Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
दहशतवादी हल्ल्यात सीआरपीएफचे पाच जवान शहीद
ऐक्य समूह
Thursday, June 13, 2019 AT 10:58 AM (IST)
Tags: mn1
तीन जवान जखमी; एक दहशतवादी ठार
5श्रीनगर, दि. 12 (वृत्तसंस्था) : जम्मू-काश्मीरमधील अनंतनाग येथे के. पी. रोड या गजबजलेल्या रस्त्यावर दहशतवाद्यांनी बुधवारी सायंकाळी केलेल्या हल्ल्यात केंद्रीय राखीव पोलीस दलाचे पाच जवान शहीद झाले. या हल्ल्यात एका मुलीसह तीन जवान जखमी झाले आहेत. जखमींमध्ये जम्मू-काश्मीर पोलीस दलातील पोलीस निरीक्षकाचा समावेश आहे. यावेळी झालेल्या चकमकीत एका दहशतवाद्याला ठार करण्यात आले.
याबाबत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सीआरपीएफची बी/116 या बटलीयनचे जवान आणि जम्मू-काश्मीर पोलीस दलातील जवानांच्या संयुक्त गस्तीपथकाला दहशतवाद्यांनी लक्ष्य केले. हे जवान अनंतनाग येथील गजबजलेल्या के. पी. रोडवर गस्त घालत होते. त्यावेळी दोन मोटारसायकलींवरून आलेल्या चार दहशतवाद्यांनी बसस्टँड आणि ऑक्सफर्ड स्कूलजवळ ची गली येथे आधुनिक रायफलमधून पोलीस जवानांवर अचानक अंदाधुंद गोळीबार सुरू केला. त्याच वेळी दहशतवाद्यांनी गस्तीपथकावर ग्रेनेडही फेकले. या हल्ल्यात आठ जवान जखमी झाले. त्यांना नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. जखमींपैकी पाच जवानांची प्रकृती चिंताजनक होती. त्यांच्यावर उपचार सुरू असताना त्यांना वीरमरण आले. या हल्ल्यातील अन्य जखमींना उपचारांसाठी श्रीनगर येथे हलवण्यात आले आहे.
पोलीस व सीआरपीएफच्या जवानांनी प्रत्युत्तरादाखल गोळीबार केला. या चकमकीत एका दहशतवाद्याला कंठस्नान घालण्यात यश आले. परिसरात रात्री उशिरापर्यंत चकमक सुरू होती. या हल्ल्यात अनंतनाग पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अर्शद अहमद आणि एक स्थानिक मुलगीही जखमी झाली आहे. अहमद हे गंभीर जखमी झाले असून त्यांना श्रीनगर येथील हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे तर उर्वरित जखमींवर अनंतनाग येथील जंगलत मंडी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सुरक्षा दलांनी परिसराला वेढा दिला असून आणखी कुमक तेथे रवाना करण्यात आली आहे. 
दरम्यान, या घटनेची जबाबदारी पाकिस्तानस्थित ‘अल-उमर मुजाहिद्दीन’ या नावाच्या दहशतवादी संघटनेने घेतल्याचे वृत्त आहे. मुश्ताक जरगर हा या संघटनेचा म्होरक्या आहे. बालाकोट हवाई हल्ल्यात जरगरही निशाण्यावर होता, असे सांगितले जाते. 1999 मध्ये ‘आयसी- 814’ या अपहृत विमानातील ओलीस प्रवाशांच्या सुटकेच्या बदल्यात भारताने सोडलेल्या दहशतवाद्यांमध्ये जरगरचाही समावेश होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने दुसर्‍यांदा सत्ताग्रहण केल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये झालेला हा पहिलाच मोठा हल्ला आहे.
या आधी जम्मू-काश्मीरमधील पूँछ येथे पाकिस्तानी सैन्याने सोमवारी शस्त्रसंधीचे उल्लंघन केले होते. त्यामध्ये एक जवान शहीद झाला होता. गोळीबारात एक जवान जखमीही झाला होता. पाकच्या गोळीबारास भारतीय सैन्याने सडेतोड प्रत्युत्तर दिले होते. दरम्यान, पुलवामा हल्ल्यानंतर जागतिक दबावापुढे झुकून चीनने ‘जैश-एम-मोहम्मद’चा म्होरक्या मसूद अझर याच्यावर संयुक्त राष्ट्रे सुरक्षा परिषदेत बंदी घालण्याच्या प्रस्तावाला मान्यता दिली होती. त्याचबरोबर बालाकोट येथे भारतीय हवाई दलाने केल्या हवाई हल्ल्यांमध्ये ‘जैश’चे काही दहशतवादी प्रशिक्षण तळ नष्ट झाल्याने या दहशतवादी संघटनेची मोठी हानी झाली होती.    
त्यामुळे आता पाकच्या ‘आयएसआय’ने भारतात हल्ले करण्यासाठी नवनवीन दहशतवादी संघटनांचा वापर करून घ्यायचे ठरवले आहे, असे वृत्त आहे. त्या अनुषंगाने आयएसआयने पुन्हा ‘अल-उमर मुजाहिद्दीन’ या दहशतवादी संघटनेला उभारी दिली असल्याचे वृत्त आहे.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: