Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
पुढच्या आठवड्यात मंत्रिमंडळ विस्तार
vasudeo kulkarni
Saturday, June 08, 2019 AT 10:54 AM (IST)
Tags: mn2
अन्न व नागरी पुरवठा रावळ यांच्याकडे, विनोद तावडेंकडे संसदीय कार्य
चंद्रकांत पाटील पुण्याचे, महाजन जळगावचे पालकमंत्री
5मुंबई, दि. 7 (प्रतिनिधी) : गिरीश बापट खासदार म्हणून निवडून गेल्याने त्यांच्याकडील अन्न व नागरी पुरवठा खात्याची जबाबदारी पर्यटन मंत्री जयकुमार रावळ यांच्याकडे तर संसदीय कार्य खात्याची जबाबदारी शिक्षण मंत्री विनोद तावडे यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. आगामी विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून पुण्याचे पालकमंत्रिपद चंद्रकांत पाटील यांच्याकडे देण्यात आले आहे. पुढच्या आठवड्यात मंत्रिमंडळ विस्तार होणार असून त्यावेळी आणखी काही फेरबदल होण्याची शक्यता आहे.
गिरीश बापट यांची पुण्याच्या खासदारपदी निवड झाल्यानंतर त्यांनी मंत्रिपदाचा व आमदारकीचा राजीनामा दिला होता. त्यांच्याकडील खाती मुख्यमंत्र्यांनी लोकसभा निवडणुकीत विशेष मेहनत घेणार्‍या मंत्र्यांकडे सोपवली आहेत. धुळे व नंदुरबार लोकसभा मतदारसंघात जयकुमार रावळ यांनी बरीच मेहनत घेतली. या दोन्ही जागा चांगल्या मतांनी निवडून आणण्यात हातभार लागला होता. त्यांच्याकडे पर्यटन खात्याबरोबरच अन्न व नागरी पुरवठा खाते सोपवण्यात आले आहे. निवडणूक काळात प्रसारमाध्यमांची जबाबदारी घेतलेल्या विनोद तावडे यांच्याकडे संसदीय कार्य खाते सोपवण्यात आले आहे.
 आजवर भाजपसाठी अवघड गड असलेल्या पश्‍चिम महाराष्ट्राची धुरा वाहणार्‍या चंद्रकांत पाटील यांच्याकडे आता पुण्याच्या पालकमंत्रिपदाचीही जबाबदारी देण्यात आली आहे. लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीची प्रतिष्ठा पणाला लागलेल्या पुणे जिल्ह्यावर भाजपने विशेष लक्ष दिले होते. विधानसभा निवडणुकीतही हीच रणनीती आखून पवार कुटुंबाला इथेच जखडून ठेवण्याचा भाजपचा प्रयत्न असून त्यासाठीच महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे पुण्याचे पालकमंत्रिपद दिले गेल्याची चर्चा आहे. एकनाथ खडसे यांच्या नाराजीच्या भीतीपोटी आजवर गिरीश महाजन यांच्याकडे जळगावचे पालकमंत्रिपद दिले गेले नव्हते. मात्र, आता त्यांची जळगावचे पालकमंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
11 तारखेला मंत्रिमंडळ विस्तार?
विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनापूर्वी राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार केला जाईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आधीच जाहीर केले आहे. त्यांनी काल भाजपध्यक्ष अमित शहांची दिल्लीत भेट घेतली होती. राज्यातील संभाव्य मंत्रिमंडळ विस्तारात नव्याने कुणाचा सहभाग करायचा, रावसाहेब दानवेंच्या खासदारकीनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदी कुणाला संधी द्यायची याबाबत चर्चा झाल्याचे कळते. 9 तारखेला दिल्लीत भाजपच्या कोअर कमिटीची बैठक होणार आहे. या बैठकीनंतर 10 किंवा 11 तारखेला मंत्रिमंडळ विस्तार होईल, असे सांगितले जात आहे. राधाकृष्ण विखे-पाटील यांच्यासह काही काँग्रेस आमदार भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. त्यानंतर विखे-पाटील यांचाही मंत्रिमंडळात समावेश होण्याची शक्यता आहे.


© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: