Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
ज्येष्ठ नाटककार, दिग्दर्शक गिरीश कर्नाड यांचे निधन
ऐक्य समूह
Tuesday, June 11, 2019 AT 10:52 AM (IST)
Tags: mn2
5बंगलोर, दि. 10 (वृत्तसंस्था) : भारतीय साहित्य व कला क्षेत्रावर स्वत:चा अमीट ठसा उमटवणारे सर्जनशील लेखक, प्रख्यात नाटककार, अभिनेते व दिग्दर्शक डॉ. गिरीश कर्नाड यांचे सोमवारी निधन झाले. ते 81 वर्षांचे होते. गेल्या अनेक दिवसांपासून कर्नाड आजारपणाशी झुंज देत होते. बंगलोरमधील घरी त्यांच्यावर उपचार सुरू होते. तेथेच त्यांनी आज सकाळी सहाच्या सुमारास अखेरचा श्‍वास घेतला. त्यांच्या पश्‍चात पत्नी सरस्वती, मुलगा रघू आणि पत्रकार, लेखिका कन्या राधा असा परिवार आहे. कर्नाड यांच्या निधनामुळे भारतीय साहित्य, कला, सांस्कृतिक व सामाजिक वर्तुळातील उत्तुंग व्यक्तिमत्त्व हरपल्याची भावना व्यक्त होत आहे. त्यांना ज्ञानपीठ, पद्मश्री आणि पद्मभूषण या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले होते.
गिरीश कर्नाड यांचा जन्म 19 मे 1938 मध्ये रायगड जिल्ह्यातील माथेरान येथे झाला होता. कर्नाटक विद्यापीठातून 1958 साली त्यांनी पदवी शिक्षण पूर्ण केले होते. त्यानंतर फेलोशिप मिळवून त्यांनी उच्च शिक्षणासाठी ऑक्सफर्ड विद्यापीठात प्रवेश घेतला. तेथून 1960 साली त्यांनी तत्त्वज्ञान, राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्रातून मास्टर ऑफ आर्टस् ही पदवी मिळवली होती. ऑक्सफर्डमध्ये शिकत असतानाच त्यांनी ययाती हे नाटक लिहिले होते. सत्यजित रे यांच्या चित्रपटांनी प्रभावित होऊन गिरीश कर्नाड यांनी सिनेमाकडे वळण्याचा निर्णय घेतला.  
बहुभाषिक व बहुपेडी व्यक्तिमत्त्व असलेल्या कर्नाड यांनी तब्बल चार दशके नाट्यलेखन, दिग्दर्शन व अभिनयाने रंगभूमी, चित्रपटसृष्टी गाजवली. कन्नड, मराठी, हिंदी, इंग्रजी व अन्य भाषांमध्ये त्यांची नाटके रूपांतरित झाली. वेगळ्या धाटणीची व नवा दृष्टिकोन देणारी त्यांची नाटके रसिकांना भावली.
 ययाती, हयवदन व नागमंडल ही त्यांची नाटके गाजली. 1964 साली रंगभूमीवर आलेल्या त्यांच्या ‘तुघलक’ या नाटकाने इतिहास घडवला. या नाटकामुळे त्यांचे नाव देशभरात पोहोचले. साहित्यातील अमूल्य योगदानाबद्दल 1998 साली त्यांना देशातील साहित्यातील सर्वोच्च ज्ञानपीठ पुरस्काराने गौरवण्यात आले होते.
गिरीश कर्नाड हे अष्टपैलू होते. त्यांनी केवळ रंगभूमीच नव्हे तर सिनेमाचा पडदाही गाजवला. यू. आर. अनंतमूर्ती यांच्या कादंबरीवर आधारित ‘संस्कार’ या चित्रपटातून त्यांनी अभिनयाची सुरुवात केली. या चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कारांमध्ये सुवर्णकमळ मिळाले होते. त्यानंतर त्यांनी अनेक चित्रपटात आपल्या अभिनयाचा
ठसा उमटवला. त्यांनी ‘कानुरू हेगाडीथी’ (1999) या चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते. त्यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘उत्सव’ या हिंदी चित्रपटाने समीक्षकांबरोबर प्रेक्षकांचीही वाहवा मिळवली. दूरदर्शनवरील ‘टर्निंग पॉइंट’ या विज्ञान विषयक कार्यक्रमात त्यांनी निवेदकाची भूमिका बजावली होती. त्यांना चार फिल्मफेअर पुरस्कार मिळाले असून त्यापैकी तीन पुरस्कार वंश वृक्ष (1972), काडू (1974), ओन्दानुंडू कालाडल्ली (1978) या कन्नड चित्रपटांच्या दिग्दर्शनासाठी आणि ‘गोधुली’ (1980) या चित्रपटाच्या सर्वोत्कृष्ट पटकथेसाठी मिळाला. ‘पुकार’, ‘इक्बाल’, ‘लाइफ गोज ऑन’ (2009), ‘टायगर जिंदा है’ आदी हिंदी चित्रपटांमधूनही ते झळकले होते. त्यांनी तमिळ चित्रपटसृष्टीतही अभिनयाचा ठसा उमटवला होता. 33 वर्षांपूर्वी आलेल्या ‘उंबरठा’ या गाजलेल्या मराठी चित्रपटात गिरीश कर्नाड यांनी अभिनेत्री स्मिता पाटील यांच्या पतीची भूमिका केली होती.
वयाच्या पंच्याहत्तरीनंतरही कर्नाड कार्यरत होते. सार्वजनिक कार्यक्रम, चर्चासत्रे व साहित्य संमेलनांच्या व्यासपीठावर हजेरी लावून आपली मते ठामपणे मांडत होते. देशातील कथित असहिष्णुता, साहित्यिक, पत्रकारांवर होणार्‍या हल्ल्यांविरोधात त्यांनी आवाज उठवला होता. पत्रकार गौरी लंकेश यांच्या स्मृतिदिनी ‘मीसुद्धा अर्बन नक्षल’ या चळवळीत ते सहभागी झाले होते. कलबुर्गी यांच्या हत्येच्या निषेधार्थ निघालेल्या मोर्चांमध्येही त्यांचा सहभाग होता. त्यांना साहित्य अकादमी (1994) व ज्ञानपीठ (1998) या पुरस्कारांबरोबरच 1974 साली पद्मश्री व 1992 साली पद्मविभूषण या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले होते. कालिदास सन्मान (1998), सर्वोत्कृष्ट चित्रपटासाठी कर्नाटक सरकारचे सहा पुरस्कार व दहा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारही त्यांना मिळाले होते. गिरीश कर्नाड यांच्यावर सायंकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: