Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
जामखेडच्या युवकाची दारूच्या नशेत वेण्णा लेकमध्ये उडी
ऐक्य समूह
Thursday, June 13, 2019 AT 11:13 AM (IST)
Tags: re1
महाबळेश्‍वर ट्रेकर्स व पोलीस कर्मचार्‍यांकडून शोध सुरू
5महाबळेश्‍वर, दि.12 : महाबळेश्‍वर येथे दारूची पार्टी करून वेण्णालेक येथे नौकाविहार करत असलेल्या चार मित्रांपैकी महेश दादासाहेब रिटे (वय 30), रा. जामखेड, जि. अहमदनगर या युवकाने पोहोण्यासाठी बोटीतून वेण्णा लेकमध्ये उडी मारली. उडी मारणारा युवक दारूच्या नशेत असल्याने तो धरणाच्या पाण्यात खोल बुडाला. सायंकाळपर्यंत नगरपालिका कर्मचारी, महाबळेश्‍वर ट्रेकर्स व पोलीस कर्मचारी शोध घेत होते, परंतु तो सापडला नाही. मुसळधार पाऊस, दाट धुके व थंडीमुळे शोध मोहीम थांबविण्यात आली. दरम्यान, त्याच्या तीन मित्रांना पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.
काल जामखेड येथून पर्यटनासाठी बाहेर पडलेले चार मित्र महेश दादासाहेब रिटे (वय 30), युवराज अर्जुन म्हेत्रे (वय32), अहमद इलियास शेख (वय36), वसिम तैय्यब शेख (वय30), सर्व रा. जामखेड, जि. अहमदनगर हे सातारा येथे आले. बुधवारी सकाळी सातार्‍याहून महाबळेश्‍वरला पर्यटनासाठी आले. दुपारी बाजारपेठेतील  वाईनशॅापमधून दारू घेऊन त्यांनी गाडीतच पार्टी केली. दारूच्या नशेत दुपारी बाराच्या दरम्यात त्यांनी वेण्णा लेक येथे नौकाविहारासाठी पॅडल बोट घेऊन तलावात गेले. मद्यधुंद अवस्थेत असल्याने महेश रिटे याला पोहोण्याचा मोह आवरता आला नाही. ही गोष्ट त्याने आपल्या मित्रांना बोलून देखील दाखविली. पॅडल बोटीतच त्यांची मजामस्ती सुरू होती. महेश याने पोहोण्याच्या उद्देशाने पाण्यात थेट उडी मारली. महेश याला पाण्याचा अंदाज न आल्याने तो पाण्यातून वर आला नाही. त्याच्या सोबत असलेला मित्र अहमद शेख याने देखील त्याचा शोध घेण्यासाठी पाण्यात उडी मारली. 
परंतु काहीच अंदाज आला नाही. दरम्यान, या घटनेची माहिती नौकाविहार करणार्‍या पर्यटकांनी वेण्णालेकवरील कर्मचार्‍यांना दिली. तत्काळ कर्मचार्‍यांनी स्पिड बोटीच्या साह्याने तलावात धाव घेत पाहणी केली. मात्र महेशचा शोध न लागल्याने तत्काळ महाबळेश्‍वर पोलिसांसह महाबळेश्‍वर व सह्याद्री ट्रेकर्सना पाचारण करण्यात आले. मात्र मुसळधार पाऊस व सोसाट्याचा वारा शोधकार्यात अडथळे निर्माण करत  होते. महाबळेश्‍वरच्या नगराध्यक्षा सौ. स्वप्नाली शिंदे, उपनगराध्यक्ष अफझल सुतार, मुख्याधिकारी अमिता दगडे-पाटील, नगरसेवक युसूफ शेख, समिर सुतार यांनी पोलीस निरीक्षक बंडोपंत कोंडूभैरी यांच्यासह वेण्णालेक येथे घटनास्थळास भेट दिली. सायंकाळपर्यंत शोधकार्य सुरू होते. परंतु अंधार पडल्याने ट्रेकर्सने शोध मोहीम थांबविली. उद्या सकाळी परत शोध मोहीम हाती घेण्यात येणार असल्याची माहिती ट्रेकर्सचे सुनील भाटिया यांनी दिली.
महाबळेश्‍वर येथील उन्हाळी हंगाम  अंतिम टप्प्यात असल्याने येथे पर्यटकांची मोठी गर्दी आहे. नौकाविहार हे येथे येणार्‍या आबालवृद्धांसह सर्वच पर्यटकांचे मुख्य आकर्षण आहे. गर्दीत कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पालिका सर्वच प्रकारची खबरदारी घेत असते. पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी प्रत्येकाला लाईफ जॅकेट पुरवले जात असते. ते घालूनच नौकाविहार करणे बंधनकारक करण्यात आले आहे. तरीही या अतिउत्साही युवकांनी सुरक्षिततेची कोणतीही खबरदारी न घेता मौजमस्तीसाठी पाण्यात उडी मारली आणि  हीच मस्ती त्यांच्या अंगलट आल्याची चर्चा शहरात सुरू होती.
© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: