Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
राज्य मंत्रिमंडळाचा शनिवारी विस्तार
ऐक्य समूह
Wednesday, June 12, 2019 AT 11:08 AM (IST)
Tags: mn1
सहा मंत्र्यांचा समावेश? विखे, क्षीरसागर, खैरे यांची नावे चर्चेत
5मुंबई, दि. 11 (प्रतिनिधी) : राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार येत्या शुक्रवारी अथवा शनिवारी होणार असून काँग्रेसमधून आलेले राधाकृष्ण विखे-पाटील, राष्ट्रवादीतून आलेले जयदत्त क्षीरसागर यांच्याबरोबर सहा जणांचा मंत्रिमंडळात समावेश केला जाण्याची शक्यता आहे. लोकसभा निवडणुकीत पराभूत झालेल्या चंद्रकांत खैरे यांनाही राज्यात मंत्रिपद दिले जाईल, अशीही चर्चा असून संजय कुठे, आशिष शेलार, अनिल बोंडे यांचीही नावे चर्चेत आहेत.
लोकसभा निवडणुकीत घवघवीत यश मिळवल्यानंतर भाजपने आता विधानसभा निवडणुकीवर लक्ष केंद्रित केले आहे. लोकसभा निवडणुकीत युतीच्या उमेदवारांना जवळपास सव्वादोनशे विधानसभा मतदारसंघांमध्ये मताधिक्य मिळाले असले तरी गाफील न राहता मोर्चेबांधणी सुरू केली आहे. या आठवड्याच्या अखेरीस राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार केला जाणार असून विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवूनच हा विस्तार होणार आहे. विधानसभेत साडेचार वर्षे विरोधी पक्षनेतेपद भूषवून सत्ताधार्‍यांच्या छावणीत गेलेल्या राधाकृष्ण विखे-पाटील यांना आणि राष्ट्रवादीला रामराम ठोकून शिवसेनेत दाखल झालेल्या जयदत्त क्षीरसागर यांनाही मंत्रिपदाची झूल मिळण्याची शक्यता आहे. लोकसभा निवडणुकीत भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांचे जावई हर्षवर्धन जाधव यांनी केलेल्या मतविभागणीमुळे शिवसेनेच्या चंद्रकांत खैरे यांना पराभव पत्करावा लागला होता तरीही मराठवाड्यातील गणितं लक्षात घेऊन त्यांना मंत्रिपद देण्याबाबत शिवसेनेत गांभीर्याने विचार सुरू आहे. कोल्हापूर जिल्ह्याने शिवसेनेचे चार आमदार निवडून दिले होते. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीतही शिवसेनेने कोल्हापूर जिल्ह्यातील दोन्ही जागा जिंकल्या. त्यामुळे मंत्रिमंडळात कोल्हापूर जिल्ह्याला स्थान देण्याचा दबाव शिवसेनेवर आहे. त्यासाठी सुजित मिणचेकर यांचे नाव चर्चेत आहे. विस्तारात सेनेला दोन मंत्रिपदं मिळण्याची शक्यता असून या तिघांपैकी दोघांना संधी मिळू शकेल.
भाजपकडून चार जणांना मंत्रिपदाची संधी आहे. राधाकृष्ण विखे- पाटील यांचे नाव निश्‍चित आहे. याशिवाय राष्ट्रवादीतून आलेल्या रणजितसिंह मोहिते-पाटील, विदर्भातील संजय कुटे व डॉ. अनिल बोंडे, आशिष शेलार आदींची नावं चर्चेत आहेत. कोणत्याही सभागृहाचे सदस्य नसलेल्या व्यक्तीची मंत्रिपदावर वर्णी लागली तर त्यांना सहा महिन्यात विधानसभेत किंवा विधानपरिषदेवर निवडून यावे लागते. मात्र, विधानसभा निवडणूकच सहा महिन्यांमध्ये होणार असल्याने निवडून येण्याची गरजच लागणार नाही. या स्थितीत अचानक एखादे नाव पुढे येऊ शकेल, असेही सांगण्यात येत आहे.
© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: