Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
लग्नाचे आमिष दाखवून 10 लाखांची लूट
ऐक्य समूह
Wednesday, June 12, 2019 AT 11:28 AM (IST)
Tags: lo1
5सातारा, दि. 11 : शादी डॉट कॉम या संकेतस्थळावर ओळख करून, महिलेला भुरळ पाडून, लग्नाचे आमिष दाखवून तसेच वेगवेगळे बहाणे करून तिच्याकडून 9 लाख 95 हजार रुपयांची लूट केल्या प्रकरणी एका संशयिताला सातारा तालुका पोलिसांनी जेरबंद केले आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की दिव्यनगरी, सातारा येथे राहणार्‍या एका महिलेची शादी डॉट कॉम या संकेतस्थळावर ओळख करून, तिला भुरळ पडून, लग्नाचे आमिष दाखवून तसेच आजाराचे आणि वेगवेगळे बहाणे करून विनय राजेश लोहिरे या संशयिताने तिची 9 लाख 95 हजार रुपयांची लूट केली असल्याची तक्रार सातारा तालुका पोलीस ठाण्यात दाखल झाली होती. त्याच्यावर गुन्हा दाखल झाला होता. सातारा तालुका पोलीस त्याचा शोध घेत होते. मात्र नक्की ठावठिकाणा मिळून येत नव्हता. दरम्यान, सहाय्यक पोलीस अधीक्षक समीर शेख, पोलीस निरीक्षक अण्णासाहेब मांजरे, यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक नारायण गीते, पोलीस नाईक सुजित भोसले, पोलीस कॉन्स्टेबल रमेश चव्हाण यांचे एक पथक संशयिताच्या शोधासाठी पुणे, मुंबई या ठिकाणी गेले होते.   
संशयित ठकबाजी करण्यात पटाईत असल्याने तो पोलिसांना चकवा देत होता. पोलीस त्याचा शोध घेत असताना त्याची माहिती प्राप्त करून त्याला मुलुंड, मुंबई येथून ताब्यात घेण्यात आले. संबंधितावर देवाची आळंदी, हडपसर या ठिकाणी ठकबाजीचे गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर आली. विनय राजेश लोहरे हा संशयित मुंबई येथे महागड्या आलिशान घरांमध्ये वास्तव्य करीत असल्याने स्थानिक लोकांना त्याच्याबाबत संशय निर्माण होत नव्हता. दरम्यान विनय लोहरे याला ताब्यात घेऊन सातारा येथे आणण्यात आले आहे. लोहरे याने अशाच प्रकारे अन्य कोठे ठकबाजीचे प्रकार केले असतील तर संबंधित लोकांनी सातारा तालुका पोलीस ठाण्यामध्ये संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: