा निवडणुकीच्या तयारीसाठी काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांची व पदाधिकार्‍यांची बैठक आज मुंबईतील टिळक भवनात झाली. लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीकडून मदत झाली नसल्याच्या तक्रारी या बैठकीत अनेक जिल्हाध्यक्षांनी केल्या. आघाडी असतानाही राष्ट्रवादीकडून पाडापाडीचे राजकारण केले गेले. काही ठिकाणी राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांनी उघडपणे भाजपला मदत केली. असेच होणार असेल तर विधानसभा निवडणुकीसाठी आघाडी करायची का, याचा विचार करावा. राष्ट्रवादीपेक्षा वंचित बहुजन आघाडीशी  समझोता केल्यास अधिक फायदा होईल असाही सूर काही नेत्यांनी लावला होता. विधानसभा निवडणूक स्वबळावर लढवण्याचा ठराव करून पक्षनेतृत्वाला तशी शिफारस करण्याचीही मागणी करण्यात आली. मात्र, त्याबाबत पक्षनेतृत्व योग्य तो निर्णय घेईल, असे अशोक चव्हाण यांनी स्पष्ट केले. वंचित बहुजन आघाडीला सोबत घेण्यासंबंधी विचार करत आहोत. त्यांच्याशी चर्चा केली जाणार असल्याचे चव्हाण यांनी सांगितले.
विधानसभेची गणितं वेगळी
लोकसभा निवडणुकीत चांगले यश मिळाले म्हणून भाजपने हुरळून जाण्याची गरज नाही. या सरकारवर लोक नाराज आहेत, ही वस्तुस्थिती आहे. लोकसभा व विधानसभा निवडणुकीचे निकाल वेगवेगळे असू शकतात, हे यापूर्वी अनेकदा सिद्ध झाले आहे. महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीतही तेच दिसून येईल, असा विश्‍वास अशोक चव्हाण यांनी बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला. विखे-पाटील यांच्यासारखे लोक नगर जिल्ह्यात काँग्रेस शिल्लक ठेवणार नाही, अशी भाषा करत आहेत. लोकसभेचा एक विजय मिळाला म्हणून एवढा फाजील आत्मविश्‍वास बाळगणे योग्य नसल्याचा टोला त्यांनी लगावला.
मुख्यमंत्र्यांकडून फोडाफोडीचे राजकारण
काँग्रेसचे आमदार फोडण्यासाठी मुख्यमंत्री प्रचंड खटाटोप करत आहेत. अनेक आमदारांना फोन करून प्रलोभने दाखवली जात असल्याचा आरोप चव्हाण यांनी केला. मात्र, आता कोणीही पक्ष सोडेल, असे वाटत नसल्याचा विश्‍वासही त्यांनी व्यक्त केला.
संघाचे अनुकरण नव्हे, संघर्ष करतो
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने निवडणुकीत बजावलेल्या कामगिरीचा उल्लेख करताना, शरद पवार यांनी जनसंपर्क कसा करावा, हे त्यांच्याकडून शिकण्याचा सल्ला राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना दिला आहे. त्यांच्या या विधानावर प्रतिक्रिया विचारली असता, थेट उत्तर देण्याचे चव्हाण यांनी टाळले. त्याच वेळी, संघाकडून घेण्यासारखे काहीही नाही. काँग्रेस नेहमी संघाशी संघर्ष करत आली आहे. आम्ही कधीही त्यांचे अनुकरण करणार नाही, असा टोलाही चव्हाण यांनी लगावला.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: