Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
महाराष्ट्राचे वैभव असलेल्या वाईचे प्रश्‍न मार्गी लावणार
ऐक्य समूह
Thursday, June 13, 2019 AT 11:27 AM (IST)
Tags: mn3
5मुंबई, दि. 12 : वाई हे महाराष्ट्राचे वैभव असून वाई शहराच्या विकासाबाबत जे, जे प्रश्‍न असतील त्या सर्व प्रश्‍नांचा नक्कीच निपटारा केला जाईल, अशी ग्वाही देत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वाईच्या भुयारी गटर व जलनि:सारणार्थ एस. टी. पी. प्रक्रिया प्रकल्पाच्या एस. टी. पी.प्लॅनला जागेवरच मंजुरी दिली. मुख्यमंत्र्यांनी सर्व विषयांना मंजुरी दिल्याने वाई शहरातील नागरिकांनी विशेष आनंद व्यक्त केला आहे. माजी आमदार तथा किसनवीर उद्योग समूहाचे अध्यक्ष मदन भोसले यांच्या नेतृत्वाखाली वाई नगरपालिकेच्या शिष्टमंडळासोबत झालेल्या बैठकीत मुख्यमंत्र्यांच्या या आश्‍वासक ग्वाहीमुळे वाईच्या नव्या विकासाचा अध्याय सुरू झाला आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा या निवासस्थानी मदन भोसले यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. यावेळी वाईच्या नगराध्यक्षा डॉ.प्रतिभा शिंदे यांच्यासह नगरसेवक व विविध मान्यवर उपस्थित होेते. यावेळी मदन भोसले यांनी वाईचे विविध प्रश्‍न मांडले. त्यामध्ये सुमारे 42 कोटी रुपयांची मल नि:स्सारण योजना मार्गी लावण्याची मागणी करण्यात आली. तसेच या विषयाचा एस.टी. पी.प्लॅन केला आहे का याचीही विचारणा करून या प्रकल्पाला निधीची कमतरता भासू देणार नाही याचीही ग्वाही दिली. यावेळी सिद्धेश्‍वर मंदिरालगतचा रस्ता ते घोटवडेकर हॉस्पिटल लगतचा रस्ता जोडणारा नवा पूल व अ‍ॅप्रोच रस्ते, वाई शहराच्या पूर्व बाजूच्या प्रवेशद्वारावर असलेल्या फुलेनगर येथे नवीन पूल उभारणे, सोनगिरवाडी येथे नवीन भाजी मंडई व शॉपिंग सेेंटर उभारणे, नगरपरिषद शाळा क्र. 4 साठी नवीन सर्व सुविधांनी सुसज्ज इमारत उभारणे यासह विविध प्रश्‍न मुख्यमंत्र्यांसमोर लेखी निवेदनासह मांडण्यात आले. त्यावर मुख्यमंत्र्यांनी सर्व विषयांना जागेवर मंजुरी देत वाईच्या विकासाला चालना देण्याबाबत कोठेही कमी पडणार नसल्याची ग्वाही दिली. विशेषत: मल नि:स्सारण प्रकल्पाबाबत मुख्यमंत्र्यांनी दाखवलेली तत्परता मदन भोसले यांच्या नेतृत्वाखाली गेलेल्या शिष्टमंडळाला विशेष भारावून गेली.
यावेळी मदन भोसले यांनी वाईचे कंदी पेढे, शाल, बुके व आंबे देवून मुख्यमंत्र्यांचा सत्कार करून वेळ दिल्याबद्दल आभार मानले. त्यावर मुख्यमंत्र्यांनी दादा, तुम्ही आणलेले सर्व प्रश्‍न मार्गी लावले जातील, असे सांगून तुमचे सर्व काम योग्य व नियमानुसार असते, असे सांगितले. यावेळी भाजपचे वाई शहरध्यक्ष अजित वनारसे, शेखर शिंदे, नगराध्यक्षा डॉ. प्रतिभा शिंदे, डॉ. सुरभी भोसले, अनिल जाधव, नगरसेवक सतीश वैराट, महेंद्र धनवे, सुमैया इनामदार, रूपाली वनारसे, वासंती ढेकाणे यांच्यासह विजय ढेकाणे, अमजद इमानदार आदी उपस्थित होते.
मदनदादांमुळेच विकासाचा
वारू उधळणार
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वाई शहराबाबत दाखवलेले अगत्य सर्व उपस्थितांना भारावून गेले. मदन भोसले यांच्याशी बोलताना ते म्हणाले, दादा वाई शहर आपल्याला अतिशय चांगले करायचे आहे. तुमची तळमळ मला माहिती आहे. केवळ वाईच नव्हे तर वाईसह महाबळेश्‍वर, पाचगणी, खंडाळा, लोणंद या परिसरातील सर्व प्रश्‍न आणि त्याच्या समस्यांची तुम्हाला जाणीव आहे. तेथील सर्व प्रश्‍न तुम्ही माझ्यासमोर आणा. तुम्हाला कधीच निराश करणार नाही. कारण तुम्ही कधीच वैयक्तिक काम सांगत नाही. तुम्ही सांगता ते लोकहिताचे सांगता आणि अशी कामे करण्यात मला नेहमीच आनंद वाटतो. मुख्यमंत्री आणि मदन भोसले यांच्यातील या संवादाने वाई-खंडाळा-महाबळेश्‍वरच्या विकासाचा वारू उधळणार असल्याचे प्रत्यक्ष दिसून आल्याने उपस्थित सर्वच भारावून गेले.
© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: