Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
पहिल्याच पावसाने साखरी-चिटेघर धरण तुडुंब
ऐक्य समूह
Wednesday, July 03, 2019 AT 11:19 AM (IST)
Tags: re2
5मणदुरे, दि. 2 : सुरू असलेल्या संततधार पर्जन्यवृष्टीमुळे मणदुरे भागाला वरदायिनी ठरणारा साखरी-चिटेघर लघुपाटबंधारे प्रकल्प मंगळवारी मध्यरात्री 2 च्या सुमारास पूर्ण क्षमतेने भरला असून सांडव्यातून पाणी वाहू लागले आहे. त्यामुळे केरा नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे. तालुक्यातील इतर धरणांपैकी साखरी-चिटेघर धरण हे प्रथमच भरल्याने शेतकर्‍यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
दरम्यान, हे धरण भरले असले तरी ज्या शेतकर्‍यांनी धरणासाठी जमिनी दिल्या, पर्यायी जमिनी मिळण्यासाठी शासनाकडे 65 टक्के रक्कम भरली आता यापैकी 39 खातेदारांनी शासनाकडे पर्यायी जमिनीऐवजी शासनाच्या नवीन धोरणानुसार सव्वा चारपट रक्कम मिळावी, असा प्रस्ताव पाठविला आहे. तो अद्याप प्रलंबित असल्याने प्रकल्पग्रस्तांमधून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
गेल्या पंधरा दिवसांपासून पाटणसह तालुक्यात दमदार पावसाने हजेरी लावली आहे. मणदुरेत पडत असलेल्या संततधार पावसामुळे साखरी-चिटेघर धरण पूर्ण क्षमतेने भरले आहे. सांडव्यातून पाणी वाहत आहे. त्यामुळे सध्या असलेल्या लाभक्षेत्रातील शेतकर्‍यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. या प्रकल्पासाठी 69.86 हेक्टर एवढे बुडित क्षेत्र असून 665.13 हेक्टर एवढे संभाव्य लाभक्षेत्र आहे. साखरी 26.61, चिटेघर 25.43, मेंढोशी 8.67, घाणव 3.10 हेक्टर एवढे क्षेत्र संपादित करण्यात आले आहे तर तामकणे 144.99, चिटेघर 84.63, पिंपळोशी 85.58, केर 100.19, कातवडी 99.35, साखरी 129.62, देवघर 20.77 हेक्टर एवढे लाभक्षेत्र ओलिताखाली आणण्याचे शासनाचे धोरण असून शासनाने केरा नदीवर तातडीने केटीवेअर बांधण्याची गरज निर्माण झाली आहे.
आजच्या परिस्थितीत साखरी-चिटेघर धरणात 3 हजार 899.22 सहस्त्र घनमीटर पाणीसाठा असून 2048.65 उपयुक्त जलसाठा आहे.  1 हजार 444.32 सहस्त्र घनमीटर अचल पाणीसाठा असून संचय पातळी 612 मीटर आहे.  धरणाची लांबी 395 मीटर इतकी आहे. साखरी-चिटेघर धरण पूर्ण क्षमतेने भरून सांडव्यातून पाणी वाहत असल्याने केरा नदीच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. कोयना विभागात व मणदुरे विभागात पडणार्‍या जोरदार पावसामुळे दोन्ही नद्यांच्या पाणीपातळीत चांगलीच वाढ झाली असल्याचे दिसून येत आहे.
अजूनही निर्वाह भत्ता नाहीच
65 टक्के रक्कम शासनाकडे भरून साखरी व चिटेघर येथील 39 प्रकल्पबाधित शेतकर्‍यांनी शासनाकडे जमिनीऐवजी सव्वा चार पट मोबदल्याचा प्रस्ताव अनेक आंदोलनानंतर मंत्रालयस्तरावर पोहोचविला आहे.
यावर्षी जिल्हाधिकार्‍यांसमवेत 12 फेब्रुवारी रोजी झालेल्या बैठकीत भरलेल्या रकमेवरील व्याज व निर्वाह भत्ता तातडीने प्रकल्प बाधितांना दिला जाईल, असे आश्‍वासन जलसंपदा विभागाच्या अधिकार्‍यांनी दिले होते. अद्याप व्याज हातात मिळाले आहे. निर्वाह भत्ता अजूनही प्रकल्प बाधितांना मिळाला नसल्याने त्यांच्यामध्ये नाराजी दिसून येत आहे.
यापुढेही प्रकल्प बाधितांना सव्वा चार पट रक्कम व निर्वाह भत्त्यासाठी आंदोलनाशिवाय पर्याय उरला नसल्याचे प्रकल्प बाधितांनी सांगितले.
© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: