Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
कोरेगाव तालुक्याला वादळी वारे, पावसाने झोडपले
ऐक्य समूह
Tuesday, June 11, 2019 AT 10:50 AM (IST)
Tags: mn1
5कोरेगाव, दि. 10 : कोरेगाव तालुक्याला सलग दुसर्‍या दिवशी सोमवारी वादळी वार्‍यासह वळिवाच्या पावसाने अक्षरश: झोडपून काढले. यामध्ये अनेक घरांचे व वीज वितरण कंपनीचे मोठे नुकसान झाले आहे. शिरंबे-वेलंग परिसरात घरावरचे पत्रे उडून गेले. अनेक ठिकाणी रस्त्यावर झाडे आणि विजेचे खांब कोसळले आहेत. अनेक भागांमधील वीज पुरवठा सायंकाळी खंडित झाला होता.  रात्री उशिरापर्यंत तो पूर्ववत झाला नव्हता.
कोरेगाव तालुक्याला वळिवाच्या पावसाने एखादा अपवाद वगळता हुलकावणी दिली होती. संपूर्ण मे महिना कोरडा गेल्यानंतर लोकांनी वळिवाच्या पावसाची अपेक्षा सोडून दिली होती, मात्र, रविवारी दुपारी वळिवाने तालुक्याला चांगलाच तडाखा दिला होता. या पावसात मोठे नुकसान झाले आहे. त्यानंतर सोमवारीदेखील सायंकाळी तालुक्यात अनेक ठिकाणी वादळी वार्‍यासह जोरदार पाऊस झाला. कोरेगाव-रहिमतपूर रस्त्यावर एकसळ येथे झाड कोसळल्याने वाहतूक विस्कळीत झाली होती. रहिमतपूर मार्गावरील वाहतूक एकंबे-कण्हेरखेडमार्गे वळविण्यात आली.
महावितरण कंपनीचे शिरंबेमध्ये 20, जायगाव-मध्ये 6, औद्योगिक वसाहतीत 2, सुलतानवाडी येथे 1 खांब पडल्याने वीज पुरवठा खंडित झाला होता. वेलंग येथे विजय साठे यांच्या घरावरचा पत्रा उडून गेल्याने मोठे नुकसान झाले. त्यांचा संपूर्ण संसारच उघड्यावर आला. डी. पी. भोसले कॉलेजच्या पिछाडीस शाहूनगरमध्ये झाड पडून विजेच्या तारा तुटल्या.
आरफळ कॉलनीत नुकसान
कोरेगाव शहरात आरफळ कॉलनी परिसरात नगरपंचायतीचे कर्मचारी विठ्ठल कुंभार यांच्या घरावर झाड कोसळल्याने मोठे नुकसान झाले. हे झाड धोकादायक असून ते त्वरित पाडावे, अशी मागणी त्यांनी यापूर्वी प्रशासन व नगरपंचायतीकडे केली होती. त्याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याने त्यांना मोठ्या नुकसानाला सामोरे जावे लागले आहे. महसूल विभागाने पंचनामा करून तातडीने नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी कुंभार कुटुंबीयांनी केली आहे.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: