Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
‘वायू’ चक्रीवादळ वेगाने गुजरातकडेे
ऐक्य समूह
Thursday, June 13, 2019 AT 11:03 AM (IST)
Tags: mn2
‘हाय अलर्ट’; तीन लाख लोकांचे स्थलांतर
5अहमदाबाद, दि. 12 (वृत्तसंस्था) : गुजरातच्या दिशेने प्रचंड वेगाने सरकत असलेले ‘वायू’ चक्रीवादळ गुजरातच्या किनारपट्टीच्या प्रदेशात उद्या (गुरुवार) दुपारी धडकण्याची शक्यता आहे. त्यामुळे या भागात अतिसतर्कतेचा इशारा जारी करण्यात आला असून खबरदारीचा उपाय म्हणून आतापर्यंत सुमारे तीन लाख लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. गुजरातकडे जाणार्‍या 70 रेल्वेगाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. पोरबंदर, दीव, भावनगर, केशोद आणि कांडला ही विमानतळे बुधवार मध्यरात्रीपासून गुरुवार मध्यरात्रीपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहेत. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा गुजरातमधील परिस्थितीवर बारीक लक्ष ठेवून आहेत.  अरबी समुद्रात निर्माण झालेले ‘वायू’ चक्रीवादळ गुजरातच्या किनारपट्टीच्या प्रदेशात उद्या (गुरुवार) दुपारी धडकण्याची शक्यता आहे. त्यामुळे या भागातील जीवितहानी कमीत कमी करण्यासाठी तीन लाख लोकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे. गुजरातच्या किनारपट्टीच्या प्रदेशातील दहा जिल्ह्यांमध्ये शाळा, कॉलेज आणि अंगणवाड्यांना दोन दिवसांची सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. या भागात एनडीआरएफची 52 पथके तैनात ठेवण्यात आली आहेत. तिन्ही संरक्षण दलांच्या तुकड्यांसह तटरक्षक दल व सीमा सुरक्षा दलालाही अतिसतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या आहेत. लष्कराच्या दहा तुकड्या किनारपट्टी भागात तैनात करण्यात आल्याचे संरक्षण खात्याच्या प्रवक्त्यांनी सांगितले. प्रत्येक तुकडीत 70 जवानांचा समावेश आहे. गुजरात सरकार, केंद्रशासित प्रदेश आणि अन्य संबंधित यंत्रणांशी केंद्र सरकार सतत संपर्कात असल्याचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सांगितले.
गुजरातमधील द्वारका आणि वेरावल किनारी ‘वायू’ चक्रीवादळ गुरुवारी दुपारी धडकेल, असा हवामान विभागाचा अंदाज आहे. वार्‍याचा वेग ताशी 155 ते 165 कि.मी. असेल. द्वारका, वेरावलबरोबर सौराष्ट्र आणि कच्छ किनारपट्टीलाही या वादळाचा तडाखा बसेल. अमरेली, गीर सोमनाथ, दिव, जुनागड, पोरबंदर, राजकोट, जामनगर, देवभूमी, द्वारका आणि कच्छ या भागात वादळाचा सर्वाधिक प्रभाव जाणवेल, असेही हवामान विभागाने नमूद केले आहे.

 
© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: