Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
नीरा-देवघरचे पाणी बारामतीला देण्यास रामराजेंनी विरोध का केला नाही?
ऐक्य समूह
Thursday, June 13, 2019 AT 11:26 AM (IST)
Tags: re2
5फलटण, दि. 12 : नीरा-देवघर धरणातील 60 टक्के पाणी नीरा डावा कालव्याद्वारे बारामती, इंदापूरकडे वळविण्याचा खा. शरद पवार व आ. अजित पवार यांचा निर्णय आपण समजू शकतो; परंतु ज्या कायम दुष्काळी पट्ट्याने पाण्याच्या प्रश्‍नावर निवडून दिले, ते या खात्याचे माजी मंत्री श्रीमंत रामराजे गप्प का, हा खरा सवाल असून त्यांनी या निर्णयाला विरोध करण्याची, किंबहुना कालवे व वितरण व्यवस्थेची कामे तातडीने पूर्ण करून घेवून हे पाणी नीरा-देवघरच्या लाभक्षेत्राला मिळण्यासाठी प्रयत्न करण्याची आवश्यकता होती, असे प्रतिपादन खा. रणजितसिंह नाईक- निंबाळकर यांनी केले.
नीरा-देवघर धरणातील बारामती, इंदापूरकडे जाणारे पाणी बंद करून ते नीरा-देवघरच्या लाभक्षेत्रात नीरा उजवा कालव्यातून उपसा सिंचनाद्वारे देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतल्यानंतर येथील शासकीय विश्रामधामावर झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. माजी आमदार शहाजी पाटील, श्रीकांत देशमुख, धैर्यशील मोहिते-पाटील, आ. जयकुमार गोरे, अ‍ॅड. नरसिंह निकम, जयकुमार शिंदे, दिगंबर आगवणे, उत्तमराव जानकर, निवृत्त सनदी अधिकारी विश्‍वासराव भोसले, हणमंतराव मोहिते व पदाधिकारी उपस्थित होते.
खा. शरद पवार यांनी 2007 मध्ये नीरा-देवघरचे पाणी लाभक्षेत्राबाहेर बारामती, इंदापूरला वळविण्याचा निर्णय घेताना कालवे व वितरण व्यवस्था कामे पूर्ण नसल्याने विनावापर राहणारे 11.5 टीएमसी पाणी 60 टक्के नीरा डावा कालव्याद्वारे बारामती, इंदापूरला आणि 40 टक्के पाणी फलटण, खंडाळा, माळशिरस, भोर, पंढरपूर, सांगोला या तालुक्यांना देण्याचा प्रस्ताव दिला. त्यावेळी जलसंपदा खाते व कृष्णा खोरे विकास महामंडळाचे प्रमुख असलेल्या आ. अजित पवार व श्रीमंत रामराजे नाईक -निंबाळकर यांनी कालवा सल्लागार समितीच्या माध्यमातून हा निर्णय होताना विरोध करण्याची आवश्यकता होती. मात्र, तसे झाले नसल्याचे स्पष्ट करतानाच गेले 12 दिवस आपण हा प्रश्‍न धसास लावण्यासाठी प्रयत्नशील असताना श्रीमंत रामराजे यांनी चुप्पी सोडली नाही तर खा. शरद पवार, आ. अजित पवार, खा. सुप्रिया सुळे वगैरे पवार कुटुंबीय त्यासाठी मुख्यमंत्री व जलसंपदा मंत्र्यांना भेटून या पाण्यावर उभी असलेली उसाची पिके, त्यावर अवलंबून असणारी साखर कारखानदारी विचारात घेऊन पाणी बंद करण्याचा निर्णय घेवू नये यासाठी प्रयत्नशील होती, दिल्लीतूनही यासाठी या मंडळींनी प्रयत्न केल्याचे खा. रणजितसिंह नाईक- निंबाळकर यांनी निदर्शनास आणून दिले.
आपल्यासमवेत आ. जयकुमार गोरे, माजी खासदार रणजितसिंह मोहिते-पाटील, उत्तमराव जानकर या सांगोला, माळशिरस, फलटणमधील नेत्यांनी मुख्यमंत्री व जलसंपदा मंत्र्यांना भेटून या प्रश्‍नाचे गांभीर्य, पाणी प्रश्‍नाची वस्तुस्थिती निदर्शनास आणून देत यापुढे बेकायदेशीररीत्या, मुदत संपल्यानंतरही बारामती, इंदापूरकडे जाणारे पाणी बंद करण्याची आवश्यकता निदर्शनास आणून देताना बारामती,इंदापूरकडे उसाच्या क्षेत्रासाठी हे पाणी जात असताना या प्रकल्पाच्या लाभक्षेत्रात हजारो जनावरे छावण्यांमध्ये आहेत तर पिण्याच्या पाण्यासाठी शेकडो टँकर सुरू असताना या लोकांच्या हक्काचे पाणी त्यांना न देता, ज्यांचा या प्रकल्पासाठी काडीमात्र संबंध नाही, त्याग नाही, त्यांना हे पाणी देणे म्हणजे दुष्काळी पट्ट्यातील लोकांवर आणि ज्यांनी स्वत:च्या जमिनी स्वखुशीने देवून पुनर्वसनासाठी मदत केली, त्यांच्यावर अन्यायच असल्याचे निदर्शनास आणून दिल्याने मुख्यमंत्र्यांनी हे पाणी लाभक्षेत्रात देण्याचा निर्णय घेतल्याचे खा. रणजितसिंह यांनी निदर्शनास आणून दिले.
12 वर्षांचा संघर्ष 12 दिवसात संपवताना आम्ही कृष्णा खोरे महामंडळ कार्यकारी संचालकांच्या केबिनमध्ये ठिय्या मारून त्यांना वस्तुस्थितीचा अहवाल तयार करण्यासाठी प्रयत्नशील राहिलो. अन्यथा प्रशासनाची भूमिका अजूनही लाभक्षेत्रात पाणी देण्यासाठी अनुुकूल नव्हती. मात्र, आपल्यासमवेत असलेल्या नेत्यांची साथ, लोकांचे आशीर्वाद आपल्या पाठीशी खंबीर राहिल्याने मुख्यमंत्री व जलसंपदा मंत्र्यांना वस्तुस्थिती समजावून देवून आदेश काढण्यासाठी हट्ट धरून बसल्यानेच हा आदेश निघाल्याचे खा. रणजितसिंह यांनी स्पष्ट केले.
नीरा-देवघरचे पाणी कालव्याऐवजी बंद पाइपलाइनमधून लाभक्षेत्रात दिले जाणार असल्याचा निर्णय झाला असून त्यासाठी सुमारे 900 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. त्याची तरतूद तातडीने करून घेऊन हे काम वेगाने पूर्ण करण्याचे आश्‍वासन मुख्यमंत्री व जलसंपदा मंत्र्यांनी दिल्याने लवकरच नीरा देवघरचे संपूर्ण पाणी लाभक्षेत्रातील भोर, खंडाळा, फलटण, माळशिरस या तालुक्यांना तर मिळणार आहेच,  मात्र त्याचबरोबर बंदिस्त पाइपलाइनद्वारे पाणी वितरित केले जाणार असल्याने या पाण्याचे लाइनलॉसेस व बाष्पीभवन याद्वारे वाया जाणारे वाचलेले पाणी सांगोला व पंढरपूरला देण्याचा निर्णयही झाला असून त्याचा आदेश लवकरच निघेल, याची ग्वाही खा.रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी दिली.
लोकसभा निवडणुकीतील विजयापेक्षा लाभक्षेत्रातील दुष्काळाने पिचलेल्या जनतेला त्यांच्या हक्काचे पाणी मिळवून देण्यासाठी केलेल्या प्रयत्नांना आलेले यश मोठे असल्याचे स्पष्ट करीत नीरा-देवघर व रेल्वेचे माजी खासदार हिंदुराव नाईक- निंबाळकर व त्यांच्यासमवेत गेली अनेक वर्षे काम करणार्‍या नेत्यांच्या स्वप्नाची पूर्तता होत असल्याचा आनंद आपल्याला अधिक असल्याचे खा. रणजितसिंह यांनी स्पष्ट केले.
खंडाळा, फलटण, माळशिरस, सांगोला, पंढरपूर या तालुक्यातील जनतेच्या भाग्याचा आजचा दिवस असून गेली 12 वर्षे या निर्णयासाठी या तालुक्यातील जनता अपेक्षेने पहात असताना त्यांच्या हक्काचे पाणी बारामती, इंदापूरला देण्याचे पाप ज्यांनी केले, त्यांना या दुष्काळी पट्ट्यातील जनता कधीच माफ करणार नाही, असे सांगत दुष्काळी जनतेने 25 वर्षे निवडून देताना दुष्काळ हटेल, अशी भावना ठेवली. त्यासाठी महामंडळाचे अध्यक्षपद, मंत्रिपद, सभापतिपद मिळूनही त्यांनी पाण्याचा प्रश्‍न सोडविला नाही. एक प्रकारे मातीशी बेईमानी करून पाण्याच्या बदल्यात मंत्रिपद भोगल्याचा आरोप आ. जयकुमार गोरे यांनी केला. लोकसभा निवडणुकीत मतदारांनी प्रेम व्यक्त करत भरभरून मते दिल्याची परतफेडच या निर्णयाद्वारे खा. रणजितसिंह यांनी केली आहे. आगामी काळात याच तडफेने या भागातील प्रश्‍नांची सोडवणूक ते करतील, याची ग्वाही आ. गोरे यांनी दिली.
© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: