Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
सातारा जिल्ह्याच्या बहुतांश भागात पावसाची तुफान बॅटिंग
ऐक्य समूह
Monday, June 10, 2019 AT 11:47 AM (IST)
Tags: mn1
5सातारा, दि. 9 :  उकाड्याने त्रस्त झालेल्या सातारकरांना रविवारी मात्र वादळी वार्‍यासह झालेल्या मुसळधार पावसाने दिलासा मिळाला. सुमारे पाऊण तास पावसाने तुफान बॅटिंग करत सर्वत्र पाणीच पाणी केल्यामुळे सर्वांचीच तारांबळ उडाली. रस्त्यावर जागोजागी पाणी साचले होते. पालिकेच्या आरोग्य विभागाकडून नाले सफाईची कामे अद्याप पूर्ण न झाल्यामुळे गटारातील कचरा रस्त्यावर येण्याबरोबरच बेसमेंटच्या दुकानांमध्ये पाणी शिरल्यामुळे अनेक दुकानदारांचे मोठे नुकसान झाले आहे.
गेल्या काही दिवसांपासून प्रचंड वाढलेल्या उकाड्यामुळे सातारकरांची पुरतीच तारांबळ उडाली होती. अंगाची लाहीलाही करणार्‍या उष्म्यामुळे नागरिकांना नकोसे झाले होते. कधी नव्हे तो सातार्‍याचा पारा चाळीशी पार गेला होता. वाढत्या उष्म्यामुळे धरणातील पाणीसाठा देखील संपुष्टात आला होता. गेल्या दोन दिवसांपासून शहरातील वातावरण ढगाळ होत असले तरी पाऊस काही पडण्याचे नाव घेत नव्हता. दोन दिवसांपासून तुरळक पाऊस पडत असल्यामुळे उकाड्यात आणखी वाढ झाली होती. परंतु रविवारी पावसाने सातारकरांना पहाटेच्या सुमारास सुखद धक्का दिला. साडेचार ते सहापर्यंत वादळीवार्‍यासह पावसाने हजेरी लावली. मात्र त्यानंतर पावसाने उसंत घेतल्यामुळे हळुहळू पुन्हा गरमीमध्ये वाढ झाली. परंतु वातावरण पावसाळी असल्यामुळे केव्हाही पाऊस पडू शकतो, याच मूडमध्ये सातारकर आज रविवारची सुट्टी एंजॉय करत असतानाच दुपारी 3.45 पासूनच आकाशात प्रचंड ढग दाटून आले. काही वेळातच प्रचंड मेघगर्जनेसह पावसास सुरूवात झाली. सोबतीला सोसाट्याचा वारा होताच. आकाशत ढगांचा गडगडाट व विजांच्या कडकडाटात पावसाने तुफान बॅटिंग सुरू केली. बघता बघता सर्वत्र पाणीच पाणी झाले.
शहरात सदरबझार परिसरात जिल्हा रुग्णालयासमोर रस्त्याच्या कडेला असलेले नाले वाहते नसल्यामुळे अथवा पावसाच्या प्रचंड वेगामुळे या नाल्यांमधील पाणी रस्त्यावर आले होते. त्याबरोबरच नाल्यातील कचराही रस्त्यावर पसरला होता. त्यामुळे सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरण्याबरोबरच दुर्गंधीयुक्त पाणी रस्त्यावर आले होते. राधिका चौकात इमारतीतील तळघरात असलेल्या गाळ्यांमध्ये पाणी शिरले होते. या गाळ्यांमध्ये कमरे एवढे पाणी साचल्यामुळे व्यापार्‍यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. तसेच मार्केट यार्डमध्येही पाणी मोठ्या प्रमाणात शिरल्यामुळे व्यापार्‍यांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. न्यू इंग्लिश स्कूल शेजारील तळघरात पाणी शिरल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागला.
सोसाट्याच्या वार्‍यामुळे शहरातील जिल्हा सर्वसाधारण रुग्णालयासमोर हॉटेल स्वामी समर्थवर झाड पडल्याने हॉटेलचे 10 ते 15 हजारांचे नुकसान झाले. मोती चौक परिसरात वीज वाहक तार तुटली होती. तसेच शहरात अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली. शेतातील पिके आडवी झाली. नांगरट करून ठेवलेल्या मोकळ्या रानांमध्ये पाणीच पाणी साचले होते. हंगामी विक्रेत्यांची तर पळापळ झाली.  वादळी पावसामुळे कोणतेही नुकसान होऊ नये म्हणून वीज वितरण कंपनीने विद्युत पुरवठा खंडित केला होता. काही ठिकाणी वीज वाहक तारांवर झाडांच्या फांद्या तुटून पडल्यामुळे तारा तुटल्या होत्या. त्यामुळे विद्युत पुरवठा बंद ठेवण्यात आला होता. पावसामुळे आंब्यासह इतर फळबागांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. काही ठिकाणी जाहिरातींचे फलक वार्‍यामुळेउडून दूरवर जाऊन पडले होते. तर काही ठिकाणी फलक फाटण्याबरोबरच लोखंडी अँगलही वाकले होते. या पावसामुळे वातावरणात प्रचंड गारवा निर्माण झाला होता.
वाल्हे, लोणंद, वाठार, शिवथर, वाढे या भागातही पावसाने चांगलीच हजेरी लावली. शेतामध्ये पाणी साचण्याबरोबरच अनेक घरांच्या अंगणात पाणीच पाणी झाले होते. आज लग्नाच्या तिथी असल्यामुळे  वर्‍हाडी माणसांची या पावसामुळे चांगलीच तारांबळ उडाली.
माण तालुक्यात पावसाने नुकसान
माण तालुक्यात भालवडी परिसरात वादळी वार्‍यासह पावसाने हजेरी लावली असून वार्‍यामुळे अंगणवाडीवरील पत्रा उडाला तर छावणीतील जनावरांसाठी केलेला निवारा उडून नुकसान झाले आहे. माण तालुक्यातील भालवडी, खुटबाव, मार्डी परिसरात वादळी वार्‍यासह पावसाने हजेरी लावली. वार्‍यामुळे भालवडी येथील अंगणवाडी शाळेचा पत्रा उडला असून अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली आहेत. तसेच येथील जनावरांच्या चारा छावण्यांमध्ये शेतकर्‍यांनी जनावरांसाठी निवारा केला होता तो कोलमडून पडल्याने उघड्या माळरानावर पशुधन वाचवण्यासाठी धडपडत असलेल्या बळीराजाची किरकोळ पावसाने चांगलीच धांदल उडाली होती.
वादळी वार्‍याने छावण्यांचे मोठे नुकसान
माण तालुक्यात रविवारी सायंकाळी चारच्या सुमारास वादळी वार्‍यांसह आलेल्या पावसाने बहुतांशी छावण्यावरील जनावरांना निवार्‍यांसाठी केलेले शेडनेट उडून जाऊन तर काही ठिकाणी पडल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. काही ठिकाणी पोकळ जमीन असलेल्या ठिकाणी जनावरांच्या खुंट्या उपसल्या गेल्या.
सोनके परिसरात पावसाची हजेरी
दुष्काळाने व उष्णतेने हैराण झालेल्या जनतेला व चातकाप्रमाणे पावसाची वाट पाहणार्‍या शेतकर्‍याला आज सायंकाळी तीन वाजल्यापासून मेघगर्जनेसह झालेल्या पावसाने दिलासा देण्याबरोबरच हवेत गारवाही निर्माण केला. आज दुपारी दोनपासून पिंपोडे, वाठार स्टेशन, वाघोली, नांदवळ, सोळशी, नायगाव, करंजखोप,
सोनकेसह अनेक गावात दुपारी तीन वाजता पावसाला सुरूवात झाली. सुमारे एक तास पावसाने दमदार हजेरी लावली. पावसाबरोबर या भागातील वीजही काही वेळ गायब झाली. गेल्या काही दिवसांपासून या भागाला पावसाने हुलकावणी दिली होती. या
पावसामुळे शेतकर्‍यांच्या चेहर्‍यावर आनंद दिसत होता. हा पाऊस ऊसासाठी पोषक आहे. गावातील रस्त्यांवरुन पावसाचे प्रचंड पाणी वाहत होते.
कुडाळ परिसरात पावसाच्या हलक्या सरी
 गरजेल तो पडेल काय या म्हणीचा प्रत्यय आज कुडाळकरांना पावसाने दिला. दुपारपासून आकाशात ढगांनी गर्दी केली होती. ढगांचा गडगडाट सुरू झाला. विजांचा कडकडाट झाला. आता जोरदार पाऊस कोसळणार, अशी आशा निर्माण झाली असतानाच पावसाने तुरळक हजेरी लावली. त्यामुळे ग्रामस्थांचा हिरमोड झाला असला तरी सुमारे अर्धा तास कुडाळ परिसरात हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस बरसल्यामुळे शेतकरी वर्गातून समाधान व्यक्त होत आहे.
म’श्‍वरमध्ये पर्यटकांनी लुटला
पावसात भिजण्याचा आनंद
महाराष्ट्राची चेरापुंजी असलेल्या महाबळेश्‍वरसह पाचगणी, वाई, जावली परिसरातही पावसाने आज दमदार हजेरी लावली. या पावसामुळे संपूर्ण रस्ते जलमय झाले होते. महाबळेश्‍वर व पाचगणीमध्ये उन्हाळी हंगामाची मज्जा लुटण्यासाठी आलेल्या पर्यटकांनी तर या पावसात मनसोक्त भिजण्याचा आनंद लुटला.
महाबळेश्‍वरमध्ये सध्या उन्हाळी हंगाम सुरू असल्यामुळे पर्यटकांची प्रचंड गर्दी झाली आहे. असह्य करणार्‍या उकाड्यामुळे पर्यटकांबरोबरच स्थानिकही हैराण झाले असतानाच आज वरूण राजाने कृपादृष्टी दाखवत महाबळेश्‍वरात जवळपास तासभर तुफान बॅटिंग केली. या पावसामुळे महाबळेश्‍वरमधील सर्वच रस्ते जलमय झाले होते. रस्त्यांना नदीचे स्वरूप आले होते. उकाड्याने हैराण झालेल्या पर्यटकांनी मात्र या पावसात भिजण्याचा मनसोक्त आनंद लुटला. सलग दोन दिवस हजेरी लावलेल्या या पावसामुळे महाबळेश्‍वर व पाचगणीकरांची तहान भागविणारा वेण्णा लेक तलावातील पातळी वाढण्यासाठी मदत झाली आहे.
नीरा परिसरात मान्सून वादळी वारे
व विजांच्या कडकडाटासह पाऊस
पुरंदर तालुक्यातील दक्षिण-पूर्व पट्ट्यातील नीरा, वाल्हे, गुळुंचे, राख, नावळीसह पुरंदरमधील काही भागात रविवारी दुपारी तीनच्या सुमारास वादळी वार्‍यासह मान्सूनपूर्व पावसाने जोरदार हजेरी लावली. वादळी वार्‍यासह झालेल्या पावसाने या भागातील काही घरांचे नुकसान झाले. मात्र त्याचबरोबर संततधार पाऊस पडल्याने लोकांनी समाधान व्यक्त केले.
पुरंदर तालुक्यातील राख, नावळी, वाल्हे या भागात तीव्र पाणीटंचाई असल्याने लोकांनी पावसाचे मोठ्या आनंदाने स्वागत केले. सर्वत्र कमी अधिक प्रमाणात सुमारे तासभर पाऊस पडला. या पावसाचा उन्हाळी पिकांना फायदा होईल. तसेच दुष्काळी भागातील लोकांना याचा फायदा होऊन पाणीटंचाई थोड्या फार प्रमाणात कमी होण्यास मदत होणार आहे. वादळी वार्‍यासह झालेल्या पावसाने पुरंदर तालुक्यातील एकमेव असलेल्या नावळी येथील जनावरांच्या छावणीचे मोठे नुकसान केले. वादळामुळे जनावरांसाठी तयार केलेला तात्पुरता निवारा उडून गेला. येथील जनावरांना पावसाचा सामना करावा लागला. तसेच नीरा येथे सकाळपासूनच उष्णतेमुळे नागरिक हैराण झाले होते. दुपारी झालेल्या जोरदार पावसाने नागरिकांना उष्णतेपासून काहीसा दिलासा मिळाला. राख व परिसरातही जोरदार पाऊस झाल्याने शेतामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साठले.
दरम्यान, नीरा-बारामती रोडवरील लक्ष्मीनगर (निंबुत) येथे वादळी वारा आणि पावसाच्या तडाख्यात विजेचा खांब कोसळला. वीज वाहक तारा रस्त्यावर पडल्याने तरूणांनी तातडीने महावितरण अधिकार्‍यांना कळवल्याने वीज पुरवठा खंडित करण्यात आला. यामुळे मोठा अनर्थ टळला.
रहिमतपूर परिसराला पावसाने झोडपले
रहिमतपूर परिसरात वादळी वारा व विजेच्या कडकडाटासह पाऊस पडला. ठिकठिकाणी झाडे उन्मळून पडली तर काही झाडांच्या फांद्या तुटून पडल्या रहिमतपूर, ब्रह्मपुरी नहरवाडी, माळीवस्ती, कोंडवली परतवडी बोरीव, सासुर्वे, दुघी, निगडी, शिरंबे, कण्हेरखेड, जायगाव, वेलंग, अपशिंगे, खालची अंभेरी, सुर्ली, वाठार किरोली, बोरगाव, टकले, गुजरवाडी, धामणेर, सायगाव, पवारवाडी, न्हावी बुद्रुक, पिंपरी, आर्वी, नागझरी आदी गावांना वळीवाच्या पावसाने
झोडपले. तीन चार ठिकाणी झाडे रस्त्यावर पडली. वीज पुरवठा खंडित झाला. दुपारी 3.30 वाजता वादळी वार्‍यासह पावसास प्रारंभ झाला. कमी जास्त प्रमाणात तो रात्री साडेआठपर्यंत सुरु होता. पहिल्याच पावसात मुलांनी भिजण्याचा आनंद लुटला. परिसरात खरीपपूर्व मशागतीची कामे काहींनी पूर्ण केली आहेत. तर काहींनी पाऊस पडण्याची प्रतीक्षा पाहिली. उकाड्यानेे हैराण झाल्यामुळे थोडासा दिलासा मिळाला आहे. पेरणीपूर्व मशागत नांगरणी, कोळपणी, शेणखत काहींचे टाकून झाले आहे तर काहींचे टाकायचे आहे. पावसामुळे शेतकरी राजाला थोडासा दिलासा मिळाला आहे. सुर्ली परिसरात, कोरेगाव रस्त्याला, वडूज रस्त्याला झाडे पडल्याने रस्त्यावरची वाहतूक ठप्प झाली आहे. वीज गायब झाल्यामुळे रात्री उशिरापर्यंत महावितरणचे कर्मचारी वीज प्रवाह सुरू करण्यासाठी धडपडत होते.


© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: